अजितदादांनी ऐकून घेतल्या साखर उद्योगाच्या समस्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

एमएसपी, इथेनॉल दरवाढीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार

मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची व्यापक आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि उद्योगाच्या समस्या ऐकून घेतल्या. साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीचा प्रलंबित निर्णय, इथेनॉल दरवाढ यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रालयात मंगळवारी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राजेश टोपे, अभिजित पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, पांडुरंग राऊत, यशवर्धन डहाके, अविनाश जाधव, रोहित नारा, अजित चौगुले, तसेच साखर संघाचे सदस्य प्रकाश सोळंके, विवेक कोल्हे, अधिकारी आदींची उपस्थिती होती.
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, ‘साखर उद्योगाच्या समस्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्या विचारात घेतल्या.’
बैठकीबाबत त्यांनी अधिक तपशील देण्यास असमर्थता दर्शवली.
मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साखरेची किमान विक्री किंमत सुमारे पाच वर्षांपासून वाढलेली नाही, त्याचवेळी एफआरपीसह साखर कारखान्याला लागणाऱ्या सर्व वस्तूंची दरवाढ झाली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, याकडे अजितदादांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच इथेनॉलची सरसकट दरवाढ अपेक्षित होती, मात्र केवळ सी हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलची अल्प दरवाढ झाली, या मुद्दाही मांडण्यात आला. या दोन्ही विषयांचा केंद्राकडे प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साखर उतारा घट अनुदान, सॉफ्ट लोन सवलत, सामूहिक प्रोत्साहन योजना, सहवीज निर्मिती अनुदान, कोजन प्रकल्पांवरील सेस आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »