ऊसतोड मजुरांची टोळी पुरवण्याचे आमिष; ११ जणांवर गुन्हा

सातारा : शेंद्र येथील अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ११ जणांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड), पोपट आप्पासाहेब पाटील (रा. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर, काकासाहेब हणमंत कोळेकर, नीळकंठ श्रीरंग भंडलकर, शिवाजी नरहरी गोरे (रा. माळशिरस, जि. सोलापूर), लक्ष्मण नवनाथ जाधव (रा. बीड), लक्ष्मण बन्सी राठोड, गोरख विनायक मोरे, कांतिलाल काळू राठोड व नारायण आनंदा गायकवाड (रा. नांदगाव, जि. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेचे कर्मचारी पैगंबर रज्जाक शेख यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी अजिंक्यतारा सहकारी कृषी औद्योगिक ऊसतोडणी व वाहतूक संस्थेशी गळीत हंगाम २०२३ ते २०२५ या वर्षासाठी ऊसतोड मजुरांची टोळी व वाहतूक यंत्रणा पुरवण्याचे करार केले होते. मात्र, कोणतीही यंत्रणा संबंधितांकडून पुरविण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेचे कर्मचारी पैगंबर रज्जाक शेख यांनी यासंदर्भात सातारा पोलिसांत संबंधित ११ जणांविरोधात तक्रार करण्यात करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर तपास करत आहेत.





