उत्तम गळीत हंगामासाठी भास्कर घुले यांची ७२ कि.मी.ची पायी वारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे व्यक्तिमत्त्व आहे- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले!

सलग चौदा तास चालून त्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री विठ्ठलाला महाराष्ट्रातील गाळप हंगाम यशस्वी व्हावा म्हणून साकडे घातले.

श्री. घुले यांनी साखर कारखान्यापासून पहाटे चार वाजता पायी वारीला प्रारंभ केला. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे अलंकापुरीत आगमन झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री विठुरायाचे दर्शन घेतले. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी ही पायी वारी सुरू केली आहे. गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच ते हा ७२ किमीचा प्रवास करतात. वाटेत अल्पोपहारासाठी दोन वेळा थांबा वगळता, त्यांचे चालणे उत्सुसाहात सुरूच असते.

‘या वारीमुळे गळीत हंगामासाठी नवी  ऊर्जा मिळाली, मनात उत्साह संचारला. एक तरी ओवी अनुभवावी, या उक्तीप्रमाणे एक तरी वारी करावी, असे माझे सर्वांना आवाहन आहे,’ असे उद्‌गार भास्कर घुले यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना काढले.

वारीची क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील फोटोंवर स्लाइड करा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »