ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर लोकप्रतिनिधींनी बारामती येथे केला.
ऊस उत्पादन तसेच दर्जात वाढ करण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याबाबत बारामती येथे शनिवारी आयोजित परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक, अधिकारी, शेती अधिकारी आदींची परिषदेला उपस्थिती होती. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) आणि ‘विस्मा’च्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. ऊस शेतीसाठी ‘एआय’चा वापर करण्याबाबत यावेळी एकमत झाले आणि त्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचा निर्णय झाला. या कृती गटामध्ये ट्रस्ट, विस्मा, राज्य साखर संघ, व्हीएसआय यांचे प्रतिनिधी राहतील. लवकरच याबाबत घोषणा होईल.
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, अध्यक्ष राजेंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंगराव राऊत, उपाध्यक्ष आ. रोहित पवार, कार्यकारी संचालक अजित चौगुले, महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख, शरयू ॲग्रोचे एमडी युगेंद्र पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही एआय ऊस परिषद झाली.
यावेळी ज्येष्ठ नेते पवार, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, खा. सुळे, ठोंबरे आदींनी मार्गदर्शन केले. ट्रस्टच्या नलावडे यांच्यासह तज्ज्ञांनी संगणकीय सादरीकरण केले आणि एआयचा वापर केल्यामुळे उसाचे उत्पादन आणि दर्जा कशा पद्धतीने वाढतो हे उदाहरणासह सांगितले.
ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि लंडनच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने बारामती कृषी विज्ञान केंद्रात ऊस शेतीसाठी एआयचा यशस्वी प्रयोग केला आहे. आता तो व्यवहार्य पातळीवरील मॉडेल बनला आहे. हे मॉडेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे आणि भविष्यात अन्य पिकांसाठीही एआयचा वापर करण्याबाबत प्रयत्न करावे, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.
राज्यातील संपूर्ण ऊस शेती येत्या पाच वर्षांमध्ये शंभर टक्के एआय वर आधारित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी घोषणा ठोंबरे यांनी केली.
परिषदेला नामवंत ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, ऊस संजीवनीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, साखर उद्योग तज्ज्ञ डी. एम. रासकर, कृषितज्ज्ञ संजीव माने, डॉ. डोंगरे आदी अनेक मान्यवर तज्ज्ञांची उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष ऊस फडात जाऊन एआय चा वापर कसा केला जातो आणि त्यामुळे ४० टक्के उत्पादन वाढ कशी झाली आहे, याची माहिती देण्यात आली.