उसाचे पाचट पेटविताना वृद्धाचा होरपळून मृत्यू; भाऊ गंभीर

शिराळा : उसाचे पाचत पेटवताना भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करण्याऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे. आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे भाजून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर या घटनेदरम्यान वसंत रामचंद्र मोरे (७५) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत भाऊ शरद रामचंद्र मोरे (६०) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली करून तपास सुरू केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रविवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी (ता. शिराळा) येथील दोन सख्खे भाऊ आनंदा व वसंत हे शिरशी रस्त्यावरील शेतात उसाचा पाला पेटवण्यास गेले होते. फडातील पाला पेटवला असता वाऱ्यामुळे आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. फडाच्या एका बाजूला वसंत, तर दुसऱ्या बाजूला आनंदा होते. या आगीत मात्र आनंदा होरपळले गेले. तर वाऱ्यामुळे क्षणार्धात आगीची झळ वसंत यांनाही लागल्याने ते बेशुद्ध पडले. शेताजवळ असलेल्या एका मुलीने गोरख माने यांना माहिती दिली. माने यांनी त्यांना शेडमध्ये आणून पाणी पाजले असता ते शुद्धीवर आले. वसंत यांचे मेहुणे सुनील माने यांच्यासह श्रीरंग माने, अमोल माने यांनी वसंत मोरे यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृतदेह रात्रभर फडातच
वाऱ्याच्या झोतामुळे मोरे यांच्या फडात पेटवलेल्या पाल्याची आग शेजाऱ्यांच्या उसाला लागेल, या भीतीपोटी आनंदा घरी आले नसतील, असा समज घरच्यांचा झाला. त्यामुळे तो सकाळी येईल, असे वाटले. मात्र, सकाळी उसाच्या फडातच अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.






