इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार
नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.
अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय अचानकपणे आला आहे. देशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लँट उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, याकडे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी लक्ष वेधले आहे.
अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लांटमध्ये ५ टक्के भांडवल आणि ९५ टक्के निधी कर्जाद्वारे उभारला आहे,’ असेही पवार यांनी विधानसभेत सांगितले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी केंद्रीय गृह (आणि सहकार) मंत्री अमित शहा यांच्याशीही बोललो आहे, त्यांनी मला येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले,” असे पवार म्हणाले.
“जर तोडगा निघाला नाही, तर आम्ही दिल्लीला जाऊन त्यांच्याशी (शहा) या विषयावर चर्चा करू. मी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडेही हे प्रकरण मांडले आहे,” असेही पवार यांनी नमूद केले.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयाचे पडसाद उमटले. केंद्राच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर विपरित परिणाम होईल, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला.
देशांतर्गत वापरासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या महिन्यात सुरू झालेल्या 2023-24 पुरवठा वर्षात इथेनॉल उत्पादनासाठी ‘उसाचा रस आणि शुगर सिरप’ वापरण्यास केंद्राने गुरुवारी बंदी घातली. तथापि, सरकारने 2023-24 मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ‘बी-मोलासेस’ हे उसाचे उप-उत्पादन वापरण्यास परवानगी दिली आहे.