भाऊराव चव्हाण कारखान्याची निवडणूक बिनविरोध
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेरच्या क्षणी बिनविरोध झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी भूमिका घेणाऱ्या उमेदवारांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याबद्दल निवडणूक बिनविरोध झाली.
अर्धापूर तालुक्यातील लक्ष्मीनगर, देगाव-येळेगाव स्थित भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी एकूण ७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७ अर्ज छाननीत बाद झाल्याने ६५ उमेदवार रिंगणात शिल्लक होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
कारखान्याच्या नवनिर्वाचित २१ संचालकांमध्ये १५ जणांना पुन्हा चाल मिळाली असून, ६ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
पुन्हा निवडून आलेल्या संचालकांमध्ये विद्यमान चेअरमन गणपतराव तिडके (लक्ष्मीनगर गट), व्हाईस चेअरमन प्रा. कैलास दाढ (बारड गट) यांच्यासह अॅड. सुभाष नामदेवराव कल्याणकर (लक्ष्मीनगर गट), शिवाजी नरबाजी पवार व व्यंकटराव बाबाराव कल्याणकर (बारड गट), मोतिराम गंगाराम जगताप (मालेगाव गट), बालाजी गोविंदराव शिंदे, माधवराव व्यंकटराव शिंदे, किसनराव दशरथ पाटील (मुदखेड गट), अशोक दिगांबर कदम, दत्तराम लोकडोजी आवातिरक (आमदुरा गट), आनंद पुरबाजी सावते (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती गट), कमलाबाई दत्तराम सूर्यवंशी (महिला प्रतिनिधी), सुभाषराव माधवराव देशमुख (इतर मागास प्रवर्ग), साहेबराव लचमाजी राठोड (भटक्या, विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी) यांचा समावेश आहे.
नरेंद्र भगवानराव चव्हाण (उत्पादन सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था), माधव मोहनराव कल्याणे (आमदुरा गट), बळवंत रंगराव इंगोले व लालजी गोडाजी कदम (मालेगाव गट), व्यंकटी सोनाजी साखरे (लक्ष्मीनगर गट) आणि मीरा शामराव पाटील (महिला प्रतिनिधी) यांची संचालक मंडळावर नव्याने निवड झाली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार करीत कार्यकर्त्यांनी निवडीचे जल्लोषात स्वागत केले.