हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा; शेतकरी संघटना आक्रमक

रायबाग (बेळगाव) : गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अद्याप राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊस बिलाची घोषणा केलेली नाही. ऊस बिलाची घोषणा केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी रायबाग तहसीलदार महादेव सनमुरे यांना शेतकरी संघटनेने दिले आहे. दरम्यान, यामागणीसाठी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) हारूगेरी क्रॉसजवळ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
राज्य सरकारने यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्यातील कुठल्याही कारखान्यांनी ऊस बिलाबाबत घोषणा केलेली नाही, त्यामुळे शेतकरीवर्ग संताप व्यक्त करत आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायबाग, अथणी, कागवाड, मुडलगी, गोकाक तालुक्यातील कारखान्यांच्या व्यवस्थाकीय संचालकांना बोलवून घेऊन या मागणीवर त्वरित तोडगा काढावा, शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी सरकारने कारखान्यांना सूचना करावी. दर जाहीर करूनच कारखाने सुरू करावेत. यावेळी चिक्कोडी जिल्हाध्यक्ष, रायबाग तालुकाध्यक्ष यांच्यासह शेतकरी संघटनेचे विविध तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.