सावध राहा! ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली लाखोंची लूट

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यात ऊसतोडीच्या हंगामासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ३९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना दीर्घकाळापासून सुरू होती, परंतु जेव्हा मजुरांचा पुरवठा झाला नाही आणि दिलेले पैसेही परत मिळेनात, तेव्हा फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर जत पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात दीपक धानु केसरकर (वय ३७, रा. खिलारवाडी, ता. जत, जि. सांगली) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश गोविंद सावळे (रा. साखरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी)., खंडुजी गुलाब घोगरे (रा. साखरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी)., धानप्पा बिरप्पा बिरादार (रा. गुड्डापूर, ता. जत).यांच्यासह एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
आरोपींनी फिर्यादी दीपक केसरकर आणि त्यांच्या वडिलांशी संपर्क साधून, त्यांना मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मजुरांच्या आगाऊ (Advance) रकमेच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे उकळले. हे व्यवहार रोख स्वरूपात तसेच फोनद्वारे (ऑनलाइन ट्रान्सफर) करण्यात आले होते. एकूण ३९ लाख ४० हजार रुपये स्वीकारल्यानंतरही आरोपींनी प्रत्यक्षात एकही मजूर कामासाठी पाठवला नाही. जेव्हा फिर्यादीने पैशांची मागणी केली, तेव्हा त्यांनी पैसे देण्यासही नकार दिला.
हे प्रकरण भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या संबंधित कलमांनुसार दाखल करण्यात आले आहे. जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
विश्वासार्हता तपासून करारनामे करावेत
ऊसतोडणीच्या हंगामात टोळीमालक किंवा मुकादमांकडून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना अनेकदा घडतात. शेतकऱ्यांनी किंवा कंत्राटदारांनी मोठी रक्कम आगाऊ देताना संबंधित व्यक्तीची विश्वासार्हता तपासावी आणि शक्यतो अधिकृत करारनामे करण्याचे आवाहन असे पोलिसांनी केले आहे.





