केंद्राच्या मदतीने घोडगंगा कारखाना सुरू करणार : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शिरूर : “रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज असून, केंद्राच्या मदतीतूनच ‘घोडगंगा’ला कर्ज मिळू शकते. या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार असून, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून पुढील हंगामापासून घोडगंगा सुरू केला जाईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना आमदार करा, घोडगंगा सुरू करण्याची सर्वतोपरी जबाबदारी माझी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कटके यांच्या प्रचारार्थ न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदीप कंद, राहुल पाचर्णे, अॅड. स्वप्नील ढमढेरे, सुरेश घुले, राजेंद्र कोरेकर,
प्रदीप गारटकर, महेश ढमढेरे, वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे, रवीबापू काळे, दिलीप वाल्हेकर, स्वप्नील गायकवाड, आबासाहेब सोनवणे, संदीप भोंडवे, पुनम चौधरी, रामभाऊ सासवडे, दादा पाटील फराटे, बाबासाहेब फराटे, शशिकांत दसगुडे, सिद्धार्थ कदम, राजेंद्र जासूद, राजेंद्र जगदाळे, दौलत शितोळे, दीपक कोकडे, सुभाष कांडगे, दादासाहेब सातव, रामभाऊ दाभाडे आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “घोडगंगा साखर कारखान्याला २९० कोटी रुपये देणे असून, ६४ कोटी रुपयांचा तोटा आहे. वाहतूकदारांसह विविध हेड खालील कर्जे थकीत आहेत. या आर्थिक स्थितीमुळे ‘घोडगंगा’चे खाते ‘एनपीए’त गेल्याने ‘एनसीडीसी’कडून नवीन कर्जाचा प्रस्ताव मान्य केला जात नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे. ‘एनसीडी’चे अनेक निर्णय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हातात आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही इतरही अनेक कारखान्ऱ्यांना मदत मिळवून दिली आहे. ‘घोडगंगा’साठीही वेळोवेळी मदत केली आहे. परंतु आमच्या भावकीने (आमदार अशोक पवार) अनेक चुका केल्या. कारखान्याचा कारभार करताना मनमानी केली. त्यांच्या चुकीच्या कारभारामुळेच कारखाना रसातळाला गेला असून, शेतकऱ्यांची संजीवनी असलेली ही संस्था संकटातून बाहेर काढण्यासाठी मनापासून प्रयत्न केले जातील.

पुढील हंगामात घोडगंगा सुरू झालेला असेल व शेतकऱ्यांच्या सर्व उसाच्या गाळपाचे नियोजन केले जाईल.”
आमदार अशोक पवार यांना विविध विकास कामांमध्ये, घोडगंगा साखर कारखान्याबाबत वेळोवेळी मदतीची भूमिका घेतली. मात्र सध्या ते मलाच टार्गेट करीत आहेत. आम्ही त्यांचे काय घोडे मारले, ते त्यांनी एकदा स्पष्ट करावे. वास्तविक त्यांच्या हट्टापायी कारखान्याचे कामकाज बिघडत गेले. कारखाना बंद पडण्यामागे अनेक कंगोरे असून, ते आम्ही समजून सांगत असतो. परंतु, आपल्या हट्टापायी अशोक पवार कुणाचेच ऐकत नाही.

मी घोडगंगा बंद पाडला, हा धादांत खोटा आरोप असून, असला आरोप मी सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांची संस्था मी कशी बंद पडू देईल? मी बंद पाडणारा नाही, तर बंद पडलेल्या संस्थांना मदत करणारा आणि त्या संस्था पुन्हा चालू करण्यासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, असे अजित पवार म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »