तनपुरे कारखाना चालवण्यासाठी अजित पवार इच्छुक?
नगर : जिल्ह्यातील आणखी एक सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील साखर उद्योग समूह चालविण्यासाठी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी आता उत्तर दिले आहे. बँकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेनुसार कारखाना कोणीही चालविण्यास घेण्यास आमची हरकत नाही, फक्त तो चांगला चालला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे कर्डिले म्हणाले आहेत.
राहुरी तालुक्यातील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संबंधाने ही चर्चा सुरू आहे. हा कारखाना बंद पडल्याने तो थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतला आहे. तो भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. हा कारखाना अजित पवार चालविण्यास घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना असाच बंद पडला होता. लिलाव प्रक्रियेत तो पुढे पवार यांच्या अधिपत्याखालील कंपनीने विकत घेतला. अंबालिका नावाने तो सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील साखर उत्पादनासह अन्य बाबतीतही तो अग्रेसर आहे.
बँकेचे अध्यक्ष म्हणून कर्डिले यासंदर्भात म्हणाले, अजित पवार असो शरद पवार किंवा जयंत पाटील कोणीही कारखाना चालवायला घेतला तरी हरकत नाही. हा कारखाना सुरू रहावा, हीच आमची भूमिका आहे. तालुक्यातील नेत्यांमुळे हा कारखाना बंद पडला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा बँकेने १३४ कोटी रुपयांचे कर्ज कारखान्याला दिले आहे. याशिवाय कामगारांचीही कोट्यवधी रुपयांची देणी आहेत. याची परतफेड व्हावी, शेतकऱ्यांचा ऊस पुन्हा या कारखान्याला जावा, कामगारांना काम मिळावे अशी आमची भूमिका आहे. निविदेच्या नियामानुसार जास्तीत जास्त रकमेची निविदा भरणाऱ्याला तो दिला जाईल. यावर बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतच निर्णय होईल, असे कर्डिले म्हणाले.