भागोजी बाळाजी कीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, दि. ४ मार्च, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १३, शके १९४४
सूर्योदय : ०६:५६ सूर्यास्त : १८:४५
चंद्रोदय : १६:११ चंद्रास्त : ०५:४०, मार्च ०५
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – ११:४३ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – १८:४१ पर्यंत
योग : शोभन – १९:३७ पर्यंत
करण : बालव – ११:४३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ००:५६, मार्च ०५ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ०९:५३ ते ११:२२
गुलिक काल : ०६:५६ ते ०८:२५
यमगण्ड : १४:१९ ते १५:४८
अभिजित मुहूर्त : १२:२७ ते १३:१४
दुर्मुहूर्त : ०६:५६ ते ०७:४३
दुर्मुहूर्त : ०७:४३ ते ०८:३०
अमृत काल : ११:३० ते १३:१८

आज राष्ट्रीय सुरक्षा दिन ( औद्योगिक सुरक्षा सप्ताह प्रारंभ ) आहे

भागोजी बाळाजी कीर- भंडारी समाजातील, लक्ष्मीबाई आणि बाळाजी कीर हे त्यांचे आईवडील. भागोजींना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. घरच्या अठरा विसे दारिद्य्राने या मुलांना नियमित शालेय शिक्षण देणे बाळाजींना केवळ अशक्य होते. त्यामुळे मुलांचे बालपण पेठ किल्ला परिसरात खेळण्या-बागडण्यातच गेले.

गरिबीत संसार सांभाळताना वडिलांना घ्यावे लागलेले कष्ट भागोजींना बालपणीही अस्वस्थ करीत. ते लहान वयातही चाफ्याची फुले आणि फळे विकून त्या काळच्या चलनातल्या दोन-चार आण्यांची मदत घराला करीत. आर्थिक दुरावस्थेमुळे बाळाजी कर्जबाजारी झाले होते. परिणामी एके दिवशी सावकाराने कर्जवसुलीसाठी घरातले सामान बाहेर काढले. या घटनेचा भागोजींच्या मनावर खोल परिणाम झाला. याच सुमारास कोकणातल्या चाकरमान्यांचे कमाईसाठी मुंबईला जाणे सुरू झाले होते. भागोजींनी हाच निर्णय घेतला आणि दहा-बारा वयाचा हा मुलगा गलबतावरच्या एका तांडेलाच्या मदतीने मोफत प्रवास करून मुंबईत दाखल झाला.
पोटपाण्यासाठी मुंबईत आलेल्या निर्धन, निरक्षर भागोजींनी रोजगार शोधायला सुरुवात केली. अपार कष्टांच्या तयारीला नशिबाची साथ मिळाली. एका सुताराने त्यांना रंधा मारण्याच्या कामावर दोन आणे रोजाने ठेवून घेतले. जोडीला सुतारकामाचा भुसा विक्री आणि चर्नीरोड स्टेशनवर हमालीही भागोजींनी केली. दोन आण्याची कमाई चार-सहा आणे होऊ लागली.

भागोजी मुंबईतल्या पालनजी शापूरजी या प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाच्या संपर्कात आले आणि कीर कुटुंबाच्या उत्कर्षाचा मार्ग खुला झाला. पालनजींनी त्यांना सुतारकाम दिले. भागोजींची चिकाटी, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा आणि निरीक्षणातून व्यवसायकौशल्य आत्मसात करण्याची इच्छाशक्ती पाहून पालनजींनी त्यांना व्यवसायात भागीदारी दिली. या संधीचा प्रामाणिक लाभ घेत भागोजींनी मुंबईत अनेक दर्जेदार वास्तू उभारल्या. व्यवसाय विस्तारला आणि त्यांना भागोजीशेठ कीर ही एक प्रतिभावंत बांधकाम कंत्राटदार अशी ओळख मिळाली आणि त्याबरोबरच लक्ष्मीचा वरदहस्तही लाभला.

भंडारी शिक्षण परिषदेचे १९२० नंतरचे रत्नागिरी अधिवेशन त्यांनी स्वखर्चाने प्रायोजित केले होते. रत्नागिरीच्या पेठ किल्ला परिसरात आधी एक शाळा सुरू होती. त्यानंतर १९२२ ला रत्नागिरी किल्ल्यात पेठ किल्ला शाळेची एक शाखा स्थापन झाली. भागोजींच्या प्रयत्नाने १९२५ ला किल्ला शाळा स्वतंत्र झाली. दोन वर्षांत विद्यार्थिसंख्या ७० झाल्याने जागा अपुरी पडू लागली. भागोजींनी १९२९ पर्यंत २५० विद्यार्थी क्षमतेची दोन मजली इमारत बांधून दिली.

परिसरातल्या खेड्यांतून शिक्षणासाठी रत्नागिरीत येणाऱ्या भंडारी समाजाच्या मुलांकरिता त्यांनी मोफत वसतिगृह बांधले. नंतर ते सर्व घटकांना खुले झाले. दरवर्षी या शाळेतल्या एका मुलाला उच्च पदवीसाठी परदेशी जाण्याच्या खर्चाची तरतूदही त्यांनी केली. भागोजींनी १९३६ ला पेठ किल्ला शाळेलाही दुमजली इमारत बांधून दिली. आज या शाळा भागेश्वर विद्यामंदिर म्हणजेच रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ८ आणि ९ म्हणून ओळखल्या जातात.
शाळा व्यवस्थापनाला लागणार्‍या बाक, फळे, नकाशे, प्रयोगशाळेची उपकरणे, यासारख्या सर्व आवश्यक साहित्याचा खर्च भागोजी करीत. निवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह व जेवणा-खाण्याच्या खर्चाबरोबर किल्ला शाळेत प्रत्येक वर्षी वैशाखात विशेष पारितोषिकासह गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा पायंडाही घालून दिला. त्यादिवशी मुलांना खास पक्वान्नाचे जेवण देण्यात येई. मुलांमध्ये खेळ आणि व्यायामाची आवड जोपासण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्यही पुरवले.

या दोन संस्थांबरोबर भागोजींनी १९३६ मध्ये भंडारी समाजातील लहान मुलांसाठी भागेश्वर बालकाश्रम स्थापन केला. इथेही राहणे-खाणे मोफत असे. शाळा एकल विद्यालय स्वरूपाची, म्हणजेच एक शिक्षक असलेली होती. बालकाश्रमातल्या मुलांवर लवकर उठून व्यायाम, स्वच्छता, शिस्तपालन, आचरण व टापटीप याचे संस्कार केले जात. काही काळानंतर भंडारी समाजाबरोबरच इतर घटकांच्या मुलांनाही या संस्थांत प्रवेश मिळू लागला.

‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या महिला विद्यालयासाठी इमारत बांधून देण्याच्या कामाचा शुभारंभ १९३९ मध्ये झाला. भागोजींच्या हयातीत ती पूर्ण झाली नसली तरी १९४४ ला इमारत तयार झाली. आज भागेश्वर ज्ञानमंदिर या नावाने हे महिला विद्यालय ओळखले जाते. शिक्षणक्षेत्राशी निगडित अशा आणखी एका कार्याची भागोजींच्या नावावर नोंद आहे. व्यावसायिक शिक्षण विकासाला आवश्यक आहे हे भागोजींना माहीत होते. भंडारी समाजाला ते मिळावे याची त्यांना तळमळ होती. त्यापोटीच त्यांनी भागेश्वर बालकाश्रमात सुतारकामाचे प्राथमिक धडे देण्याची सोय केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या भागेश्वर मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या नोंदणीपत्रात भंडारी समाजासाठी व्यावसायिक शिक्षणशाळेचे ध्येय स्पष्ट नमूद केले आहे.

आपला उत्कर्ष भगवान शंकराच्या आशीर्वादाने झाला ही भागोजींची अतूट श्रद्धा होती. परिणामी त्यांनी रत्नागिरी किल्ल्यातल्या भागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून तो परिसर देखणा केला. रत्नागिरीतल्या शाळा, मुंबईतली भागेश्वर नावाची बांधकामे, दादरची हिंदू स्मशानभूमी आणि धर्मशाळा, आळंदीची धर्मशाळा, वाईतली भागेश्वर गोशाळा ही त्यांची काही बांधकामे.

धार्मिक अधिष्ठानाबरोबरच हिंदू समाजातला कडवा जातिभेद समूळ उखडण्याच्या कार्याला भागोजींनी सक्रिय पाठिंबा दिला. या संदर्भात संत गाडगेबाबा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही त्यांची श्रद्धास्थाने होती. दलित समाजाबरोबर सहभोजन, दलितांना मंदिरात मुक्त प्रवेश यासाठी त्यांनी या दोन्ही महापुरूषांना पूर्ण पाठबळ दिले. सावरकरांच्या कार्याबद्दल भागोजी कीर यांना अत्यंत आदर होता. त्यामुळे त्यांच्या कल्पनेतील पतितपावन मंदिर भागोजींनी प्रत्यक्षात उभे केले.
१८६७ : समाजसेवक , समाज सुधारक श्री भागोजी बाळाजी कीर यांचा जन्म ( मृत्यू : २४ फेब्रुवारी, १९४१)

घटना :
१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.

• मृत्यू :
• १९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
• १९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
• १९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
• १९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी , १९२०)
• १९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
• २०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी, १९२४)
• २००७: भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.
• २०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर, १९३०)

जन्म :
१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
१९२२: गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर , २००२)
१९२७ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठय प्रचारक दामोदर माधव उपाख्य दामुअण्णा दाते यांचा जन्म. ( मृत्यू : १ सप्टेंबर, २००२)
१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »