भास्कर घुले यांना *महाराष्ट्र महागौरव* पुरस्कार प्रदान

पुणे : गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योगात योगदान देणारे श्री. भास्कर घुले यांना, येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धडाडीचे युवा नेते सत्यशीलदादा शेरकर आवर्जून उपस्थित होते.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (महाराष्ट्र) च्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. कला, समाजसेवा, उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड केली जाते. नव माध्यमांमध्ये काम करणारे महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार डिजिटल पत्रकार या संघटनेचे सदस्य आहेत.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा प्रवास ‘रोजंदारी कामगार ते साखर कारखान्याचे एमडी’ असा थक्क करणारा आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘महाराष्ट्र महागौरव’ पुरस्कार राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांचीही व्यासपीठावर उपस्थती होती.
भास्कर घुले यांनी सत्यशीलदादा शेरकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. यावेळी सौ. घुलेदेखील उपस्थित होत्या.
त्यांनंतर ‘शुगरटुडे’शी बोलताना त्यांनी, पुरस्काराचे श्रेय चेअरमन सत्यशीलदादा आणि आजवरच्या प्रवासातील सहकाऱ्यांना दिले. आजचा दिवस माझ्यासाठी ‘सुवर्ण दिन’ आहे. आमचे चेअरमन सत्यशीलदादा स्वत: वेळ काढून माझे कौतुक पाहायला आले, हा दुर्मीळ योगायोग आहे. त्यांचे मला मार्गदर्शन मिळाले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो, तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (महाराष्ट्र) चा देखील मी ऋणी आहे, असे उद्गार घुले यांनी काढले.