गेवराई तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

गेवराई : तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात १० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेचे ही घटना घडल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेच माहिती मिळताच ‘महावितरण’ कडून या ठिकाणची पाहणी करण्यात आली. पीडित शेतकऱ्यांची नोंद जय भवानी सहकारी साखर कारखाना व गंगामाई शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकडे केलेली आहे. संबंधित कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान, पीडित शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
भोजगाव शिवारातील मागील वर्षी ८ ते १० शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अकराव्या महिन्यात व बाराव्या महिन्यात उसाची लागवड केली होती. तो आता कारखान्यात गाळपासाठी तयार होता. तोडणीसाठी शेतकरी तयारीत होता. त्यातच ही घटना घडल्याने संबंधित शेतकरी दुखावला गेला आहे. यामध्ये विलास तुकाराम शिंदे गट नंबर ६५, लक्ष्मण शिंदे गट नंबर ६५, जिजाबाई शिंदे गट नंबर ६५, भाऊसाहेब शिंदे गट नंबर ६५, भास्कर शिंदे गट नंबर ६४, नजन मुरलीधर गट नंबर ६७, प्रल्हाद शिंदे गट नंबर ६६, कैलास शिंदे गट नंबर ६५ या आठ शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्किटने जळाले असल्याची माहिती सदर शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. अंदाजे शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी सांगितली.





