सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

राज्यातील साखरकारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी होत आलाय. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचादर जाहीर केलेला नाही. दराबाबत कारखानदारांनी हाताची घडी आणि तोंडवर बोट ठेवलंय.
सोलापूर जिल्ह्यात 39 साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा राजवी अॅग्रो शुगर ( 3001 रुपये) सोडला तर बाकीच्या एकाही कारखान्याने दर जाहीर केला नाही. मागणी मात्र 3 हजार 500 रुपयांची केली जातेय.
आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. कुणाची पिक वाहून गेली तर कुणाच्या जमिनी वाहून गेल्या. उरलं सुरलं राहीलंय तर त्यातही 100 अडचणी. त्यातच साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच धुराडी पेटवलीत. शेतकऱ्यांच्या उसाला कोयतं लावून त्याला दराबाबत अंधारात ठेवलंय. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील साखर कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केलेत. मग सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना उसाचा दर जाहीर करण्यात अडचण काय?
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठी आंदोलने उभे राहतात. शेतकऱ्यांची मोठी एकजूट आहे. त्यामुळं तेथील कारखानदारांना नमतं घ्यावचं लागतं. परिणामी शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे हे साखर कारखानदार दर जाहीर करतात.
राजू शेट्टींचा सल्ला
या भागातील कारखान्यांनी 3500 ते 3600 रुपयांचे दर जाहीर केलेत. याबाबत मी एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू_शेट्टींना विचारलं होतं, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांपेक्षा जास्त दर देतात. तसेच ते लवकरच दरही जाहीर करतात. मग हे सोलापूर जिल्ह्यात का होऊ शकत नाही? त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले होते की, ज्याप्रमाणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या दरासाठी एकजुटीने उभे राहतात, त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट नाही. त्यामुळं तेथील साखर कारखानदार चांगला दर देत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.
खरं तर साखर कारखान्यांना सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं म्हटलं जातं. कारण, कारखान्यातील फक्त साखरच विकली जात नाही. तर वीज, इथेनॉल, मोलॅसिस, मळी, भुसा अशी विविध प्रकारची उत्पादने तयार होतात. यातून मोठा पैसा साखर कारखानदारांना मिळतो. मग या साखर कारखानदारांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या तुलनेत दर देण्यास अडचण काय?
शेतकऱ्यांच्या एकजुटीची गरज
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचं पिकं म्हणजे ऊस आहे. ऊस शेतीवर या भागातील हजारो प्रपंच उभे आहेत. मात्र, या वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसलाय. एका बाजूला शेतकरी आस्मानी संकटात आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारांनी दर जाहीर न केल्यामुळं सुलतानी संकटात आहे. कारखानदार मात्र शेतकऱ्यांची मजा बघतायेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना एक व्हावं लागेल. कारखानदारांना जाब विचारावा लागेल. आपल्या हक्कासाठी लढावं लागेल.
राजकारणाचा मुद्दा बाजूला ठेवून एकजूट दाखवली तरच चार पैसे पदरात पडतील. नाहीतर हे कारखानदार शेतकऱ्यांना कमी दरात गुंडाळतील अशी शंका येतेय. पडद्यामागं हे सगळे कारखानदार एकच आहेत. ठरलेली रेषा ओलांडायची नाही असं ठरवूनच कारखान्याचे धुराडी पेटवली जातात.
अतुलनाना माने पाटील (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ)






