पगार कितीही असो, काम मात्र झोकून!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी…

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले भास्कर घुले यांचे हे वाचनीय सदर ‘मी साखर कारखाना बोलतोय (भाग 8)

-भास्कर घुले

मी साखर कारखाना आहे, म्हटल्यावर माझ्यासोबत माझे साखर कामगार आलेच. मी आजपर्यंत माझ्याशी संबंधित अनेक घटकांवर माझे मनोगत व्यक्त केले. आज मी बोलणार आहे ते माझ्यासोबत कायम राहणारे माझे साखर कामगार.


कामगार म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो चाकरमानी. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये नोकरी करण्यासाठी पुरेशा संधी नव्हत्या. तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचा सेक्रेटरी व सोसायटीत काम करणारे मोजकेच कर्मचारी; तसेच ग्रामपंचायतचे एक किंवा दोन कर्मचारी यापेक्षा वेगळा रोजगार पूर्वी ग्रामीण भागात उपलब्ध नसायचा.

जेव्हापासून माझा, म्हणजे साखर कारखानदारीचा उदय झाला, तेव्हा ग्रामीण क्षितीजावर संधींचा नवा सूर्योदय झाला. माझे कार्यक्षेत्र वाढत गेले व माझी संख्या वाढली तेव्हापासून ग्रामीण भागामध्ये साधारणपणे माझ्या कार्यक्षेत्रातील किमान ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. साधारणपणे 25 ते 30 वर्षापूर्वी माझे काम पारंपरिक पद्धतीने चालत होते. आधुनिकीकरण किंवा संगणकीकरण झालेले नव्हते. त्यामुळे कामगारांची संख्या भरपूर असायची आणि त्यातही सहकारी साखर कारखान्याची निर्मिती ही ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य मोबदला देण्यासाठी झाली, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीचा मूळ उद्देश देखील माझी स्थापना करण्यामागे होता.

Bhaskar Ghule Column part 8


जिथे जिथे माझी उभारणी होत असे, तिथे बोटावर मोजण्या इतके तांत्रिक कर्मचारी किंवा कुशल कामगार घेतले जात असत. कुशल किंवा तांत्रिक शिक्षण घेतलेले अगदी 50 ते 60 कामगार असायचे. बाकीचे सर्व कामगार अल्पशिक्षित किंवा अकुशल असायचे.

अगदी ऑफिस स्टाफमध्ये काम करणारे देखील दहावी-बारावी किंवा फार तर ग्रॅज्युएट असायचे. तसेच कसलेही ट्रेनिंग न घेतलेली फ्रेश मुले नोकरीसाठी घेतली जायची. जेव्हा माझी नव्याने उभारणी व्हायची, त्यावेळी संचालक मंडळामार्फत माझ्याच कार्यक्षेत्रातील विविध गावातील मुलांना रोजगार दिला जायचा. सुरुवातीला नोकरी देताना नेमकी गरज किती लोकांची आहे आणि कशा प्रकारचे कामगार गरजेचे आहेत, याचा सारासार विचार न करता खाते प्रमुखांच्या मागणीनुसार नोकर भरती केली जायची.

ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांची मुले किंवा शेतमजुरांची मुले नोकरीवर घेतली जायची. त्यांना नवीन नोकरीवर घेतल्यानंतर पगार किती देणार हे तेही विचारत नव्हते आणि संचालक मंडळही त्यांना पगार किती देणार हे सांगत नव्हते. साधारणपणे 15 ते 20 रुपये प्रतिदिन याप्रमाणे त्यांचा पगार काढला जायचा. म्हणजेच ग्रामीण भागातील ही श्रमशक्ती अत्यंत कमी मोबदल्यात सहजपणे उपलब्ध व्हायची.

गरजेनुसार उपलब्ध झालेल्या तरुण मुलांना इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, शेतकी, अकाउंट, पर्चेस, गोडाऊन, गेस्ट हाऊस, गॅरेज, डिस्टिलरी या विभागांमध्ये काम दिले जात असे. माझ्या स्थापना काळामध्ये सुरुवातीला खूप मोठा खर्च पगारावर करणे मला शक्य नसल्याने या अत्यल्प कमी पगारात उपलब्ध झालेल्या कामगार व कर्मचाऱ्यांकडून माझे काम चालत असे.

महत्त्वाच्या जागेवर म्हणजेच खाते प्रमुख, विभाग प्रमुख याचबरोबर तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी व कामगार हीच मंडळी या नवख्यांना त्यांचे काम समजावून सांगून शिकवत असत. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा मेन फिटर असेल, तर त्याच्या हाताखाली हेल्पर – मजूर यासारख्या पदांवर ही नवखे मंडळी काम करायची. पण पूर्वीच्या काळी गुरु-शिष्याची परंपरा होती. त्यामुळे एखादा चांगला फिटर असेल तर तो त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या हेल्परला साधारणतः दोन-तीन वर्षांमध्ये चांगला फिटर बनवत असे आणि जो मजदूर होता त्याला हेल्पर म्हणून तयार करत असत. इलेक्ट्रिकल किंवा उत्पादन विभागात देखील याच प्रमाणे कामावर घेतल्यानंतर काम करता-करता शिकायचे आणि स्वतः ट्रेन व्हायचे आणि मग थोडासा वरचा हुद्दा मिळवून काम करत राहायचे, अशी व्यवस्था निर्माण झाली होती.

या कामगारांमध्ये बरेचसे कामगार हे कार्यक्षेत्रातील असल्याने आपली आठ तासाची ड्युटी संपल्यानंतर, शेतात जाऊन शेतीची कामे करत असत. त्यामुळे कमी पगार जरी असला तरी त्यांची कोणत्याही प्रकारची ओरड नसायची. फक्त नोकरीला आहे याचे समाधान त्यांना मिळत असेल, पण फारसा पगार किंवा त्या पगारावर आपली गुजराण होईल व लग्न झाल्यानंतर कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा भागवू शकेल, अशी परिस्थिती या रोजंदारीवर किंवा एकत्रित पगारावर काम करणाऱ्या कामगारांची नसायची. त्यामुळे स्वतःच्या शेतीत काम करून उत्पन्न मिळवण्याकडे त्यांचा कल असायचा.

बऱ्याच वेळा पगार नाही दिला किंवा कमी दिला तरी चालेल; पण आमच्या मुलाला कारखान्यात असेल ती नोकरी द्या, असा पालकांचा आग्रह असायचा. मग ही मुले अनेक वर्षे पगाराचा न विचार करता काम करत राहायची. बऱ्याच वेळेला पाच-दहा वर्षे रोजंदारीवर काम करणारे हे कामगार निमूटपणे आपलं काम करत राहायचे. मुळातच परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीने त्यांना सहनशीलता आणि सोशिकता शिकविली.

पगार कितीही असो, काम मात्र झोकून
माझ्या साखर कामगाराचे एक वैशिष्ट्य असे की, तो पगार किती मिळतो आणि काम काय करतो याचा हिशेब कधीच घालत नाही. पगार कमी मिळतो म्हणून तो कधीच कमी काम करत नाही किंवा आपल्या कामाच्या जबाबदारीपासून बाजूला जात नाही. खरं म्हणजे हा नवतरुण अकुशल असताना त्याने माझ्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि काम करता करता तो इतका कुशल झाला की त्याला सोपून दिलेले काम तो अगदी सफाईदारपणे करू लागला. माझ्या मशीनची देखभाल करणे, हंगाम सुरू असताना सर्व मशीन चालवणे, प्रोसेसकडे व्यवस्थित लक्ष देणे इ. गोष्टीतून अगदी निष्णात कामगाराप्रमाणे काम करू लागला.
अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की साखर कारखान्यात काम करायचे असेल तर फार शिक्षणाची किंवा अनुभवाची गरज नसते.

अगदी अंगठे बहाद्दर सुद्धा कारखान्यात नोकरी करून पगार मिळवू शकतो; परंतु हे अर्धसत्य आहे. कारण कारखान्यात सुरुवातीला नोकरी करत असताना कुशल असणारा हा कामगार अनुभवाने आणि प्रत्यक्ष काम करता करता इतका कुशल होतो की दहावीनंतर चार ते पाच वर्षाचे शिक्षण घेतलेल्या तांत्रिक विद्यार्थ्यांपेक्षा किंवा इंजिनियर आणि ग्रॅज्युएटपेक्षा याच्यामध्ये चांगले कौशल्य आलेले असते. तो ज्या विभागात काम करतो. त्या विशिष्ट जागेवर तो इतका तरबेज होतो की कोणतीही अडचण आली तरी तो सहजासहजी सोडवतो आणि हाच त्याच्या नोकरीचा व जीवनाचा भाग बनून जातो.


जोखमीचे काम
उसापासून साखर बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्या साखर कामगाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर त्याला जोखीमही मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागते. माझ्यासाठी काम करत असताना अनेक कामे ही जोखमीची असतात. उदाहरणार्थ साधा क्रेन ऑपरेटर जेव्हा क्रेन अनलोड करतो तेव्हा त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. त्याच्या कामात थोडीशी चूक झाली तरी फीडर टेबलवर काम करत असणाऱ्या खालच्या कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणारा कामगार हा कमी महत्त्वाचा वाटत असलं तरी त्याचे काम मात्र खूप महत्त्वाचे असते.

Bhaskar Ghule

विशेष म्हणजे क्रेन ऑपरेटिंगचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण त्याने घेतलेले नसते. तो स्वअनुभवाने शिकलेला असतो. अशाच प्रकारे मिलवर काम करणारा कामगार असो किंवा बॉयलरवर काम करणारा कामगार, प्रत्येकाचे महत्त्व आणि जबाबदारी ही खूप महत्त्वाची असते. साधारणत़: 500 ते 600 अंश से. तापमानाची वाफ तयार करत असताना बऱ्याच लोकांना असे वाटते की बॉयलरच्या फर्नेसमध्ये बग्यास जातो आणि स्टीम तयार होते. ती स्टीम टर्बाईनमध्ये सोडली की टर्बाईन फिरते आणि टर्बाईन अल्टरनेटरला फिरवून वीज निर्माण होते.

माझे स्वयंप्रशिक्षित कामगार
बॉयलरवर काम करणारे माझे कामगार बऱ्याच वेळा औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नसतात. बॉयलरवर काम करणारे मजूर, हेल्पर, पंपमन, फायरमन, वॉटरमन, बॉयलर अटेंडंट व बॉयलर फोरमन हे सर्व कामगार अनुभवाने व मेहनतीने काम करून निरीक्षणाने व वरच्या कामगारांच्या मदतीने ही सर्व कामे शिकतात आणि खूप महत्त्वाच्या जागेवर ते काम करतात. बॉयलर म्हटले की तेथे मोठ्या प्रमाणावर रिस्क असते. साधारणपणे 22 केजी पासून ते १०० केजी पेक्षा जास्त प्रेशर असलेल्या बॉयलरवर हीच मंडळी काम करत असतात.

साधारणपणे आपण विचार केल्यास 45 केजी म्हणजे एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर या जागेत 45 किलो स्टीम तयार होते. म्हणजेच खूप मोठ्या रिस्कवर हे कामगार काम करत असतात. बरं बॉयलर चालवत असताना फीड वॉटरचे तापमान त्याचबरोबर फर्नेसचे तापमान, स्टीमचे तापमान व प्रेशर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या योग्य प्रमाणात राखल्या तरच रिझल्ट मिळतो. अन्यथा त्यातून नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय अपघाताचीही शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये डोळ्यात तेल घालून आठ तास हे माझे कामगार बंधू काम करत असतात.

टर्बाईनचा विचार केल्यास साधारणपणे मिनिटाला 6000 ते 7000 आरपीएमने ते फिरते. तिथे मोठ्या प्रमाणात रिस्क असते. अशाप्रकारे टर्बाईन वर काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा अतिशय सावधपणे काम करावे लागते. कामगाराकडून झालेली छोटीशी चूकदेखील मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.
कारखान्यात मोठमोठे इलेक्ट्रिक पॅनल असतात. तेथे कामगाराला स्वतःची कौशल्य वापरून काम करावे लागते. पुढे प्रोसेसचा विचार केल्यास रसायन विभागातदेखील बाष्पीभवन करत असताना दक्षता घ्यावी लागते. पेन सेक्शनला व्हॅक्युम बॉलिंग करावे लागते. तेथे योग्य प्रकारे योग्य ती दक्षता न घेतल्यास अपघात व नुकसान होऊ शकते.

अशाच प्रकारे उसापासून साखर तयार करताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात अतिशय कौशल्याने काम करावे लागते. ही सर्व कामे जो कामगार रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात करते वेळी अकुशल असतो, तोच कामगार पुढे काम करता-करता अनुभवाने शिकत जातो व स्वतःमध्ये विशिष्ट प्रकारचे कौशल्य निर्माण करून कुशल कामगार होतो आणि त्याचाच पुढे अति कुशल कामगार तयार होतो.. अशाप्रकारे कौशल्य प्राप्त झालेले माझे साखर कामगार सर्व तांत्रिक व जोखमीची कामे कुशलतेने करतात.

कामगारांच्या जीवावरच…
या माझ्या साखर कामगारांमुळेच माझी दैनंदिन वाटचाल सुरळीतपणे पार पडत असते. असाच प्रकार डिस्टिलरी विभागात देखील सुरू असतो. तेथे अति ज्वलनशील अल्कोहोल व इथेनॉल निर्मिती केली जाते, तेथेसुद्धा हेच साखर कामगार काम करत असतात, तेथे खूप मोठ्या प्रमाणात जोखीम असते.

गेटच्या आतील कामगारांची काम जसे महत्त्वाचे व जोखमीचे असते तसेच काम गेटबाहेरील इतर खात्यांचे असते. जोखीम थोडी कमी-जास्त असते एवढेच. अकाउंट विभागात काम करणारा माझा कर्मचारी थोडासा जरी चुकला, तरी देखील फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते आणि सध्या तर जीएसटी इतर टॅक्स त्याची नियम शासकीय धोरणे त्याच्यातील तरतुदी त्याची ऑडिट्स त्याचप्रमाणे रेगुलर इन्कम टॅक्स व इतर कामे त्याला करावी लागतात.

ही कामे अत्यंत काळजीपूर्वक करावी लागतात, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. टॅक्स डिपार्टमेंटकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जाऊ शकतो. शेतकी विभागात काम करणारा कर्मचारी हादेखील तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. लेबर भरतीपासून ते परत लेबर सोडेपर्यंत त्याला बरीच काळजी घ्यावी लागते. रात्री-बेरात्री कायमच प्रवास करावा लागतो. त्यात कधीकधी अपघातही होतात. उसाच्या लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणात रिस्क असतेच.

प्रशासन विभागात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरते. स्थापत्य विभाग व सॅनिटेशन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे काळजी घ्यावी लागते व डोळ्यात तेल घालून सर्वांना काम करावे लागते. वाहन विभागातील चालक व इतर कर्मचारी देखील याला अपवाद नसतात..

माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, कामगार मजदूर या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्येकाचा नोकरी करण्याचा स्तर आणि जबाबदारी वेगळी असली तरी प्रत्येकाचे कर्तव्य मात्र हे श्रेष्ठच आहे. . कारखान्याचा कार्यकारी संचालक असो, साधा कामगार असो किंवा अगदी झाडू मारणारा स्लीपर असो… प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारची निश्चित जबाबदारी असते आणि हा प्रत्येक घटक आपापली जबाबदारी चोखपणे पार पडत असतो. म्हणूनच माझे कामकाज व मी व्यवस्थितपणे वाटचाल करत असतं.

या साखळीतील एक कडी देखील कमकुवत असली तरी त्याचा फटका माझ्या संपूर्ण आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर होतो. म्हणूनच साखर कामगार हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दुवा आहे. त्याच्याशिवाय माझा डोलारा व्यवस्थितपणे उभा राहू शकत नाही आणि जिथे जिथे हे सर्व साखर कामगार एक दिलाने एक विचाराने काम करतात व ते माझे सर्व कुटुंबाचे घटक होतात, तेथेच माझी प्रगती जोम धरते. त्यांच्यात बेबनाव झाल्यास माझ्या अधोगतीला वेळ लागणार नाही. म्हणून माझ्या दृष्टीने प्रत्येक साखर कामगार हा अतिशय महत्त्वाचा आहे.

कौशल्यवान व्हा
माझ्या परिवाराचा महत्त्वाचा घटक असलेल्या या साखर कामगारांविषयी मी जे मांडले आहे, ते सर्व वास्तव आहे. पण आता जुन्या पद्धतीने काम करून, प्रगतीचा वेग साधता येणार नाही. स्पर्धेच्या वारूवर स्वार होता येणार नाही.
कामगार घडवण्याइतपत वेळ आज माझ्याकडे राहिलेला नाही. काळ बदलत चालला आहे. तंत्रज्ञान बदलते आहे. पारंपरिकतेला फाटा देऊन आधुनिकीकरण सुरू आहे. आता कामगारानेही बदल स्वीकारायला हवेत. त्याने स्वत: प्रशिक्षित व्हावे आणि बदलत्या साखर उद्योगाचा अविभाज्य घटक बनावे.

पूर्वीचा काळ वेगळा होता. जादा कामगार झाले तरी मी तो भार सहन करू शकत होतो. महागाई कमी असल्यामुळे आणि ऊसाला आजच्या प्रमाणे दर द्यावा लागत नसल्यामुळे, वाढीव कामगारांच्या पगाराचा भार मला सोसत होता. ऑटोमेशन, संगणकीकरणाला आता कोणालाच टाळता येत नाही. त्यामुळे कामगार संख्या कमी करावी लागत आहे.

नवी भरती करताना विचार करावा लागतो आहे. माझे उत्पन्न वाढलेले असले, तरी खर्च वाढतच आहेत. वाढणारा खर्च माझा अवाक्याच्या बाहेर जात आहे. त्यामुळे नव्या भरतीवर मर्यादा आल्यात. सध्या सेवेत असलेल्या कामगारांना काही अडचण नाही, मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर नवीन भरती करायला खूपच मर्यादा येणार आहेत. म्हणून प्रत्येकाने प्रशिक्षित होणे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे मला फार मोठ्या संकटांना मला सामोरे जावे लागेल. त्याची झळ सेवेत असलेल्या कामगारांनाही बसू शकते. साखर कामगार हे माझ्यासाठी मोठे धन आहे, ते मला सांभाळल पाहिजे.

 सर्वच साखर कामगार सारखे नसतात. एक वर्ग असा असतो की त्याची श्रमावर प्रचंड निष्ठा असते. मला या संस्थेतून किती पगार मिळतो यापेक्षा मी काय काम करतो आणि त्याच्यातून मला किती समाधान मिळते, असा विचार करणारी ही मंडळी असतात. ते आपापले काम प्रामाणिकपणे करत असतात. संस्था ही माझी आहे आणि ती मला संभाळायची आहे. त्यासाठी मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडले पाहिजे. माझ्यामुळे संस्थेचे नुकसान होणार नाही किंवा संस्था बदनाम ही होणार नाही, या भावनेने ते राबतात. 

काही मंडळी अशी असतात की, मी आठ तास येतोय… माझे काम मला जे सांगितलं आहे, ते मी पार पाडतोय. मला इतर कशाशीही काही घेणे-देणे नाही. माझा महिना भरला की मला पगार द्या, मला बाकीचे काही माहीत नाही, असा विचार करणारी ही मंडळी आहे.

त्याचप्रमाणे कामगार म्हणून मला माझे सर्व हक्क मिळाले पाहिजेत. पगारवाढ मिळाली, तरच मी काम करेल अन्यथा मला काही पडले नाही आणि मला युनियनचे कवच असल्यामुळे मला कोणी कामावरून काढू शकत नाही, पगार वाढवून देणार नसाल, तर एक मिनिट सुद्धा जास्त काम करणार नाही, असे म्हणणारे कामगारही आहेत.
कामगारांमध्ये आणखी एक प्रकार पडतो, तो म्हणजे संचालक मंडळ किंवा पदाधिकारी हे माझे नातेवाईक आहेत किंवा मी त्यांच्या फार जवळ आहे. त्यामुळे मी काम जरी नाही केले, तरी चालू शकते. माझा संबंधांचा वापर करून मी इतरांना वेठीस धरू शकतो, येथे माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, अशी भावना असणारा वर्ग. त्यांचे कर्तव्यापेक्षा हक्कांकडेच अधिक लक्ष असते.

मी युनियनचा पदाधिकारी आहे. मला आता काम करायची गरज नाही. मी कामगारांमध्ये जाऊन, त्यांच्या अडीअडचणी ऐकून, त्या व्यवस्थानाकडे मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार, याखेरीज मी इतर कोणतेही काम करणे अपेक्षित नाही, अशी वृत्ती असलेला आणखी एक वर्ग आहे. अशा कामगारांना काम सांगितले तर ते थेट संप, आंदोलनाची भाषा करतात.

स्वत: काहीही काम करायचे नाही; मात्र इतरांच्या चुका शोधायच्या आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या कानात सांगायच्या आणि असं भासवायचं की मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय… नाही तर हे कोणीही काही काम करणार नाही… अशा तोऱ्यात वावणारा आणखी एक कामगार प्रकार आहे. अशी मंडळी माझ्यासाठी अत्यंत घातक असते. ते सामंजस्यपूर्ण वातावरण बिघडवून टाकतात.
कामगार मेहनती असतो. तो कष्ट करतो, प्रामाणिकपणे आपले काम करतो. ही संस्था माझी आहे, मी तिला जपलं पाहिजे, असाही विचार बहुतेक कामगार करत असतात. असे असले तरी कामगारांमध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा हा सारा पसारा सांभाळणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे ही सोपी गोष्ट नाहीये. (क्रमश:)
(लेखक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक असून, साखर उद्योगाबाबत तळमळीने लिहिणारे आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »