आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांचे गव्हाणीत घुसून आंदोलन
सांगली : आंदोलन अंकुशच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत घुसून सोमवारी आंदोलन केले. दुपारी 2 वाजता कारखाना बंद पाडला.जवळपास दोन तास गव्हाणीत कार्यकर्ते बसून होते.
शिरोळ तालुक्यातील संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी दुपारी दत्त इंडिया साखर कारखाण्यावर जमा झाले होते.निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी समोर येईना म्हणून संतप्त झालेले कार्यकर्ते थेट गव्हाणीत गेले आणि कारखाना बंद केला.
गव्हाणीत कार्यकर्ते बसल्यामुळे गाळप ठप्प झाल्याने अधिकारी विनवण्या करू लागले दरम्यान पोलीस आले . वादावादी जास्त होऊ लागल्याने पोलिसांनी मध्यस्ती करून दत्त इंडियाचे मालक धारू यांच्याशी चर्चा करून येत्या 22 तारखेला संघटने बरोबर चर्चा करून मार्ग काढतो, असे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत होऊन बाहेर आले.यावेळी शिरोळ मधील राकेश जगदाळे, दिपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, दिलीप माने, अमोल माने, आनंदा पाटील,सुनील यादव, आनंदा माळी,संभाजी माने, प्रकाश गडकरी, एकनाथ माने हे आंदोलनात सहभागी होते.
22 तारखेला मागील 22/23 चे ठरलेले 100 रुपये गत हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे 200 रुपये व चालूची पहिली उचल 3700 रुपये दत्त इंडिया ने जाहीर न केल्यास 22 तारखेला कारखान्याची उसाची वाहतूक रोखण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शेवटी दिला.