अजिंक्यतारा कारखान्याकडून पूरग्रस्तांसाठी १० लाखांची मदत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक भागात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार ठोस भूमिका घेत आहे. राज्य सरकारच्या आवाहनानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अजिंक्यतारा कारखान्याने १० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली असून त्याचा धनादेश कारखान्याच्या संचालक मंडळाने नुकताच ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शेंद्रे, ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेदरम्यान अजिंक्यतारा कारखाना संचालकाच्या वतीने हा धनादेश पुरग्रस्तांसाठी देण्यात आला.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सौ. कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या आणि कारखान्यास विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपये; तर कामगारांना १९ टक्के बोनस

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, संस्थेची प्रगती आणि सभासद-शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल ल सहकार्यामुळेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. कारखान्याने गत हंगामात ऊसाला ३२०० रुपये प्रतिटन दिले असून या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे तसेच कामगारांना १९ टक्के बोनस देणार असल्याचे जाहीर करून शेतकरी हित जोपासण्यात अजिंक्यतारा कारखाना कायम अग्रेसर राहील.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »