बारामतीत पाहायला मिळणार ‘फार्म ऑफ द फ्यूचर’, कृषिक 2024 चे आयोजन
ऊस उत्पादनवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
बारामती: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ‘अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ मार्फत “कृषिक” या जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिके आधारित भविष्यातील शेती तंत्रज्ञानाचे भव्य कृषी व पशू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशातील पहिले “फार्म ऑफ द फ्युचर” ची उभारणी या प्रदर्शनात केली आहे.
सन 2015 पासून हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी दि.18 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे 170 एकर क्षेत्रात या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. संस्थ्येचे चेअरमन श्री. राजेंद्रदादा पवार हे सन 1980 मध्ये अमेरिकेमधील मिशिगन स्टेट मध्ये कृषीपदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा काउंटी या गावामध्ये त्यांनी या प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पहिले होते व त्यांच्या या संकल्पनेतूनच हे प्रदर्शन दरवर्षी बारामतीमध्ये भरवले जाते.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मायक्रोसोफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय), आय.ओ.टी, ए.आर, व्ही. आर यांसारख्या तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर करून तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचरची उभारणी केली आहे. उदा. सेन्सर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाइट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन वाढ करणे हा उद्देश आहे, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.
AI चा उपयोग शेतकर्यांना शेतीची पूर्वमशागत, प्रत्यक्ष लागवड, कापणी व त्यानंतरची मार्केटिंगची प्रक्रिया सोपी होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांच्या वेळेची तसेच पैश्याची बचत, शेतकर्यांचे कष्ट कमी होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ व त्यांना भरघोस नफा मिळवणे शक्य होणार आहे. AI मुळे ग्राहकांना त्यांची फसवणूक न होता दर्जेदार व किफायतशीर कृषि उत्पादन मिळेल. शेतकरी शेतामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर शिकून प्रत्यक्ष अंबलबजावणी करू शकतात.
या प्रदर्शनामुळे शेतकरी नवीन पीक पद्धती आणि लागवडीच्या अधिक चांगल्या पद्धती विषयी जागृत होतील. ऊस शेती करताना शेतकर्यांना अनेक अडचणी येतात, परंतु AI चा वापर करून ऊस शेतीत येणार्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतो. शेतकर्यांना कृषी शास्त्रातील विविध सेवांसाठी सल्ले व मार्गदर्शन मिळेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हीजन ई. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीत शेतकर्यांना पाहता यावा म्हणून ‘अग्रिकल्चर डेव्हलेपमेंट ट्रस्ट’ने “फार्म ऑफ द फ्युचर”ची उभारणी केली आहे. ज्यामध्ये डॅशबोर्डच्या मदतीने शेतकर्यांना हिट मॅप, सेटेलाईट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रिकमंडेशन सिस्टम, इरिगेशन मॅनेजमेंट, रोग आणि कीड व्यवस्थापन इत्यादि गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत या प्रदर्शनाचा एकूण 15 लाख हून अधिक जनतेने लाभ घेतला आहे.
या प्रदर्शनात 20 हून अधिक देशांतील विविध AI, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान, विविध स्मार्ट टूल व अधिक गोष्टी पाहण्याची संधी मिळणार आहेत. प्रदर्शनात क्लस्टर आधारित प्रात्यक्षिके विभागून पाहायला मिळतील.
त्याचप्रमाणे नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नैसर्गिक शेती या विषयी ज्ञान आणि पशुपक्षी प्रदर्शन व त्यामध्ये अश्वप्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे.
या मध्ये मारवारी आणि भीमथडी देखणे, दिमाखदार व उत्तम प्रतीचे अश्व असतील. पशू प्रदर्शनात संकरीत जर्सी, संकरीत होल्सटीन-फ्रिसीयनगाईमध्ये दूध उत्पादन स्पर्धा होणार आहे. उत्तम प्रतीच्या कालवडींचा हिरकणी शो व कालवडीची स्पर्धा आयोजित केली आहे. फुलशेतींमध्ये ऑरकिडचे 15 प्रकार व देशी बियाण्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळतील तसेच भरडधान्याचे आहारातील महत्त्व याचे मार्गदर्शन मिळेल.