‘घोडगंगा’ कामगारांचा एक पगार त्वरित द्या : अजित पवार
बेमुदत संप प्रकरणी साखर संकुलात बैठक
पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगारांचा एक पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी आणि उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून सुमारे २५ कोटी रुपये हे कामगारांचे थकीत देणे आहे. त्यामुळे कामगारांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पवार यांनी ७ ऑगस्ट रोजी पुण्यात साखर संकुल येथे बैठक बोलावली होती.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी या कारखान्याचे काही सभासद आणि कामगार मला भेटले होते. तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही भेटले. त्या कारखान्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असून, कामगारांच्या पगारापोटीचे २५ कोटी रुपये थकले आहेत. दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन मार्ग काढायला हवा. वित्त आणि सहकार विभागाने निर्णय घेतले पाहिजेत. राज्य बँकेस नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि सहकार विभागाने टाकलेल्या निर्बंधाचा विचार करून नियमांच्या चौकटीत बसून निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या एफआरपीचा विषय असून, त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बैठक घेतली आणि आढावा घेऊन सूचना दिल्या आहेत.’
या बैठकीला सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कारखान्याचे अध्यक्ष ऋषी पवार, आमदार अशोक पवार, दादा पाटील फराटे, कामगार नेते शिवाजीराव काळे, रवी काळे आदींची उपस्थिती होती.