आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी धुरे, देसाई उपाध्यक्ष
कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे (उत्तूर) यांची तर उपाध्यक्षपदी एम.के. देसाई (सरोळी) यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा साखर सहसंचालक गोपाळ मावळे होते.
अध्यक्षपदासाठी धुरे यांचे नांव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय पवार यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी देसाई यांचे नाव जेष्ठ संचालक विष्णू केसरकर यांनी सुचविले त्यास अनिल फडके यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर मावळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धुरे म्हणाले, गाळप आणि निवडणूक एकत्र आल्यामुळे जोडण्या लावता आल्या नाहीत याचा परिणाम गाळपावर होणार आहे. यंदाचे वर्ष खडतर आहे. यापुढे खर्च कमी व गाळप वाढविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.
एम. के. देसाई म्हणाले, ज्या उद्देशाने हा कारखाना काढला तो हेतू सफल करुन दाखवणार. विश्वासाला पात्र राहून कारभार करणार. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, काशिनाथ तेली यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नुतन संचालक यांच्यासह जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर, माजी संचालक दिगंबर देसाई, नामदेव नार्वेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी आभार मानले.
आता स्व. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना
कारखाना सर्वसाधारण सभेत कारखान्याला स्व. वसंतराव देसाई यांचे नाव द्यावे असा ठराव मंजूर झाला होता. प्रस्ताव पाठवले होते, दरम्यान निवडणूक जाहीर झाल्याने मंजुरी थांबवली होती. त्याला मंजुरी देत असल्याचे साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी सांगितले. यापुढे कारखान्याचे नाव स्व. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, अमृतनगर गवसे असे असणार आहे.