जिथं मी, तिथं शेतकरी आत्महत्या कमी!
भास्कर घुले – (मी साखर कारखाना बोलतोय )
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल…? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले हे खास सदर…
आतापर्यंत माझ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल पाहिला. काळ बदलत जाताना आपण पाहिला आहे. काळाबरोबर सर्वजण बदलले, त्याला शेतकरी देखील अपवाद नाही. काही बदल चांगले झाले, तर काही वाईट झाले. नको असलेले झाले. बदल कोणताही झालेला असला तरी देखील शेतकऱ्याचे राहणीमान उंचावले हे सत्य नाकारून चालणार नाही.
पूर्वीच्या काळाचा विचार केल्यास दुष्काळाचे सावट आल्यावर अन्नधान्याची टंचाई प्रचंड प्रमाणात भासत होती; परंतु शेतीमध्ये क्रांती झाली. अन्नधान्याचे एकरी उत्पन्न हायब्रीड बियाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढले आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. फळे, भाजीपाला व कडधान्याच्या बाबतीत तेच झाले. देशाची गरज भागवून निर्यात देखील करू शकलो.
मग असा विचार येतो की जर कारखान्यांची निर्मिती झाली नसती आणि भारतासारख्या शेतीप्रधान देशाने ऊस पिकासारखे नगदी पीक घेतले नसते, तर इतर मालाचा भाव कवडीमोल झाला असता आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना निश्चितपणे बसला असता. म्हणूनच ऊस पिकासारखा कल्पतरू शेतकऱ्यांचा तारणहार ठरला आणि त्यात मला माझे योगदान देता आले.
शेतकरी आणि कारखाना यांचे नाते अतूट आहे. शेतीमध्ये नफ्याची शाश्वती देता येत नाही. तरकारी पिके केल्यास कधीतरी चांगला भाव मिळतो. पण बऱ्याचदा उत्पादित केलेला माल कवडीमोलाने विकावा लागतो. पण उसाच्या बाबतीत अपवादाने असे होते. नफ्याचे प्रमाण कमी असले तरी शाश्वत उत्पन्न नक्कीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये माझ्यामुळे स्थैर्य आलेले आहे, हे नाकारून चालणार नाही. असे असताना देखील माझ्या बाबतीतले वास्तव कुणी समजून घ्यायला तयार नाही याची खंत वाटते.
“उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती”
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये एक म्हण प्रचलित होती, “उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी”. पण परिस्थिती बदलत गेली आणि “उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती” अशी स्थिती निर्माण झाली. थोडक्यात काय तर व्यापार आणि उद्योग जागेवर आहे. पण बळीराजा मात्र जगण्यासाठी धडपडत आहे.
रोज बातम्या वाचताना शेतकरी आत्महत्या हा बातमीचा कॉमन विषय झालेला आहे. शेतीसाठी कर्ज घ्यायचे उत्पन्न मिळाले तर फेडायचे न मिळाल्यास कर्ज वाढत जाते. चक्रवाढ व्याजाचे दुष्टचक्र पाठीमागे लागते आणि बँका पुन्हा कर्ज देत नाहीत. अशावेळी खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते आणि त्याची परतफेड न केल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून मरणाला कवटाळावे लागते. पण शेतकरी आत्महत्या का करतो हे सर्वांना समजत असले तरी त्याच्यावर उपाययोजना करण्यात मात्र तितक्या प्रभावीपणे लक्ष दिले जात नाही.
त्यातल्या त्यात समाधानी बाब म्हणजे माझ्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जवळपास नाही. कारण शेतकऱ्यांना माहिती आहे की, ऊस पिकवला कारखान्यावर दिला की त्याचे पैसे निश्चितपणे मला मिळणार आहेत. किमान घेतलेले कर्ज परतफेड करण्याइतपत उत्पन्न निश्चितपणे मिळते.
इतर पिकांमध्ये उत्पन्न कमी मिळाल्यास किंवा भाव न मिळाल्यास शेतकरी निमुटपणे सहन करतो. पण ऊसाला कमी भाव मिळाल्यास मात्र शांत बसत नाही. कारखान्यावर धावून येतो. आंदोलने होतात, त्याचे अनेक कडू-गोड अनुभव माझ्याकडे आहेत. पण तो उसाला चांगला दर घेतल्याशिवाय राहत नाही.
माझे मत असे आहे, की शेतकरी त्याच्या जागेवर अगदी बरोबर आहे. मी त्याच्या हक्काचे ठिकाण आहे. ऊस लावला त्याचे संगोपन केले आणि तो परिपक्व झाला की शेतकऱ्याची जबाबदारी संपते. इतर पिकांची कापणी करताना त्याला मजुरांची समस्या भेडसावते; परंतु उसाच्या बाबतीत मात्र त्याला मजुरांची चिंता करण्याची गरज वाटत नाही. ऊस लावला आणि पिकवला म्हणजे कारखाना शंभर टक्के घेऊन जाईल आणि आपले पैसे आपल्या बँक खात्यात जमा करेल. याची त्याला खात्री असते.
जीव थोडा आळसावला
पण मला कधी कधी असे वाटते माझ्यामुळे शेतकरी थोडासा आळशी झालेला दिसतो. कारण त्याला इतर पिकांसारखे उसाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही, ना मजुरांची काळजी, ना आपला माल विकायची काळजी.
त्याच्या शेतातून तोडून गव्हाणी पर्यंत ऊस आणतो आणि त्याला पैसे घरपोच करतो. मग मला सांगा शेतकऱ्याला माझ्या इतका भरवशाचा वाली कोण आहे? तरी देखील भांडण फक्त माझ्याशीच. ऊसशेतीला कष्ट नाही असे मुळीच नाही; परंतु तुलनेने इतर पिकांपेक्षा ऊस पिकासाठी कष्ट निश्चितपणे कमी लागतात. अलीकडच्या काळात ऊस पिकावर देखील थोडी फार फवारणी आणि मेहनत घ्यावी लागते हा भाग वेगळा. तरीपण माझ्यामुळे शेतकऱ्याला निवांतपणा निश्चितपणे मिळतो.
यातून वेळ मिळाल्यास तो सत्कारणी लावण्यापेक्षा इतर उद्योग जास्त प्रमाणात केल्याचे दिसून येते. मग त्यात राजकारणातला सहभाग व इतर अनुत्पादित गोष्टींवर दिलेले लक्ष. यामुळे शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या मुलांचे शेतीकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो आणि मग शेती परवडत नाही. उत्पन्न मिळत नाही. असा सूर निघतो.
शेतीत नवे प्रयोग करा
असे असले तरी शेतकऱ्यांच्या मुलांपेक्षा मुली मात्र जास्त शिक्षण घेत आहेत. मुलांचे शिक्षण कमी राहते. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीमध्ये नवनवीन उपक्रम करून शेतीचे यांत्रिकीकरण करावे व कमी श्रमात चांगली शेती करता येईल याकरिता प्रयत्नशील राहावे.
शेतकऱ्यांच्या मुलांना भेडसावणारी अत्यंत गंभीर समस्या म्हणजे शेतकरी पुत्राला जो शेतीत काम करतो त्याला वधू मिळेनाशी झाली आहे. हे अत्यंत विदारक दृश्य ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळते. अनेक शेतकरी तरुण नैराश्यग्रस्त झाल्याचे पहावयास मिळते. हे वास्तव असले तरी देखील माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काही तरुण शेतीमध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग करतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतर उद्योग व्यवसाय करतात.
साधारणतः दोन ते अडीच एकर शेती असली तरी देखील महिन्याकाठी वीस ते पंचवीस हजाराचे हमखास उत्पन्न मिळवणारे अनेक तरुण शेतकरी माझ्या कार्यक्षेत्रात पाहावयास मिळतील. मी म्हटल्याप्रमाणे माझ्या कार्यस्थळावर व कार्यक्षेत्रात अनेक व्यापार उद्योगांना संधी असल्यामुळे जे तरुण शेतीबरोबरच छोटे मोठे उद्योग करतात व ज्यांच्यामध्ये कर्तृत्वाची चुणूक दिसते. त्या शेतकरी युवकांबरोबर पदवीधर झालेल्या मुलीदेखील तयार होतात. अशाप्रकारे मी सामाजिक समतोलाचे काम देखील करत असतो.
आनंदाश्रू अनावर होतात
दिवाळीच्या सणामध्ये माझ्या सभासदांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी माफक दरात साखरेचे वाटप करत असल्यामुळे सर्वांची दिवाळी अतिशय गोड होते . त्याचप्रमाणे माझ्याशी कोणी किती भांडत असले की एक रकमी भाव द्या; पण मी दिवाळीसाठी काही ना काही पैसे राखून ठेवतो आणि ते पैसे शेतक-यांना दिवाळी मध्ये वाटप करत असतो. त्यामुळे महत्त्वाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. त्यातही साखरेला आणि इतर उपपदार्थांना चांगले भाव असतील, तर मी जादाचे पैसे दिवाळीत शेतकऱ्यांना हमखासपणे वाटत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मलाही माझे आनंद अश्रू अनावर होतात.
माझ्या कार्यक्षेत्रातील काही शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून उद्योजक झालेले आहेत. मी जर हमीपत्र दिले, तर बँकसुद्धा त्यांना कोटी दीड कोटीचे कर्ज उपलब्ध करून देते, त्यात काही सबसिडी देखील मिळते. त्यातून तरुण बेरोजगार शेतकऱ्यांना हार्वेस्टर, ट्रॅक्टर याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो व त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती होते.
आता माझ्या कार्यक्षेत्रात ऊसावर फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू झालेला आहे. त्यातही काही तरुण शेतकरी या व्यवसायाकडे आकर्षित झालेले आहेत. त्यातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे .
काही तरुण शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना साखर वाहतुकीसाठी ट्रकचा व्यवसाय सुद्धा उपलब्ध होत असतो. इथेनॉल निर्मितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी टँकर विकत घेऊन ते ऑइल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करत आहेत. तेही चांगले व्यवसायिक म्हणून नावारूपास येत आहेत.
माझ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर किंवा गावात बंगले बांधण्याची कामे सुरू केलेले आहेत, त्यातून ग्रामीण भागातील सिव्हिल इंजिनिअर लोकांना सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे तर मी फक्त शेतकऱ्याचा ऊस आणून त्यापासून साखर व उपपदार्थ तयार करत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या हातून कायम होत असतात आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. म्हणूनच मी ग्रामीण भागातील परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे.
अशाप्रकारे अनेक चांगल्या गोष्टी होत असताना एखाद्या दुस-या गोष्टींमध्ये थोडेसे कमी जास्त झाले तर माझ्यावर किती ओरड होत असते, चर्चेच्या किती फेऱ्या झ्डत असतात आणि किती दूषणे मला लोक देत असतात याची खंत वाटते. पण ती सल बोलून दाखवता येत नाही. अलीकडे तर नव्यानेच वेगळा ट्रेण्ड येऊ पाहत आहे. तो कारखाना प्रत्येकाची क्षमता वाढवत आहे.
शेतकऱ्यांनाही माझा ऊस एका दिवसात तुटला पाहिजे अशी भावना निर्माण झाल्यामुळे गाळप हंगाम १०० दिवसांच्या आत येऊन पोहोचला आहे. शंभर दिवस गाळप हंगाम करायचा आणि 265 दिवस सांभाळायचं, माझ्यासाठी अत्यंत कठीण काम आहे. परंतु आता किमान डिस्टिलरीमुळे तरी हंगाम थोडासा लांबतो त्यावर माझी गुजराण बऱ्यापैकी होते.
आमच्या स्पर्धेमुळे कमी क्षमतेचे आमचे भाऊबंद अडचणीत येतील, मोठे भाऊ मोठे होत जातील. त्यामुळे माझ्या छोट्या भावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आपला कारखाना तारणहार समजून, तो वाचावा म्हणून लवकर ऊस तोडणीच्या अपेक्षा जास्त धरू नये. ऊस लागवड करत असताना सर्वांनीच आडसाली लागवड करण्यापेक्षा कारखान्यांनी ठरवून दिलेल्या प्रोग्राम प्रमाणे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीचे नियोजन करावे व कारखान्याचा सीझन किमान 150 दिवस चालेल याची दक्षता घ्यावी म्हणजे मलाही दिवस चांगले राहतील आणि तुम्हालाही दिवस चांगले राहतील.
… तरच माझी साथ कायम राहील
सध्या कारखाना उभारणीच्या प्रचंड स्पर्धेमध्ये अनेक लोकांची मागणी असते की दोन कारखान्यांमध्ये अंतर कमी करावे. किंवा दोन कारखान्यांमधील अंतराच्या अटी पूर्णपणे काढून टाकावी. त्यामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्याला जादा भाव मिळेल.
दोन कारखान्यांमध्ये स्पर्धा निश्चितपणे असावी; परंतु दोघांच्या स्पर्धेमध्ये दोघेही उपाशी राहिले तर एक दिवस दोघांचाही शेवट होईल. म्हणून माझे मत असे आहे की आमच्या मध्ये निकोप स्पर्धा निश्चितपणे व्हावी ऊसदरामध्ये चढाओढ व्हावी, शेतकऱ्यांना दोन पैसे जादा देण्यामध्ये स्पर्धा असावी; परंतु ती स्पर्धा जीवघेणी नसावी.
स्पर्धा करून प्रतिस्पर्धी जगला पाहिजे आणि जिंकणाराही जगला पाहिजे याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे नाहीतर मग कोणी प्रतिस्पर्धी उरणार नाही आणि नंतर उरेल तोच अन्याय करायला सुरुवात करेल असे झाले तर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कारखान्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत असताना कारखाना वाईटच आहे हा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाजूला ठेवावा. मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठीच असेल याची जाणीव सर्वांनी ठेवावी. उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास माझ्या, पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मला साथ दिली पाहिजे. तुम्ही मला साथ दिली तर मी तुम्हाला निश्चितपणे साथ दिल्याशिवाय राहणार नाही.
आपण नेहमी ऐकले आहे की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास त्याचे सोने होते. त्याचप्रमाणे माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की तुम्ही इतर पिके निश्चित घ्या; पण त्याबरोबर जास्तीत जास्त उसाचे पीक घेऊन स्वतःच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या शेतात तुम्ही ऊस लावाल तर तुम्ही ऊस हे पीक न लावता तुमच्या शेतामध्ये कल्पवृक्षाची लागवड करत आहात, हे लक्षात ठेवा. कारण ऊस नुसतेच पीक नाही तर तो कल्पवृक्ष आहे.
तो तुम्हाला साखर देतो. तो तुम्हाला इंधन देतो. तो तुम्हाला सेंद्रिय खत देतो. तो तुम्हाला वीज देतो. तो तुम्हाला गॅस देखील देतो. या सर्व गोष्टी ऊस पिक देत असल्यामुळे ऊस पिकाला कल्पवृक्ष असं म्हणण्यात वावगे नाही. आणि शेतकऱ्यांना जर प्रगती साधायचे असेल तर त्याला माझ्याशिवाय इतर दुसरा कुठलाही सुकर मार्ग नाही म्हणून जास्तीत संस्थेची लागवड करा आणि तो सर्व माझ्याकडे काढण्यासाठी पाठवा ही सर्वांना विनंती. (क्रमश:)
(लेखक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत)