सरकारी नोकऱ्यांऐवजी स्वीकारली साखर कारखान्यांची सेवा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मी साखर कारखाना बोलतोय- 2

ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण आहे, तर तो साखर कारखाना. श्री. भास्कर घुले यांच्या लेखणीतून तो बोलू लागला आणि ग्रामीण अर्थक्रांतीची कहाणी सांगू लागला…. साखर उद्योगाचा महिमा असा झाला होता की, अनेकांनी सरकारी नोकऱ्यांऐवजी साखर कारखान्यांतील नोकरीला प्राधान्य दिले..(भाग २)

मी साखर कारखाना आहे. माझ्या निर्मितीनंतर मी जिथे उभा आहे तो परिसर व माझ्या कार्यक्षेत्रातील अनेकांचा माझ्याशी संपर्क येत असतो. सर्वजण माझ्याविषयी बोलत असतात. काही माझे गुणगान गातात तर काही माझ्यावर टीकादेखील करतात.

हे निमूटपणे मी सर्वच पाहत असतो. माझ्या बाबतीत बोलताना प्रत्येक जण आपल्या सोयीने बोलत असतो. अनेकांच्या अनेक अपेक्षा माझ्याकडून असतात. काही लोक माझ्यावर समाधानी असतात, तर काही लोक नाराज असतात. काही सत्य बोलतात, तर काही असत्य बोलत असतात. काही ठिकाणी एकसंधपणे सर्वजण माझ्या पाठीशी असतात, तर काही ठिकाणी त्यांच्यात गट-तट पडलेले असतात.

काही गोंधळ घालतात, तर काही शांतपणे साधक-बाधक विचार करून आणि चर्चा करून प्रश्न सोडवत असतात. सर्वसाधारपणे मला जोपासण्याचे काम केले जाते. बोटावर मोजण्याइतके लोक माझ्यावर टीका करत असतात. त्यात जर सत्य असेल, तर त्याचे मला फारसे काही वाटत नाही; पण गैरसमजांमधून माझी बदनामी करत असताना मला मात्र खूप वेदना होतात.
माझ्यासाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे.

माझ्यावर अवलंबून असणारे व माझी जोपासना करणाऱ्या सर्व जणांना मी त्रयस्थपणे पाहत असतो. एकदाच सर्व सांगणे शक्य नाही, तसेच ते तुम्हाला पचनारही नाही, म्हणून मी टप्प्या-टप्प्याने एकेका घटकाविषयी माझे मत मांडणार आहे. अनेक घटकांना माझी गरज असते; तसेच मलाही अनेक घटकांची मदत हवी असते. ज्यांच्यासाठी माझी निर्मिती झाली त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांविषयी व माझ्या उभारणी करणाऱ्या सभासदांविषयी आज आपण बोलू.

माझ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांविषयी बोलायचे झाल्यास प्रथमतः त्यांच्यामध्ये झालेले आर्थिक सामाजिक राजकीय बदल आपण पाहिले पाहिजे. फार मागे न जाता साधारणपणे 70 ते 80 च्या दशकाचा विचार केल्यास तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ शेतकऱ्यांसाठी कसा बदलला, हे आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. थोडंसं इतिहासात डोकावून पहिल्यास पन्नास वर्षांत झालेला कायापालट आपल्या लक्षात येईल.

पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती आपण थोडीशी समजावून घेऊ. त्यावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न अतिशय तोकडे होते नदीकाठच्या गावांमध्ये देखील संपूर्ण शिवार सिंचनाखाली नव्हता. 20 टक्के जमीन बागायत होती, तर बाकीची कोरडवाहू. आजच्यासारख्या सिंचनाच्या सुविधा त्याकाळी नव्हत्या. शेती करण्यासाठी ट्रॅक्टर वा इतर यंत्रे शेतकऱ्यांकडे नव्हती. बहुतांश शेती बैलांनीच केली जायची.

शेतीची मशागत करण्यासाठी बैल असायचे आणि बैल उपलब्ध व्हावेत म्हणून शेतकरी देशी गाय दाराशी पाळत असे. रासायनिक खतांपेक्षा शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. शेती पिकवताना आलटून पालटून पिके घेतली जायची. एक पीक घेतल्यानंतर शेतीला विश्रांती दिली जायची. शेतीची मशागत केल्यानंतर शेतजमीन उन्हात तापायची आणि त्यानंतर पीक घेतले जायचे. रासायनिक खतांचा वापर अतिशय गरजेपुरता केला जात होता. त्यामुळे शेत जमीन आपली सुपीकता टिकवून होती.

     खरीप आणि रब्बी असे दोनच हंगाम असायचे. त्यामुळे शेत जमिनीचे स्वास्थ्य टिकून होते. माझी निर्मिती झाल्यानंतर बारमाही शेती बहरली.  शेतीचे उत्पन्न कमी असले तरी शेतकऱ्यांची उपजीविका त्यावर होत होती. कारण शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अतिशय कमी होत्या. शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला जास्तीत जास्त दोन ड्रेस असायचे. एक कामावेळी घालण्यासाठी, तर दुसरा बाहेर कुठे जायचे असेल तेव्हा वापरण्यासाठी. 

शहर आणि गाव यांच्यातील अंतर जास्त होते. घरातला कर्ता पुरुष सोडला, तर इतर माणसे अभावानेच तालुक्याच्या ठिकाणी जायचे. जाण्या-येण्याची साधने खूप कमी. बस सोडून दुसरे काही नव्हते. ज्या भागात मी उभा राहिलो त्या परिसरात उसाच्या ट्रक हा परिवहनाचा मुख्य स्त्रोत झाला होता. ऊस खाली करून आल्यानंतर ट्रकच्या मागील बाजूस बसून प्रवास करणारे शेकडो प्रवासी तुम्हाला दिसत असतील. ट्रकच्या केबिनमध्ये बसून प्रवास करण्याची संधी मोजके लोकांनाच मिळत होती. ट्रक नसेल तर बैलगाडीतूनही प्रवास केला जायचा. त्या प्रवासाचा परमानंद घेणारा शेतकरी अत्यंत सुखी व समाधानी होता.

ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. एकाच घरात सख्खे आजोबा, चुलत आजोबा, सख्खा चुलता, चुलत चुलता, आजी, काकी, आत्या, मामा, मामी, सख्खी आणि चुलत भावंडं एकोप्याने राहायची. या सर्व कुटुंबाचा कर्ता एकच असायचा, तो कारभार करायचा आणि बाकीचे हात काम करायची. शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळ घरचेच असायचे.
त्यावेळी बारा बलुतेदार संकल्पना अस्तित्वात होती. शेतीची अवजारे व इतर गोष्टी पैसे न देता शेतातील धान्य देऊन दुरुस्त करून मिळायची. केस कापायचे असतील, तरी देखील त्यांच्याकडे जायचे केस कापून यायचे आणि त्या पोटी वर्षाला त्यांना धान्य किंवा शेतातील इतर भाजीपाला व कडधान्य दिले जायचे. पैशाचा वापर अभावानेच व्हायचा. घरात कुणी आजारी पडले तर आजीच्या बटव्याचा वापर केला जायचा. चार-पाच दिवस घरात उपचार करून देखील गुण आला नाही, तरच डॉक्टरकडे जायचे.

घरातली मुले शक्यतो गावात जी शाळा असेल त्याच शाळेत शिकायची. तिथून पुढे शिक्षण बंद व्हायचे आणि शेती करायला सुरुवात करायची. आजूबाजूच्या गावांमध्ये हायस्कूल असेल, तर दहावीपर्यंत शिक्षण घ्यायचे पुढच्या शिक्षणासाठी बोटावर मोजता येतील एवढेच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बीए किंवा बीकॉम व्हायचे. एखादा बी. एस्सी. व्हायचा. त्या काळामध्ये शहरातली मुले आणि खेड्यातली मुले यांच्यामध्ये खूप मोठे अंतर होते.

खेड्यातून जाणारी मुले लाजरी-बुजरी होती. मुलांचा पोशाख पायजमा शर्ट असायचा. पायात गावातल्या चांभाराने शिवलेली चप्पल असायची. मुलींची शाळा लवकर बंद व्हायची; पण चुकून जर पुढे ग्रॅज्युएशनसाठी गेली तर तिचा पोषाखसुद्धा अगदी साधा राहील. त्याला पूर्वी परकर – झंपर म्हणायचे. त्याही परिस्थितीमध्ये ज्यांना शक्य आहे ती मुले शिकत होती.

शेतीमध्ये काम करताना देखील घरातील सर्व सदस्य काम करायचे. शेतीला शेणखत पाहिजे व मशागतीसाठी बैल पाहिजे म्हणून जनावरे पाळली जायची. सर्व देशी जनावरे होती. दूध-दुभते भरपूर होते. दूध, दही, तूप भरपूर असायचे. घराची गरज भागवून शिल्लक राहिलेली इतरांना वाटली जायची. बारा बलुतेदारांचाही घरात मुक्त वावर असायचा. एकच पंगतीला जेवायला बसताना जातीपातीचा भेदभाव नव्हता.

शेतकऱ्याचे अन्न म्हणजे भाजी-भाकरी-कांदा एवढेच मर्यादित होते. वरण-भात ऐवजी दूध-भाकरीला पसंती राहायची. चुलीवर तापलेले खमंग दूध बासुंदीपेक्षाही गोड लागे. घरातली माणसे शेतीसाठी कमी पडल्यास रोजाने लोकांना बोलावले जाई. रोजंदारी होती बाईला एक रुपया व गडी माणसाला दोन रुपये. त्यातही त्यांचे कुटुंब चाले. हे मनुष्यबळही कमी पडले तर मग इर्जिक किंवा सावड होई. त्या परिस्थितीत देखील सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू होते. मन प्रसन्न होते, नाती निर्मळ होती. वडीलधाऱ्यांचा मान राखला जायचा.
गावात एखादा-दुसरा प्रतिष्ठित माणूस असायचा. त्याच्या शब्दाला किंमत होती. तो समोरून आल्यास गावातील सर्व लहान मुले बाजूला जाऊन बसत. मोठी माणसेसुद्धा त्याला सन्मान द्यायची. तोदेखील वेळे- काळेला सर्वांच्या मदतीला धावून जाई.

अन्‌ खिशात पैसा खुळखुळायला लागला!
कार्यक्षेत्रात माझी (साखर कारखान्यांची) उभारणी झाल्यानंतर परिस्थितीत हळुहळू बदल होत गेला. उसासारखे नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यावेळी उसाचा भाव टनाला 100 रुपयांपासून दीडशे रुपयेपर्यंत मर्यादित होता. तरीदेखील शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी कधी आग्रह धरला नाही. कारण त्याला एक रकमी पाच ते दहा हजार रुपये इतर कोणत्याच पिकातून मिळत नव्हते. ते माझ्यामुळे मिळायला लागले.

शेतकऱ्यांच्या उसासाठी माझे कार्यक्षेत्रही मर्यादित होते. झोनबंदी असल्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील माझ्या ‘बांधवां’ना ऊस देता येत नव्हता. उसाचे पैसे मिळताना पहिल्या टप्प्यात मोठी रक्कम मिळायची. त्यानंतर शेतीचा लागवड हंगाम सुरू करताना जूनमध्ये पैसे मिळायचे. कधी पोळ्याला तिसरा हप्ता मिळायचा व शेवटी दिवाळीला उरलेले पेमेंट व्हायचे. त्या पेमेंटमधून शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हायची.

त्यावेळी सासरी गेलेल्या आत्या, बहिणी, आत्यांची मुले, बहिणीची मुले सगळे एकत्र शेतकऱ्याच्या घरी यायचे. गोडधोड खाऊन दिवाळी साजरी केली जायची. प्रत्येकाच्या वाट्याला एक लाडू, एक करंजी एवढेच यायचे आणि दिवाळीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण असेल, तर त्या जेवणातला आनंद काय वर्णावा. आजच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवणही फिके पडेल.

त्या काळात बी-बियाणे तयार करताना दाणेदार कणसे निवडायची, भुईमुगाच्या शेंगा चांगल्या भरलेल्या पाहिजे. त्यातील दाणे बी म्हणून वापरायचे, चांगले कांदे निवडून ते टांगून ठेवायचे आणि नंतर ते कापून शेतात लावायचे. त्यापासून बियाणे तयार करायचे आणि कांद्याची लागवड करायची. तेव्हा बियाण्यांमध्ये कुठेही शेतकरी फसवला गेला नाही.

उसाची लागवड करत असताना स्वतःच्या शेतामधील चांगले वाढलेले ऊस काढायचे, त्याची टिपरी करायची आणि त्याची लागवड करायची . त्यातून उरलेले उसाचे पेरे जनावरांना चारा म्हणून वापरले जायचे. घरचे बेणे असून सुद्धा उसाचे उत्पन्न चांगले यायचे, कारण शेतात भरपूर शेणखत टाकून स्वतःच्या शेतातील निवडक उसाचा वापर बेणेसाठी केला जायचा.

सुरुवातीच्या काळामध्ये तर सिंचनासाठी चामड्याची मोट असायची. त्यानंतर डिझेल इंजिन आले, उशिराने इलेक्ट्रिक मोटर व पंप आले. त्या वेळच्या पिढीने या सगळ्या अडचणींवर मात करत शेती केली. आपले प्रपंच उभे केले, गरजा मर्यादित ठेवल्या आणि कष्ट मात्र अमर्यादित केले. तेच शेतकरी व त्यांची पुढची पिढी आज अतिशय आधुनिक पद्धतीने शेती करत आहे व भरपूर उत्पन्न घेत आहे.

तर ही अशी असायची शेतकऱ्याची जीवनपद्धती. त्याला मी काय दिले, तेच तुम्हाला सांगणार आहे. ऊस नगदी पीक असल्याचे अनुभवायला आल्यापासून शेतकऱ्यांनी शेती करण्याची पद्धत बदलली. तो नदीच्या कडेला किंवा जमिनीत पाणी असेल, अशा ठिकाणी विहीर खोदू लागला. तिथून पुढे बागायत जमिनीपासून जिरायत क्षेत्रापर्यंत पाईपलाईन करू लागला व आपली संपूर्ण शेती बागायत केली आणि इतर पिकांपेक्षा ऊस पिकाला प्राधान्य देऊ लागला. कारण ऊस पीक उत्पन्न शाश्वत असल्यामुळे सोसायटीमार्फत त्याला कर्ज मिळत होते. पाईपलाईनसाठी घरासाठी शेतीच्या विकासासाठी त्याला प्रत्येक गोष्टीला पैसा कर्जरुपाने उपलब्ध होऊ लागला आणि शेतकऱ्यांमध्ये हळूहळू बदल होत गेला. त्याची आर्थिक ,सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय व वैचारिक प्रगती होऊ लागली.

जस-जसे उसाचे क्षेत्र वाढत गेले, तस-तसे मलाही माझ्या क्षमतेएवढा ऊस मिळू लागला आणि मी पूर्ण क्षमतेने चालू लागल्यामुळे त्या परिसरातील परिस्थिती बदलली. मधल्या काळामध्ये ग्रामीण भागात मला कामधेनू, भाग्यलक्ष्मी, विकास मंदिर या उपमा लोकांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. ऊस लागवड केल्यानंतर साधारणपणे माझा हंगाम दिवाळीच्या आसपास चालू व्हायचा आणि होळीच्या आसपास संपायचा. माझी धुराडे पेटली की शेतकऱ्यांची चूल पेटायची ती दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीचे गोडधोड पक्वान्न बनवण्यासाठी.

माझा गाळप हंगाम चालू झाला की माझा परिसर व कार्यक्षेत्रामध्ये नवचैतन्य यायचे. सगळीकडे लगबग सुरू व्हायची ऊसतोड मजूर गावा-गावात येऊन कोप्या (खोपी) टाकून राहायची. शेतकरी त्यांना आपुलकीने आणि ममतेने सहारा द्यायचे. सर्व प्रकारची मदत करायचे. त्यांना राहायला जागा द्यायचे. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करायची आणि ते ऊस तोडणी मजूर म्हणजे आपले पाहुणेच आहेत, अशी भावना असायची.

त्यामुळे ‘अतिथी देवो भव’ या भावनेने शेतकरी त्यांना सांभाळायचा. कारण त्याचे स्वमेहनतीने पिकवलेले वर्ष-दीड वर्ष लेकराच्या मायने वाढवलेले पीक तो तोडत असे. तोच ऊस कारखान्याला गेल्यावर माझी दिवाळी आनंदाने साजरी होणार आहे, ही भावना त्याच्या मनात असायची आणि त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजूर हातात हात घालून कामे करायचे.
ऊस तोडणीला सुरुवात झाल्यावर ऊस भरण्यासाठी येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर व क्लिनर यांना शेतकऱ्यामार्फत खास मेजवानी असायची. शाकाहारी किंवा माळकरी कुटुंब असेल तर गोडधोड जेवण दिले जायचे. घरातली माणसे ज्या प्रेमाने लेक-जावयाचं स्वागत करायची, तसेच दणक्यात त्यांचे स्वागत व्हायचे. ज्यांच्या घरात कोंबड्या पाळल्या जायच्या, त्या घरात यांच्यासाठी हमखास कोंबडी कापली जायची.

ऊस ड्रायव्हर आणि क्लिनर यांना संपूर्ण गाळप हंगामामध्ये कधीही घरून डबा आणण्याची गरज भासत नव्हती, एवढे प्रेम आणि जिव्हाळा त्यांच्याविषयी शेतकऱ्यांना होता.

कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांसाठी देवदूतच… स्लीप बॉय व फिल्ड मुकादम यांना मानसन्मान असायचा. शेती अधिकारी व त्यांचे ओव्हरसीयर यांचा रुबाब वेगळाच होता. त्या काळात अनेक कृषी पदवीधारकांनी शासकीय नोकरीऐवजी साखर कारखान्याच्या नोकरीला प्राधान्य दिले. काहींनी तर शासकीय नोकऱ्या सोडून कारखान्याच्या नोकऱ्या स्वीकारल्या. शेतीचा ओव्हरसीयर रुबाबात बुलेट गाडीवरून फिरायचे. 

कालांतराने मला गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होऊ लागला. साखरेची मागणी वाढत गेली आणि शेतकरी उसापासून चांगले उत्पन्न मिळते म्हणून उसाचे क्षेत्र वाढवत गेले. शेतकऱ्याने ऊस वाढवल्यामुळे कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येऊ लागल्या. त्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी रस्ते करणे छोटे-मोठे बंधारे बांधणे, ओढ्यानाल्यांवर साकव व छोटे पूल उभारणे अशी विकासाची कामे माझ्या कार्यक्षेत्रात माझ्यामुळे मार्गी लागू लागली.

माझी जशी प्रगती होऊ लागली, तसतसा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होत गेला. हळुहळू उसाचा भाव वाढत गेला, दोन पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळू लागले. त्याचे राहणीमान बदलले. शेतकऱ्यांची मुले शिकू लागली. माझ्या परिसरामध्ये माझ्यामुळे शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज इत्यादींची उभारणी झाली. सभासदांची व शेतकऱ्यांची मुले गावातच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शिक्षित झाली. त्यातूनच शेतकऱ्यांच्या घरातसुद्धा डॉक्टर, इंजिनिअर, वकील तयार झाले.

शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले आणि त्याचे राहणीमानी बदलले. माझ्यामुळे ग्रामीण पेहराव करणारी शेतकऱ्यांची मुले राहणीमानाबाबत शहरी मुलांशी स्पर्धा करू लागली. ऊस शेतीमुळे व माझ्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास झाला, शेतकऱ्याच्या हातात अधिकचे दोन पैसे मिळायला लागल्यामुळे उच्च शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मुलांच्या वाटा मोकळ्या झाल्या. प्रगतीचे मार्ग सापडले आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होत गेला.

माझ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. शेतकऱ्याकडे पैशाने पैसा वाढत गेला. झोपडीत राहणारा शेतकरी आता पक्के घरे बांधू लागला. त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य आले. शेतकरी कुटुंबाचे राहणीमान बदलले. सायकली जाऊन घराघरांत मोटरसायकली येऊ लागल्या. शेतकरीसुद्धा चारचाकीमधून फिरू लागला. शेतकऱ्याचे परावलंबित्व कमी झाले, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणावर चांगला खर्च करण्याएवढी सधनता त्याच्याकडे आली. मुले उच्चशिक्षित होऊन उच्चपदस्थ अधिकारी झाले.

माझ्या कार्यस्थळावर इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज झाल्यामुळे घराघरांत इंजिनियर – डॉक्टर झाले. त्यासाठी त्यांना फीमध्ये सवलत मिळू लागली. शेतकरी व सभासदांच्या मुलांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळू लागले. शेतकऱ्यांच्या मुलीदेखील शिकू लागल्या आणि पुढची पिढी सुशिक्षित होऊ लागली. मुलीची लग्ने झगमगाटात होऊ लागली. साधे घर जाऊन बंगला आला. शेतकऱ्यांची जसजशी आर्थिक प्रगती होऊ लागली, तशी त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढली.

सार्थ अभिमान
हा बदल माझ्यामुळे झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. बागायत क्षेत्र वाढले… सिंचनाच्या सुविधा वाढल्या… उसाचे उदंड पीक येऊ लागले… प्रति टन शेकड्यात मिळणारा ऊस दर हजारात मिळू लागला.
ऊस पिकाऐवजी इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कधी लॉटरी लागल्याप्रमाणे प्रचंड दर मिळतो. तर कधी उत्पादन खर्चही निघत नाही. लाखोंनी खर्च करायचा आणि उत्पन्न मात्र हजारात घ्यायचे अशी अवस्था बऱ्याच वेळा इतर पिकांची झाल्याचे तुम्ही पाहत असताच.
माझे मात्र तसे नाही. माझ्याकडे ऊस आणल्यास शाश्वत उत्पन्न मिळते. ते किती कमी-जास्त हा तुलनेचा भाग वेगळा. कितीही वाईट प्रसंग आला, तरी किमान केलेला खर्च तरी 100% निघतो. इतर वेळी चांगला मोबदला मिळतोच, मिळतो.
शेतकऱ्याची जी प्रगती झाली आहे, ती माझ्यामुळे झाली हे कोणालाही नाकारता येणार नाही. मी फक्त शेतकऱ्याची प्रगती करून थांबलो नाही, तर माझ्यामुळे संपूर्ण परिसराचादेखील विकास झाला. दळणवळणाची साधने तयार झाली. पूर्वी एका घरात एक वाहन असायचे, आज शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतःची बाईक तरी आहे, शिवाय अनेकांकडे बाईक अन्‌ चारचाकी गाडीही आहे.

जशी शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली, तसे त्याच्या गरजा वाढत गेल्या. एखाद्या ड्रेसवर भागवणारे शेतकऱ्याच्या घरातील सदस्य आज वर्षाला डझनाने ड्रेस, चपला घेऊ लागलेत. शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. शेतकऱ्यांच्या मुलाचा पॉकेट मनी वाढू लागला. शेतकरी कुटुंबांची क्रयशक्ती वाढल्याने एकूणच अर्थकारणाला गती मिळाली. शेतीखेरीज इतर क्षेत्राचाही फायदा माझ्यामुळे होऊ लागला. गावात-परिसरात विविध दुकानांची, हॉटेलांची संख्या वाढली.

परिस्थिती बदलत गेली तशी एकत्र कुटुंब व्यवस्था सुद्धा मोडीत निघू लागली. स्वतंत्र कुटुंब व्यवस्था उदयास आली. त्यामुळे शेतीचे तुकडे वाढले. शेतकऱ्यांची प्रतिडोई शेतीक्षेत्र कमी झाले. पूर्वीच्या काळी उत्पन्न कमी असूनही गरजा कमी असल्यामुळे शेतकऱ्याचं ‘बॅलन्स शीट प्रॉफिट’ मध्ये होते. ते आता उत्पन्न वाढूनही, गरजा वाढल्यामुळे ‘लॉस’ मध्ये जायला सुरुवात झाली. त्यातच कारखान्यांची संख्या वाढली आणि शासनाने झोनबंदी उठवली. झोनबंदी उठवल्यामुळे शेतकरी जो कारखाना जास्त भाव देईल त्या माझ्या बांधवांकडे ऊस द्यायला स्वतंत्र झाला.

आतापर्यंत माझ्यामुळे झालेली शेतकऱ्यांची प्रगती शेतकरी विसरू लागला. त्यात शेतकऱ्याचा दोष नाही. देशामध्ये मजूरांपासून कारखानदारांपर्यंत आणि शिपायापासून सचिवापर्यंत, सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत, तसेच टपरीधारकापासून ते मॉलपर्यंत सर्वांनीच प्रगती केली. मग शेतकऱ्यांनी मागे का राहावे?

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अल्प काळाकरता का होईना हजारच्या भावाने टोमॅटो क्रेटची विक्री केली. टोमॅटोचा भाव किलोला दोनशे रुपयांच्या पुढे गेला म्हणून टाहो फोडणारा ग्राहक. आज शेतकऱ्याची टोमॅटो रुपया किलोने घ्यायला सुद्धा तयार नाही. शेतकऱ्यावर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. अशा अस्थिर शेती व्यवसायामध्ये मी शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडलेले नाही. माझ्यापासून शेतकऱ्याला थोडेसे कमी का असेना; पण निश्चित मिळेल. ते शाश्वत आहे.

एफआरपी ठरला वरदान
काही वर्षांपूवीर् ‘एफआरपी’सारखा कायदा आला. तो शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरला. पूर्वी शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात आल्यानंतर कारखान्यात होणारे सर्व खर्च वजा जाता उर्वरित पैसा शेतकऱ्यांना ऊस दराच्या रूपाने अदा केला जायचा. आता मात्र एफआरपीचा कायदा आल्याने, सर्वप्रथम शेतकऱ्याच्या ऊसाला ठरवून दिलेला हमीभाव आधी अदा करायचा, मग उरलेल्या पैशातून कारखान्याने इतर खर्च भागवायचे.

हे करत असताना बऱ्याच वेळा माझ्यासाठी कसरतीचा काळ येत असे. माझ्याबाबत कितीही काटकसर केली, तरीदेखील येणारे उत्पन्न आणि उसाचा दर याच्यात तफावत राहते आणि मग सरकार विविध योजनांद्वारे कर्जरुपाने पैसे उपलब्ध करून देते; पण शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव द्यावाच लागतो. परिणामी माझा संचित तोटा निश्चितपणाने वाढतो.

साखरेचे दर व इतर उत्पन्न कमी असताना तोटा सहन करून शेतकऱ्यांना भाव दिला जातो आणि ज्या वेळेला थोडेसे उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांना ऊस दर देऊनही काही पैसे शिल्लक राहतात, त्यावेळेला शेतकरी एफआरपीपेक्षा जास्त दराची अपेक्षा करतो.

मागील तोटा कसा भरून काढायचा हा प्रश्न माझ्यासमोर काही उभा राहतो. यात शेतकऱ्याचे यत्किंचितही चुकत नाही आणि माझी त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, कारण माझे प्रथम प्राधान्य शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकवला तरच माझी चाके फिरतील. शेतकरी वजा केला, तर माझे वेगळे अस्तित्व शिल्लक राहत नाही. शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन मिळावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.

मी जसा शेतकऱ्यांचा विचार करतो, तसा शेतकऱ्यांनीही माझा विचार करावा आणि हा कारखाना माझाच आहे हा टिकला तर मी टिकेन ही भावना मनामध्ये जोपासावी. माझे चुकत असेल तर मला शिक्षा निश्चितपणे द्यावी. आपण दोघांनीही हातात हात घालून मार्गक्रमण केले पाहिजे. मला तोटा सहन करायला लावून जास्त दराची अपेक्षा केली, तर मात्र आपल्या दोघांचेही नुकसान होणार आहे. म्हणून मला शेतकऱ्यांकडून काही अपेक्षा आहेत.

शेतकऱ्यांकडून माझ्या अपेक्षा
माझा आत्मा हा शेतकरी असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या उसाला कमी भाव देता कामा नये. माझ्या चालकांनी काटकसरीने मला चालवावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पदरात द्यावे ही माझी मनोमन इच्छा आहे; परंतु शेतकऱ्यांनीदेखील ऊस शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांची ‘लँड होल्डिंग’ कमी झाल्यामुळे आता क्षेत्र वाढणार नाही. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन कसे करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. एकरी उत्पन्न वाढवत असताना उसावरील खर्च वाढू न देता कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून उसाचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि एकरी उत्पन्न वाढविले पाहिजे.


आज माझ्या कार्यक्षेत्रात अनेक शेतकरी असे आहेत की जे एकरी शंभर टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतात. सर्वांना शंभर टन शक्य नसले तरी किमान सरासरी एकरी उत्पन्न 80 टनांपेक्षा कमी राहणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. एफआरपी सारखा कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी देखील तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात जर तुमचे एकमेव उत्पन्न वाढले तर माझ्या काही कारणामुळे आजारपणांमध्ये थोडेफार इकडे तिकडे झाले तर तुमचे उत्पन्न कमी होणार नाही.

काही बाबतींमध्ये माझी मशिनरी जुनी झाली आहे. काही ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर करून माझ्या मशिनरीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील हा कारखाना माझा आहे ही भावना जोपासावी. सध्या काळ बदलतोय इथेनॉल, कोजन व इतर उपपदार्थांमुळे मला चांगले दिवस येणार आहेत. मी निश्चितपणे सक्षम होणार आहे. मी सक्षम झालो की, शेतकऱ्यांना एफ.आर.पी. पेक्षाही जास्त भाव देऊ शकेन.

पण मला सक्षम होण्यासाठी फार नाही पण थोडीशी उसंत सभासद व ऊस उत्पादकांनी द्यायला हवी असे माझे प्रांजल मत आहे. याचा अर्थ तुम्ही कमी भाव घ्यावा, असे मी अजिबात म्हणणार नाही; परंतु चढाओढीमध्ये मी कमकुवत होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे.

सभासद व ऊस उत्पादक शेतकरी हे माझे मायबाप आहेत. मी ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलाय, त्याचप्रमाणे आता तुम्हीदेखील माझ्यामध्ये काही बदल घडवून आणताना सहकार्य मात्र केले पाहिजे. तुम्ही स्वतःचे नुकसान करून माझ्यासाठी योगदान द्यावे ही माझी मुळीच इच्छा नाही; परंतु मीदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम राहील यासाठी तुम्ही काही ना काही केले पाहिजे.

मला दोष देणे. माझ्यावर आगपाखड करणे व मला बदनाम करणे या गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात कारण माझा जन्मच शेतकऱ्यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी झाला आहे हे मी आजपर्यंत सिद्ध केले आहे आणि इथून पुढे देखील करणार आहे. राजकारणापायी माझा बळी जाईल आणि मी उद्ध्वस्त होईन असे कोणतेही कृत्य शेतकरी कधीच करणार नाही याची मला खात्री असली, तरी देखील माझ्या बाबतीत काही अफवांना बळी न पडता तुम्ही सदैव माझ्यासाठी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहाल, ही अपेक्षा मात्र मी कायम बाळगून आहे.

आजच्या काळातला शेतकरी अतिशय सुज्ञ आणि व्यावहारिक झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान त्याच्याकडे उपलब्ध आहे; पण त्या ज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा ही माझी माफक पेक्षा आहे. शेतकऱ्यांनी माझ्याकडून नेहमी अपेक्षा ठेवाव्यात, यात गैर काही नाही आणि मलाही त्याचं काही वाटत नाही; परंतु या स्पर्धेच्या काळामध्ये शेतकरी हाच माझा मालक आहे याची पूर्ण जाणीव मला आहे. काही चुकत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे बोट ठेवले पाहिजे. क्रमश:


(लेखक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »