कार्यातून तळपणारा ‘भास्कर’!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विविध पुरस्कारांनी गौरवलेला आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना…. या कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक अर्थात एमडी श्री. भास्करराव घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, पण घुले यांना खडतर आव्हाने पेलणे आवडते. आव्हानांच्या वादळांशी खेळणे त्यांचा स्वभाव बनला आहे.
त्यामुळे ते अनेक सन्मानांचे आणि पुरस्कारांचे धनी बनले आहेत. नुकतेच त्यांना वाढदिवसाचे मोठे गिफ्ट मिळाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अत्यंत मानाचा ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

माणसाची खरी ओळख त्याच्या कामाने होते. कार्यकारी संचालक पदावर रुजू होताच घुले यांनी, कारखान्यात आणि परिसरात विकास कामांची सुरुवात केली आणि विकासाची गंगा ही आपल्या जुन्नर तालुक्यात अधिक विस्तीर्ण केली, कामाचे अचूक नियोजन, सर्वांना सोबत घेत त्यांच्या कामाचेही कौतुक करणारे ‘तत्त्वनिष्ठ’ असे नेतृत्व म्हणजेच श्री. घुले!

शेवट हीच खरी सुरुवात आहे, या मूलभूत विचाराने वेगळी दिशा एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने ते सतत कार्यरत असतात. तसेच त्यांचा संयमीपणा व निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या कामांचा झपाटा, प्रशासनावरील अभ्यासूपणाची पकड यामुळेच श्री विघ्न सहकारी साखर कारखान्यातील कामांना गती मिळाली आहे. अभ्यासू, संयमी व विकासाभिमुख, कर्तुत्ववान नेतृत्व असे त्यांच्याकडे पाहिले जाते.

कधीही न थकणारा ऊर्जेचा स्त्रोत व एकाच वेळी अनेक पदभार स्वीकारणारे, समर्थ नेतृत्व करणारे कार्यकारी संचालक, लेखक, विद्यार्थी या वेगवेगळ्या भूमिकेतून साकारलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच भास्करराव!

त्यांच्या कामकाजाचा 35 वर्षांचा एकूण अनुभव पाहता, या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. सांगायचं झालं तर सिव्हिल इंजिनियर पासून ते सेक्रेटरी पदापर्यंत, सेक्रेटरी पदापासून ते कार्यकारी संचालक पदापर्यंत त्यांनी केलेले कार्य हे अलौकिक आहे. साखर क्षेत्र आणि सहकार विश्वाला समर्पित शुगरटुडे या मासिकाचे ते नियमित लेखक असून डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर व महाराष्ट्र राज्य मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशनचे खजिनदार म्हणून पदभार सांभाळत सर्वत्र आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.

तुमच्यात दडलेली एक अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे व आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यावर पेलताना येणाऱ्या आव्हानांना सामना कसा करायचा आणि आपली मनोवस्था कायम सकारात्मक कशी ठेवायची, याबद्दल ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. कसं लढायचं आणि आलेल्या परिस्थितीचा सामना नेटाने करत कसं पुढे निघायचं याबाबत ते नेहमी सजग असतात.

क्षेत्र कोणतेही असो संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला अविभाज्य भाग आहे, ज्याला आपण कधीच नाकारू शकत नाही. श्री. घुले हे त्याला कसे अपवाद असतील? त्यांच्या वाट्याला सुरुवातीपासून संघर्ष आला. मात्र त्यामुळे नाउमेद न होता, कठी परिस्थितीची यशस्वी मुकाबला करतानाच, नव्या आव्हानात्मक संधी कशा शोधायच्या, हे ते शिकत गेले आणि संघर्षाच्या भट्टीत तावून, सुलाखून निघत शंभर नंबरी सोन्याप्रमाणे अधिकच झळाळत गेले. आपल्या कामातून त्यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आज साखर उद्योगात त्यांनी गाठलेली उंची अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत तर आहेच, शिवाय श्री विघ्नहर कारखान्याची धुरा सांभाळताना युवा नेते, चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचे त्यांना मिळणारे मार्गदर्शन हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्येक कामगार, कर्मचाऱ्याची नाते

एखादी मोठी संस्था कार्यक्षमपणे चालताना संस्थेच्या प्रमुखाचा दरारा महत्त्वाचा असतोच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते सर्व कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक नातं निर्माण करणं. श्री. घुले यांनी सर्वांशी असे नातेबंध निर्माण केल्याने श्री विघ्नहर कारखान्यातील प्रत्येक जण एका परिवाराचा घटक म्हणून काम करतो. त्यामुळे प्रत्येकाचे कारखान्याच्या प्रगतीत उत्तम योगदान मिळत आहे. सर्व सहकारी कर्मचारी कामगार यांच्याकडे एक पालक म्हणून दृष्टिकोन डोळसमोर ठेवून त्यांनी सर्वांना न्याय देण्याचे काम केलेले आहे.

कोणत्याही कामगाराला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास साहेब माझ्या पाठीशी उभे राहतील याची खात्री त्यांनी प्रत्येकाला करून दिली. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या समर्थांच्या उक्ती प्रमाणेच ते कायम सर्वांच्या पाठीशी उभे राहतात. आपल्या कामावर आणि श्रमावर निष्ठा असली पाहिजे, याची जाणीव ते प्रत्येकाला करून देत असतात.

कारकीर्दीची सुरुवात रोजंदारी कर्मचारी म्हणून करत आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर जाणारे, श्री विघ्नहर कारखान्याची गाळप क्षमता विक्रमी वेळेत दुप्पट करणारे, राज्याचा गाळप हंगाम उत्तम आणि विक्रमी व्हावा यासाठी ८० कि. मी. ची पायी वारी करून आळंदीला जाऊन साकडे घालणारे, कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणारे, सतत कामात व्यग्र असतानाही वाचन आणि लेखन यासाठी वेळ देणारे, नियमितपणे लिहिणारे, सतत नवे लक्ष्य ठेवणारे…. असे हे एक अत्यंत आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नाव भास्कर आहे, भास्कर म्हणजे सूर्य! ते आपल्या कार्यातून सतत तळपत असतात, साखर उद्योगाला आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत असतात…

त्यांना वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »