महाराष्ट्राच्या साखर उद्योगाचे आधुनिक शिल्पकार

–अविनाश देशमुख

साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या क्षेत्रात श्री. अजित पवार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. केवळ कारखाना चालवणे नव्हे, तर तो आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नफ्यात कसा आणता येतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
महाराष्ट्रातील सहकार चळवळीला शिस्त, पारदर्शकता आणि आधुनिकतेची जोड देण्याचे मोठे श्रेय श्री.अजित पवार यांना जाते. ‘साखर कारखाना’ म्हणजे केवळ साखर तयार करण्याचे केंद्र न राहता, ते ‘मल्टी-प्रोडक्ट हब’ असावे, हा विचार त्यांनी कृतिशीलतेने मांडला. श्री. अजित पवार यांनी साखर कारखानदारीकडे, एकात्मिक उद्योग संकुल (Integrated Sugar Complex) म्हणून पाहण्याची भूमिका सातत्याने मांडली. उसापासून केवळ साखर नव्हे, तर त्यातून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांचा पूर्ण क्षमतेने उपयोग केल्यास कारखान्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना वेळेवर व रास्त दर मिळू शकतो, हा विचार त्यांच्या धोरणात्मक निर्णयांचा केंद्रबिंदू राहिला आहे.
अजित पवार यांनी नेहमीच एका सूत्राचा आग्रह धरला: “नुसत्या साखरेवर कारखाना जगणार नाही.” साखरेचे भाव जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असल्याने, कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीवर भर देऊन स्वतःचे आर्थिक स्त्रोत निर्माण करावेत, यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे आज अनेक कारखान्यांनी साखर उत्पादनापेक्षा इथेनॉलकडे आपला मोर्चा वळवला आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाचा फायदा घेत, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्याचे धाडस त्यांनी अनेक सहकारी कारखान्यांना करायला लावले. यामुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळणे शक्य झाले.
साखर कारखान्यातील टाकाऊ मळीचा (Baggasse) वापर करून वीज निर्मिती करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. आज अनेक कारखाने स्वतःची वीज स्वतः निर्माण करून उरलेली वीज ग्रीडला विकत आहेत, ज्यातून कारखान्यांना अतिरिक्त महसूल मिळत आहे. मळीपासून अल्कोहोल आणि आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (CBG) निर्मितीमध्येही त्यांनी अनेक प्रकल्पांना प्रोत्साहन दिले आहे.
अजित पवार यांची ओळख ही एक ‘कडक प्रशासक’ म्हणून आहे. त्यांनी सहकारी साखर कारखान्यातील वजन काट्यांपासून ते हिशोबापर्यंत सर्वत्र संगणकीकरण करून पारदर्शकता आणली. कारखान्याचा प्रशासकीय खर्च कमी करून जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांच्या खिशात कसा जाईल, यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. गळीत हंगाम वेळेवर सुरू करणे आणि वेळेत संपवणे, जेणेकरून उसाच्या रिकव्हरीवर परिणाम होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली.
श्री.अजित पवार यांनी नेहमीच ‘प्रगतशील शेतकरी’ घडवण्यावर भर दिला. ठिबक सिंचनाचा वापर वाढवणे, उसाच्या नवनवीन जातींची लागवड करणे आणि जमिनीचा पोत सुधारणे या गोष्टींसाठी त्यांनी कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. आणि आता ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा, ए. आय. वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
“साखर उद्योगाला जर टिकवायचे असेल, तर आपल्याला जागतिक स्पर्धेत उतरावे लागेल आणि त्यासाठी साखरेसोबतच ऊर्जा निर्मितीकडे वळणे अनिवार्य आहे.” – हा अजित पवारांचा विचार आज महाराष्ट्रातील साखर उद्योगाची दिशा ठरवत आहे.
थोडक्यात सांगायचे तर, श्री.अजित पवार यांनी साखर कारखानदारीला केवळ राजकारणाचे साधन न मानता, ते ग्रामीण विकासाचे एक आर्थिक इंजिन बनवले आहे. उपपदार्थांच्या प्रभावी वापरामुळेच आज महाराष्ट्रातील साखर उद्योग आव्हानांच्या काळातही पाय घट्ट रोवून उभा आहे.
(लेखक अविनाश देशमुख हे साखर सहसंचालक आहेत )




