वाघ फडात, तरी बाळ उघड्यावर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊसतोड मजुरांच्या जीवनाची कसरत

मी साखर कारखाना बोलतोय -4

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल…? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले श्री. भास्कर घुले यांचे हे वाचनीय सदर…

शेतकऱ्यांनी शेतात ऊस पिकविला. उसाचे उदंड पीक आले आणि ऊस गाळपासाठी मीदेखील सज्ज झालो. शेतकऱ्यांच्या शेतापासून माझ्यापर्यंत ऊस पोहोचवण्याची जबाबदारी ज्या ऊसतोडणी मजुरांवर असते त्यांच्याबाबत आपणास थोडंसं बोलूया.

Plight of Sugarcane labors

आपल्या देशामध्ये अनेक पिके घेतली जातात, प्रत्येक पिकाचा हंगाम ठरलेला असतो. त्या त्या हंगामामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात; परंतु उसाचे पीक हे बारमाही असते. उसाची लागवड केव्हाही झालेली असली तरी देखील. उसाची तोडणी मात्र प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर ते मे या दरम्यान केली जाते.

लाखो टन ऊस तोडायचा त्याची वाहतूक करायची आणि सदरचा ऊस शेतकऱ्यांच्या बांधावरून कारखान्याच्या गेटपर्यंत आणायचा हे काम वाटते तितके सोपे नाही. अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणात यांत्रिकीकरण झालेले असले, तरी देखील ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मजुरांची गरज आजही मोठ्या प्रमाणावर भासते.

ज्या भागामध्ये ऊस पिकतो त्या भागांमध्ये मजुरांची उपलब्धता नसते. म्हणून माझ्या कार्यक्षेत्रामध्ये शेकडो मैलाहून स्थलांतर करून हे ऊस तोडणी मजूर येत असतात. स्वतःचे घरदार सोडून पाच ते सहा महिन्यांसाठी हे मजूर बाहेर पडतात. ऊन, वारा, पाऊस याला सामोरे जात उघड्यावर आपला संसार मांडतात. आपली गुरे ढोरे, लहान मुले, घरातील वयोवृद्ध माणसे या सर्वांना घेऊन हे सर्व मजूर ऊस तोडणीसाठी येतात.

एखाद्या पक्षाने मिळेल त्या ठिकाणी आपले इवलेशे घरटे बांधावे आणि तिथेच आपल्या पिल्लांना जन्म द्यावा. पिल्ले आकाशात भरारी घेण्यास सक्षम झाली की तिथून निघून जावे. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा पिल्लांना जन्म देण्यासाठी नवीन घरटे बांधावे. अशाप्रकारे जमेल तिथे जमेल तसा निवारा शोधायचा आणि ऊन, वारा, वादळ, पाऊस यांना डोक्यावर घेऊन जीवन जगायचे असेच काहीसे आयुष्य ऊस तोडणी मजुरांच्या वाट्याला येत असते.

माझे चालक सर्व शक्तीनिशी शक्य होतील तितक्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करतात; परंतु तो प्रयत्नसुद्धा तोकडा पडतो. असे असले तरीदेखील सुविधा नाहीत म्हणून काम ऊसतोड मजुरांनी कधीही नाकारलेले नाही. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये ऊस तोडणी मजूर ऊस तोडत असतात.

आक्षेप आणि वास्तव
ऊस तोडणी मजुरांविषयी अनेक वेळा अनेक गोष्टींचा उल्लेख होतो. ऊस तोडणी करताना ते शेतकऱ्यांकडून जादाचे पैसे घेतात. शेतकऱ्यांच्या ऊस तोडत असताना शेतकऱ्यांची अडवणूक करतात, पैशाची मागणी करून पैसे न दिल्यास ऊस तोडणीस नकार देतात, अशा तक्रारी ऊस तोडणी मजुरांविषयी असतात. त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील असते. या सर्व बाबींविषयी आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. आपण ऊस तोडणी मजुरांचे वास्तव् समजावून घेऊ.

Bhaskar Ghule in field
ऊसतोडणी मजुरांच्या कष्टांचा स्वत: अनुभव घेताना लेखक भास्कर घुले

साखर कारखानदारीमध्ये सर्वात क्लिष्ट व किचकट काम हे ऊस तोडणी मजुरांची भरती करणे व त्यांच्या मार्फत उसाची तोडणी करून ऊस कारखान्यापर्यंत पोहोच करणे हे अतिशय सहज वाटणारे काम तितके सोपे नाही. सध्या सगळीकडे यांत्रिकीकरण झालेले पहावयास मिळते. शेतीमध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाचा फार मोठा वाटा सध्या आहे. ऊस तोडणीसाठीदेखील यंत्र कार्यरत आहेत. ऊस तोडणी यंत्र असले तरी ऊस तोडणीचे संपूर्ण यंत्रिकीकरण करणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे ऊस तोडणीसाठी ऊस मजुरांची आवश्यकता भासत राहणारच आहे. म्हणून आपण ऊस तोडणी विषयी सर्वच गोष्टी समजून घेऊ.

पैशाचे आमिष कसे सुरू झाले?
ऊस तोडणी मजूर ॲडव्हान्स घेतल्याशिवाय ऊस तोडणीसाठी येत नाहीत. लेबर भरती करताना आपण टोळी मुकादमास मोठ्या रकमांचा ॲडव्हान्स देतो. तो मुकादम लेबरला ॲडव्हान्स देऊन टोळीची बांधणी करतो. टोळी ऊस तोडणीसाठी कारखान्यावर येते. यामध्ये ॲडव्हान्स घेऊन देखील कामावर न येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कारखान्यांचे करोडो रुपये अडकून पडतात व ते वसूल करणे सुद्धा अवघड असते.

ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि उसाचे पीक मुबलक येते. त्यावेळेस ऊस तोडणी मजुरांना अनन्यसाधारण महत्त्व आलेले असते. प्रत्येक शेतकऱ्याला आपला ऊस वेळेवर तुटावा असे वाटत असते. म्हणून टोळ्यांची पळवापळवी करणे किंवा आपला ऊस तोडणीसाठी मजुरांना पैशाची लालूच दाखवणे आणि कारखान्याच्या मजुरीव्यतिरिक्त त्यांना बक्षीस म्हणून भरघोस रक्कम द्यायची आणि आपला ऊस तोडून घ्यायचा, असे ‘प्रताप’ खरं म्हणजे ऊस उत्पादकांनी सुरू केले आणि आता मजुरांना त्याची सवय झाल्यावर ऊस तोडणी मजूर सर्रास प्रत्येकाकडे पैशाची मागणी करू लागला आणि यातून मजुरांनी ऊस उत्पादक यांच्यामध्ये बऱ्याचदा संघर्षाची वेळ देखील आली.

खरं म्हणजे कायद्यानुसार शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस तोडून गव्हाणीपर्यंत पोहोचवायचा असतो. शेतकऱ्यांना लेबर बांधणी करणे व ऊस तोडणी हे काम सहज शक्य होत नसल्याने कारखाना शेतकऱ्यांच्या वतीने लेबर भरती करून ऊस तोडून आणतो व त्याची तोडणी व वाहतुकीचा खर्च सदरच्या कॉन्ट्रॅक्टरांना देऊन ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून कपात करून ती मजुरांना दिली जाते. ढोबळ मानाने पाहिलं तर वरीलप्रमाणे परिस्थिती आपणास दिसते. पण यातील खरे वास्तव समजून घ्यायचे असेल, तर आपण ऊस तोडणी मजुरांचा तोडणीसाठी आल्यावरचा दिनक्रम, त्यांच्या मूळ गावातील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती त्यांची आर्थिक परिस्थिती व त्यांच्याकडे असलेली उपजीविकेची इतर साधने यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मजूर त्रास देतात म्हणून त्यांना हिणवत बसण्यापेक्षा त्यांच्या जीवनमानाविषयी काही गोष्टी आपण समजावून घेऊ.

ऊसतोडणी मजुरांचे जीवन

ऊस तोडणी मजूर मुकादमांकडून मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स घेतात त्याचा वापर ते ज्यावेळेला कारखाना बंद असतो त्यावेळी त्यांच्या गावाकडे असताना त्यांचे उपजीविकेसाठी व घरातील काही प्रापंचिक प्रश्न सोडवण्यासाठी त्या ॲडव्हान्स दिलेला रकमेचा वापर करतात. त्यातील बरीचशी रक्कम मुला-मुलींची लग्न करणे व आरोग्याच्या समस्या असल्यास दवाखान्यासाठी खर्च करणे यासाठी वापरली जाते. ती जेव्हा कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणीसाठी येतात त्यावेळेला त्यांना दिलेली ॲडव्हान्सची रक्कम पूर्ण खर्च झालेली असते.

येताना कुठल्याही प्रकारचे पैसे त्यांच्याकडे नसतात. अशावेळी आपल्या प्रत्येक गरजेसाठी मुकादमावर अवलंबून असतात किंवा ऊस तोडणी केल्यानंतर ऊसांची वाढी विकून त्यातून पैसे मिळतात ते त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वापरले जातात. या मजुरांचा दिनक्रम कसा असतो त्यावर आपण एक नजर टाकू

ऊस तोडणी मजुरांचा दिवस बहुदा पहाटे अडीच ते तीन वाजता सुरू होतो. पहाटे उठल्याबरोबर त्यांच्या पालामध्ये असलेल्या मातीच्या वा दगड मांडून केलेल्या चुलीवर स्वयंपाक करायचा. त्यात शक्यतो ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, एखादी भाजी, लसणाची चटणी याचा समावेश असतो.
भाजी, भाकरी करून झाली की भल्या पहाटे अंधारातच आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणी साठी निघायचे. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले बरोबर असतात. त्यातली बरीचशी मुले सहा महिन्यापासून सात ते आठ वर्षाचे असतात. समाजातील इतर लोक साखर झोपेत असताना ऊस तोडणी मजूर मात्र अंधारातच ऊस तोडणीच्या कामाला सुरुवात करतो. थंडीचे दिवस असतील तर तिथेच थोडे पाचट पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो व ऊस तोडणीसाठी त्याच प्रकाशाचाही उपयोग होतो.

हे मजूर जर बैल टायर किंवा ट्रॅक्टर टायरने ऊस तोडणी करत असतील तर सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांचा ऊस तोडून टायर भरण्याची तयारी होते. गाडी सेंटर किंवा डोके सेंटरची मजूर थोडे उशिरा काम सुरू करतात. उशिरा म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत. थंडी, ऊन, वारा व पाऊस काही असले तरी ऊस तोडणीचे काम थांबत नाहीत आणि ऊस तोडणी करत असताना आईचे दूध पिणारी मुले आईने दूध पाजल्यावर शेतातच पाचटाची गादी करून त्यावर झोपलेले असतात आणि मजूर मात्र ऊस तोडणीत रमलेला असतो. स्वतःच्या पोटच्या मुलाला पाचटावर झोपवतानंतर, कामाच्या व्यग्रतेमध्ये त्यांना मुलांकडे पाहण्यासही वेळ नसतो.

धोका स्वीकारण्यास सदैव तयार
साप, विंचू यापासून धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अनेक ठिकाणी बिबट्यांचा सर्रास वावर असतो. अनेक वेळा मजुरांच्या मुलांवर किंवा मजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याची उदाहरणे पहावयास मिळतात. त्यात जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता असते. हे सर्व माहिती असूनसुद्धा ते भल्या पहाटे जाऊन अंधारात काम करतात. काम करून थकल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी बरोबर आणलेली भाजी, भाकरी सोडायची आणि तिथेच जेवण करायचे. जेवण आपल्या पिल्लांना देखील द्यायचे आणि त्यांची पोटाची खळगी भरायची.

जेवण करत असताना शेजारी कांद्याचे शेत असेल तर त्यातलाच एक कांदा उपटायचा हाताने फोडायचा आणि जेवताना तोंडी लावून खायचा. मात्र त्यांना यातच तुमच्या पिझ्झा, बर्गरपेक्षा मोठी मेजवानी मिळाल्याचा आनंद होतो. तू कांदा उपटून खाल्ला म्हणून शेतकऱ्यांकडून बोलणी खावी लागतात. असे असले तरी बरेचसे ऊस उत्पादक शेतकरी मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. जेवण करताना शक्यतो हात पाण्याने स्वच्छ धुतले जातात मग जेवण केले जाते. परंतु काही वेळेला असेही होते ऊस तोडत असताना मातीने माखलेले काळे हात स्वच्छ न धुता त्याच हातावर एक भाकरी आणि लसणाची चटणी घेऊन ही मंडळी खात असतात. एरवी साथीच्या आजारांना बळी पडणारे मजूर इतर वेळी सहजा आजारी पडत नाही. त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारक्षमता भरपूर असते.

कोविड महामारीतही अखंड काम
विविध भयंकर महामारीमध्ये देखील या लोकांनी ऊस तोडण्याचे काम कधी बंद ठेवले नाही. समाजातील इतर सर्व घटक कोविडला घाबरून घरात बसलेले असताना ऊस तोडणी मजूर मात्र कारखान्याचा पट्टा पडल्याशिवाय किंवा संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय ऊस तोडणीचे काम बंद करत नाहीत. कार्यक्षेत्रातील उसाचे शेवटचे टिपरी तुटेपर्यंत यांचे काम चालूच असते. याच न्यायाने कोविडच्या महामारीमध्ये यांनी कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आपले काम अविरत चालू ठेवले होते

त्यावेळी कारखान्यांनी देखील त्यांना योग्य प्रकारे भरपूर मदत केली होती. कोविडमुळे जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनदेखील जीवाशी खेळत रात्रंदिवस ही माणसे काम करत असतात. ज्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त वावर आहे ही माहीत असून देखील उसाच्या फडांमध्ये ऊस तोडणीसाठी हे जात असतात आणि त्याच उसाच्या फडामध्ये आपल्या पोटाच्या लहानग्या मुलांना उघड्यावर टाकून त्यांच्याकडे पाठ फिरवून समोर ऊस तोडणीचे काम करत असतात.

बापाचं ठीक आहे; पण जन्मदात्री आईदेखील इतकी निष्ठुर होऊ शकते का हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही. त्यांची आई निष्ठुर नाही. तिचं भरोसा असतो की देव आपल्या बाळाचे संरक्षण वाघापासून निश्चित करेल. पण मी काम केले नाही आणि त्याला खाऊ घालू शकले नाही तर देव मात्र त्यांना खायला देणार नाही. कारण माझा देव मला सांगतो मी तुला हात-पाय दिले, शरीर दिले त्याचा वापर करून तू कष्ट कर, दोन पैसे मिळव आणि तुझ्या लेकरा-बाळांचा सांभाळ कर.

उघड्यावरचे जीवन
देवावर प्रचंड श्रद्धा असलेली माणसं आपलं आयुष्यच देवाच्या हवाली करत असतात. त्यांचा साधू-संत, देव, महंत यांच्यावर प्रचंड विश्वास असतो आणि यातूनही काही बरे वाईट झाले तर देवाला दोष न देता माझ्या हातून काही तरी अपराध झाला म्हणून मला देवाने शिक्षा दिली, या भावनेने ही मंडळी आयुष जगतात. ते इतर कोणाला दोष देत नाहीत.

पैशाने गरीब असलेली ही मंडळी मनाने खूप श्रीमंत असतात. त्यांच्यामधील धारिष्टे व आत्मविश्वास त्यांना जगण्यासाठी काम करण्याची ताकद देते. म्हणून तर ही माणसे जाणते-अजाणतेपणे आपल्या पिल्लांना मृत्यूच्या दाढेत टाकून काम करत असतात. याचा अर्थ ते आपल्या मुलांना उघड्यावर ठेवून ते बेपर्वाई करतात असे नाही. तर ती त्यांची मजबुरी असते. शहरी लोकांची मुले उघड्यावरचे खाऊन आजारी पडतात. पण ही मुलं मात्र उघड्यावरचे, उघड्या अंगाने आणि उघड्या जागेतच खातात. असे असले तरी, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत कुपोषित बालकांचे प्रमाण कमी आहे.

असो ऊस तोडणी कामगार कोणत्या परिस्थितीत काम करतात याची आपण सर्वांना जाणीव व्हावी म्हणून या सर्व गोष्टी आपणासमोर ठेवल्या आहेत. ऊस तोडणी नंतर या मजुरांना ट्रक, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर टायर यामध्ये ऊस भरून देण्याचे काम करावे लागते. कधी-कधी शेतातून या टोकाच्या त्या टोकापर्यंत डोक्यावर मोळी घेऊन ट्रकपर्यंत जावे लागते.

ऊस वाहतूक करणारे मजूर त्याच बैलगाडीच्या उसावर बसून प्रवास करतात. त्यावेळी रस्त्यातील चढ व उतारावरून गाडी येत असताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. बैलगाडी टायरला ब्रेक नसतात. अशावेळी बैलांच्या मदतीने हळूहळू उसाने भरलेली गाडी गव्हाणीपर्यंत आणावी लागते. हे काम देखील खूप जोखमीचे असते. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

उसाने भरलेली गाडी यार्डात आल्यानंतर, गाडी खाली करण्यासाठी नंबर लावून ठेवावा लागतो. गाडी यार्डात आल्यानंतर पुरुष बैलांना चारा पाणी करण्याचे काम करतो; तर स्त्रिया संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतात. तत्पूर्वी दुपारच्या वेळेला असेल ते खातात. संध्याकाळी मात्र व्यवस्थितपणे स्वयंपाक करून जेवण करून घेत असतात.

दिवसभर काम करत असताना मिळेल तेथून चुलीसाठी सरपण गोळा करून आणायचे आणि तेच सरपण इंधन म्हणून चुलीत वापरायचे आणि त्यावर स्वयंपाक करायचा, हे त्यांची नित्याची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात सध्या परिस्थिती बरी आहे. कारखाना कार्यस्थळावर त्यांना प्रकाशासाठी विजेची सोय असते. राहण्यासाठी परिसर स्वच्छ करून तिथे त्यांची व्यवस्था केली जाते. माणसांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी व जनावरांसाठी देखील उपलब्ध असलेले पाणी याची व्यवस्था केली जाते.

काही ठिकाणी शौचालय उभारण्याचे प्रयोग देखील झाले; परंतु त्यांची संख्या आणि कामगारांची मानसिकता यामुळे ते शौचालय वापरण्याच्या मन:स्थितीत नसतात. तरीदेखील स्वच्छतेच्या बाबतीत हे लोक सतर्क असतात. ऊसतोडणीसाठी आल्यावर तात्पुरता निवारा म्हणून ते झोपडी तयार करतात. त्याला काही लोक पाल देखील म्हणतात. साधारणपणे सहा बाय आठ च्या पालामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब वास्तव्य करत असते. तेथेच चूल-मूल सर्व काही असते. पालातील जमीन शेणाने सारवलेली आणि पालाच्या बाहेरदेखील शेणसडा टाकलेला असतो. संध्याकाळी स्वयंपाक पाणी करून सर्व झाल्यावर जेवण करायचे आणि झोपायचे. अशीच स्त्रियांची दिनचर्या असते.

अपार कष्टातही आनंदी जीवन
पण पुरुष मंडळींसाठी आपल्या गाडीचा नंबर येईपर्यंत वाट पाहत राहायचे आणि त्यासाठी कधी कधी रात्र रात्र जागून काढायची आणि सकाळी पुन्हा ऊस तोडीच्या कामाने दिवसाला सुरुवात करायची अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम असतो. ऊस तोडीचे मेहनतीचे काम असले तरी देखील ते त्यांच्या इतके अंगवळणी पडलेले असते की त्यात त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव दिसत नाही. इतके अवघड काम असूनसुद्धा ते अतिशय हसतमुखाने काम करत असतात. काही लोक तर काम करता करता गाणी म्हणणे व इतरांचे उपक्रम करणे यासारखे सुद्धा प्रयोग करत असतात. एकूणच काय तर कष्ट करता करता आनंदी जीवन जगण्यात त्यांचा हातखंडा असतो.

डोक्यावर प्रचंड अडचणींचा डोंगर असून देखील त्याला न डगमगता काम करायचे दोन पैसे मिळवायचे, आपले कुटुंब चालवायचे आणि गाळप हंगाम संपल्यानंतर उरलेल्या दिवसांची तरतूद करून ठेवायची आणि अशाच पद्धतीने जीवन जगायचे ही त्यांची आयुष्याची घडी ठरलेली आहे. आज आपण ऊस तोडणी मजुरांच्या कामाविषयी थोडीशी चर्चा केली त्याचबरोबर त्यांचे जीवनमान राहणीमान आणि त्यांचे स्वभाव या बाबतीत थोडासा विचार केला पुढील भागामध्ये आपण त्यांच्या जीवनातील वेगळ्या गमती जमती सुखदुःखे काही अंशी काही लोकांकडून होत असलेली फसवणूक. ॲडव्हान्स रकमा घेऊन ते बुडवण्याची प्रवृत्ती. एकाच वेळी अनेक कॉन्ट्रॅक्टर कडून ॲडव्हान्स घ्यायचा आणि कामाला एकाकडे जायचे. इतरांचा ॲडव्हान्स बुडवायचं किंवा त्यांच्यापासून तोंड लपून बाजूला जायचे हे काही लोक निश्चितपणे करतात. पण याचा अर्थ सर्वच मजूर तसे आहेत, असं नक्की नाही.

(लेखक श्री. भास्कर घुले हे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक असून, साखर क्षेत्राविषयी नियमित लेखन करतात.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »