बारामती ॲग्रो यु.१ प्रमाणेच हाळगावच्या शेतकऱ्यांना दर- गुळवे

नगर : हाळगाव (ता. जामखेड) येथील बारामती ॲग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ या साखर कारखान्याकडे ऊस गाळपासाठी देणाऱ्या ऊस उत्पादकांना शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो यु. १ च्या उस दराप्रमाणेच चांगला दर देणार असून १५ दिवसांत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार, असे आश्वासन बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष (आबा) गुळवे यांनी दिले.
ते हाळगाव येथील बारामती अग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ च्या मोळी पूजन व सन २०२३-२४ ऊस गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते. शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर रोजी या साखर कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ गतवर्षी सर्वाधिक ऊस दिलेले १८ शेतकरी व संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सुरेश भोसले, सुधीर राळेभात, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, पोपट खोसे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या.