वारकरी रूपी निष्ठावान कामगार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले श्री. भास्कर घुले यांचे हे वाचनीय सदर

‘मी साखर कारखाना बोलतोय ‘ (भाग 10)


मागील अंकात आपण साखर कामगारांविषयी चर्चा केली. त्यांची मेहनत त्यांचे कौशल्य आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर आपण बोललो. मला आता अशा साखर कामगारांविषयी बोलायचे आहे, की ज्यांनी अनंत अडचणींना तोंड देत अनेक चढ-उतार पाहत आपले करिअर साखर कामगार म्हणून सुरू ठेवले. आपण पाहतच आहोत अनेक ठिकाणी मी दिमाखात उभा आहे; तर अनेक ठिकाणी माझी हेळसांडदेखील झालेली आहे. त्याचेवळी माझ्यावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच हेळसांड होते आणि माझी प्रगती होत राहिली तर माझ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच प्रगती होते. हा इतिहास तुम्ही सर्वजण जाणतच आहात.

Bhaskar Ghule Column

असे असले तरी ज्याप्रमाणे मला प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते आणि संकटावर मात करून पुन्हा उभारी घेत, सर्वांचे प्रपंच सावरायचे असतात. मी जसा प्रत्येक वेळी अडचणी सोडवत पुढे जात असतो, तसाच माझा साखर कामगारदेखील अनंत अडचणींवर मात करत आपले आयुष्य जगत असतो. त्याला अनेकदा नैराश्यदेखील येते. अशाही परिस्थितीमध्ये साखर कामगार स्वतःला सावरत आपला प्रपंच चालवत असतो.

माझ्या परिसरामध्ये खूप लक्झरीअस सुविधा नसल्या, तरी मूलभूत सुविधा मात्र असतात. माझ्या कार्यस्थळावर पहिली ते दहावीपर्यंतची शाळा निश्चितपणे असते. काही ठिकाणी कॉलेजेस आहेत, तर काही ठिकाणी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजदेखील आहेत. या उपलब्धतेमुळे साखर कामगारांची बहुतांश मुले शिकलेली आहेत. त्यात काही इंजिनियर झालेत, तर काही डॉक्टरदेखील झाले आहेत. अगदीच काही नाही झाले तरी आयटीआय पास बरेच मुले आहेत.

कारखान्यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे व सुविधांमुळे कामगारांच्या मुलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. या काळात आई-वडिलांनी घेतलेले परिश्रम आणि भोगलेले चटके, तसेच आपल्या वडिलांना कुटुंब चालवताना करावी लागणारी कसरत या मुलांनी स्वतःच्या डोळ्यांनी रोज पाहिलेली असल्यामुळे या सर्व मुलांना परिस्थितीची जाणीव असते आणि म्हणूनच ही मुले शिक्षण घेत असताना कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपले स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे या जिद्दीने साखर कामगारांची मुले शिकत असतात.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना उत्तम नोकऱ्याही मिळालेल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करणारी कामगारांची मुले काही कमी नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहून, करिअर उत्तम रीतीने घडवणारी साखर कामगारांची मुले पाहिली, की साखर कारखाना म्हणून मला फार मोठे समाधान वाटते.
खरं म्हणजे जीवनात यश मिळवून मोठे व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो काही जण थोडीफार मेहनत करतात किंवा प्रयत्न करतात आणि ते खूप अवघड वाटले की सोडून देतात. पण त्यात काही लोक असे असतात कितीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला तरी देखील उरशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात.

अनेक पालक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अगदी पहिल्या वर्गापासून ॲडमिशन साठी सतर्क असतात मोठमोठ्या शाळा, कॉलेज मध्ये मुलांना ॲडमिशन घेतात. आणि हव्या त्या शाळेत प्रवेश म्हणून हवी तेवढी फी देऊन मुले अशा मोठ्या शाळा कॉलेजमध्ये शिकत असतात. माझ्या साखर कामगाराला जेवढा पगार मिळतो तेवढी फी दरमहा शाळा कॉलेजला देऊन मुले शिक्षण घेत असतात. परंतु माझ्या साखर कामगाराचा मुलगा किंवा मुलगी हे उपलब्ध असलेल्या मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात. शाळा कॉलेजचे नाव मोठे नसले, तरी साखर कामगारांच्या मुलांनी उत्तुंग यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आपण आज पाहत आहोत. त्याला कारण म्हणजे त्यांना परिस्थितीने दिलेली शिकवण ही त्यांच्यासाठी खूप मोलाची असते.

मला किती सुविधा उपलब्ध आहेत, यापेक्षा माझ्या आई-वडिलांची व कुटुंबाची परिस्थिती कशी आहे याचा विचार करून, माझ्या कार्यस्थळावर असलेल्या शाळा कॉलेज व इतर तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेनुसार ही साखर कामगारांची मुले शिक्षण घेत असतात. साखर कामगाराकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची मोठी तरतूद नसली तरी देखील ही मुले शिक्षण घेतात.

माझ्या साखर कामगाराचा तोराच न्यारा
माझा साखर कामगार आर्थिक परिस्थितीने फार सुदृढ नसला, तरी सामाजिक जीवनामध्ये त्याची एक वेगळी ओळख झालेली असते. एक तर मी ग्रामीण भागात असतो आणि माझ्या माध्यमातून तालुक्यातले सर्व कार्यकर्ते पुढारी व नेते तयार होत असतात. या लोकांना माझ्या प्रत्येक साखर कामगाराची कधी न कधी गरज असते. त्यामुळे ते साखर कामगारांशी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवतात.

ज्या कार्यक्षेत्रात माझी उभारणी झाली असते, त्या संपूर्ण क्षेत्रात जेवढे काही माझे साखर कामगार असतील त्या सर्वांना परिसरातील लोक ओळखत असतात. त्यातून साखर कामगारांचे समाजामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण होते. त्याच्या शब्दाला व कृतीला समाजात मानदेखील असतो. त्यामुळे त्याच्याकडे गरजेपुरता व जेमतेम पैसा असला, तरी त्याचे सामाजिक वजन चांगले असते. त्यामुळे त्याचे कोणतेही काम सहसा अडत नाही. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत थोडेफार पैसे कमी जास्त असले, तरी त्याच्या मुलांना आवश्यक त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. फार नावाजलेल्या संस्थेत प्रवेश नाही मिळाला, तरी देखील शिक्षण पूर्ण करता येईल अशा छोट्याशा संस्थेत प्रवेश घेऊन साखर कामगारांची मुले नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षाही चांगल्या करिअरच्या संधी प्राप्त करून घेतात आपण पाहिले, तर साखर कामगारांची मुले डॉक्टर आहेत, वकील आहेत… इंजिनिअर आहेत… एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस व क्लास वन अधिकारी झालेले हजारो उदाहरणे आपणास पहावयास मिळतील.

तारेवरची कसरत करून प्रपंच करणारा माझा साखर कामगार आपल्या मुलांना शिकवतो आणि आपल्यापेक्षा मोठी झालेली पाहतो तेव्हा स्वत:च्या अनंत अडचणी विसरून मुलांच्या प्रगतीकडे पाहत आनंदाश्रू ढाळत असतो.

यशाचे श्रेय नशीबापेक्षा मेहनतीलाच
हे का शक्य होतं? बऱ्याच वेळा लोक म्हणतात, त्याचं नशीब चांगलं आहे. मुलांना चांगली नोकरी मिळाली, मुलीचे लग्नही झाले… जावई चांगला मिळाला आणि सून चांगली मिळून त्याच्या मुलाचा, मुलीचा प्रपंचही सुरू झाला. हे सगळं करण्यामागे त्याचं नशीब आणि त्याला ईश्वराने दिलेला आशीर्वाद कामाला आला म्हणूनच तो सामान्य कामगार असूनही ईश्वर कृपेने असामान्य मुलाचा बाप झाला. एखाद्याने यश मिळवले म्हणजे समाजामध्ये अशी चर्चा ऐकायला मिळते. माणूस यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तो प्रचंड मोठा झालेला प्रत्येक जण पाहतो. पण त्याचा शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास किंवा त्याची पायवाट त्यावेळी कोणी लक्षात घेत नाही. आयुष्यामध्ये कोणालाही कधीही कसेही आणि कोणत्याही परिस्थितीत सहजासहजी काहीही मिळत नाही. फुकट तर अजिबात मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मेहनती बरोबर प्रामाणिकपणा असावा लागतो आणि या सर्वांमध्ये आयुष्यभर सातत्य ठेवावे लागते.

आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला कौशल्य प्राप्त करावे लागते, तरच हे शक्य होते. मला साखर कारखाना म्हणून याचा सार्थ अभिमान आहे की माझ्याबरोबर माझ्यासारखाच संकटांना तोंड देणारा, कायम अडचणीत असणारा, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हतबल झालेला, सुखापेक्षा दुःखाचे दिवस जास्त पाहणारा व अनुभवणारा मी जसं अनेक वादळांना तोंड देत उभा आहे, अगदी तसंच माझा साखर कामगार देखील सर्व अडचणींवर मात करत माझ्यासारखाच कासवाच्या गतीने का होईना; पण शर्यत मात्र जिंकतोच. कधी हार मानत नाही. ही शर्यत जिंकण्यासाठी त्याला पाठबळ देते ते त्याची मेहनत त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याच्यातील कौशल्य.

 नुकतेच आपण पाहिले की आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडली. आषाढी एकादशी म्हटले की पंढरपूर आणि विठोबा क्षणात डोळ्यासमोर उभे राहतात. हजारो नव्हे, तर लाखो वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी होतात. दिंडीत जाताना तो आपली सर्व दुःख विसरतो आणि एकच डोळ्यासमोर असते विठोबाची भेट आणि त्याचं दर्शन म्हणून वारीमध्ये सुद्धा पंढरीरायाचा जयजयकार करत हे वारकरी वारी करत असतात. 

मिळेल तो निवारा आणि जमेल तशी वाट पार करत, ही वारकरी मंडळी विठोबाच्या चरणी नतमस्तक होतात. सध्या वारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोक जातात. उद्योगपती, अधिकारी, नेते मंडळी, मंत्री, आमदार, खासदार, काही प्रमाणात सिनेकलावंत हेसुद्धा वारीत सहभागी होतात. परंतु सर्वात जास्त सहभाग असतो सामान्य लोकांचा की ज्यांचे उत्पन्न जेमतेम आहे आणि आपला प्रपंच चालवत असताना मोठ्या अडचणींना तोंड देत ते आपल्या प्रपंचाचा भार देवावर वाहतात. मोठ्या भक्ती भावाने हे वारकरी नित्य वारी करत असतात. आपला प्रपंच सांभाळून वारीत सहभागी होत असतात व विठ्ठल चरणी लिन होतात. त्या विठ्ठल भक्तांचा जसं विठ्ठलावर विश्वास असतो भरवसा असतो.

मी देव नसलो तरी देखील सहकाराच्या व ग्रामीण भागाच्या दिंडीतील हे साखर कामगार मला विठोबाच्या जागी पाहतात कारण जसा विठ्ठल आपल्या भाविकांसाठी कर कटावरी ठेवून स्थितप्रज्ञपणे भाविकांची वाट पाहत त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सदैव तत्पर असतो. तसंच मी देखील या माझ्या साखर कामगार रुपी वारकऱ्यांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी ठामपणे उभा आहे.

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात,
हेचि थोर भक्ती आवडती देवा | संकल्पावी माया संसाराची ||
ठेविले अनंते तैसेची रहावे | चित्ती असों द्यावे समाधान ||
वाहिल्या उव्देग दुःखचि केवळ |भोगणे ते फळ संचिताचे ||
तुका म्हणे घालू तयावरी भार | वाहू हा संसार देवापायी ||

ज्या ज्या विश्वासाने आत्मीयतेने व भावभक्तीने विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या पायी त्यांचा संसार अर्पण करतात. तद्वत माझा साखर कामगार माझी भक्ती करतो. त्याच्या संसाराचा विचार न करता तो कारखाना म्हणून माझी पूर्णपणे सेवा करतो आणि माझी सेवा करत असताना तो मी त्याला जसा ठेवेल तसंच राहतो आणि आहे त्या परिस्थितीत त्याचे चित्त समाधानी असते. माझ्या साखर कामगाराला माहीत असते कितीही उद्वेग केला संप आणि भानगडी जरी केल्या तरी देखील त्याच्यातून केवळ दुःखच मिळणार आहे. त्यापेक्षा तो म्हणतो. माझ्या संचिताचे फळ मला भोगायचे आहे.

म्हणून माझा कामगार मला देवासमान मानून तो त्याचा भार माझ्यावर घालतो. तो नुसता स्वतःच असे करत नाही तर साखर कामगार त्याचा संपूर्ण संसार मला अर्पण करतो. इतक्या मनोभावे साखर कामगारांनी माझी सेवा केल्यानंतर मीही त्याचे भले करण्यासाठी अंत:करणातून ईश्वराचा धावा करतो आणि त्याच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऐश्वर्य निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि म्हणूनच ह्या साखर कामगारांची मुले मोठी झालेली पाहून मला खूप मोठे समाधान लाभते.

साधारणपणे नोकरवर्ग म्हटला की त्याचे आयुष्य हमखासपणे सुख-समृद्धीचे असते. हमखास दरमहा पगार देणारा उद्योग त्याच्या पाठीशी असतो. परंतु माझ्या साखर कामगारांचे मात्र शासकीय व खासगी क्षेत्रातील नोकरांसारखे नसते. प्रामाणिकपणे काम करून देखील त्याला त्याचा मोबदला वेळेत मिळेल, याची शाश्वती नसताना देखील तो समाधानी असतो. एक परिपूर्ण जीवन जगतो आणि पुढील पिढीला घडवत असतो. त्याचे कारण म्हणजे, त्याची श्रद्धा, प्रामाणिकपणा, इमानदारी आणि कौशल्य हे घटक त्याच्यापाशी असतात. मोठे यश मिळवायचे असेल तेव्हा त्याचा मार्ग कुठे सापडेल याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. म्हणून माझ्या साखर कामगारांनीदेखील समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. तो खालील प्रमाणे

मोठे यश मिळवण्याचा मार्ग
जगातला कोणताही माणूस यशस्वी होऊ शकतो
त्यासाठी मेहनत, इनामदारी आणि कौशल्य
हे तीन घटक महत्त्वाचे आहेत

पहिला टप्पा : मेहनत
कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत घेण्याची तयारी असेल, तर माणूस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. मेहनत करायची असेल तर तुम्हाला आळस बाजूला केला पाहिजे. न थकता मेहनत करता यावी म्हणून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवे. मेहनतीची सवय झाली की मग माणूस प्रगतीचा एक टप्पा ओलांडतो आणि दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतो.
प्रगतीचा दुसरा टप्पा म्हणजे इमानदारी. म्हणजे दिलेला शब्द पाळणे, वादा पूर्ण करणे. सत्याचा स्वीकार आणि असत्याचा तिरस्कार. आपल्या तोंडून निघालेला शब्द मागे न घेणे. म्हणजे ठरवलेला निश्चय पूर्ण करणे. त्यापासून परावृत्त न होणे. चूक झाल्यास ती नि:संकोचपणे मान्य करणे आणि ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
तिसरा टप्पा स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करण्याचा आहे. सातत्य ठेवून कोणत्याही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळविणे. आपल्या यशामध्ये मेहनतीचा 30 टक्के वाटा असतो, इमानदारीचा 50 टक्के, तर कौशल्याचा 20 टक्के वाटा असतो. अशा प्रकारे आपण शंभर टक्के यशस्वी झालो, तर आपण मोठे यश मिळवू शकतो.
हा संदेश माझा साखर कामगार सर्व जगासमोर ठेवतो. म्हणून सर्व अडचणींवर मात करत तो यशस्वीदेखील होतो.
या सर्व परिस्थितीमुळे माझ्या साखर कामगारांचे वागणे तुकाराम महाराजांच्या खालील अभंगाप्रमाणे आहे.

सत्यकर्म आचरे रे | बापा सत्यकर्म आचरे रे ||
सत्यकर्म आचरे होईल हित | वाढेल दुःख असत्याचे||
उस वाढविता वाढली गोडी | गुळ साखर हे त्याचे परवडी ||
साखरेच्या आळा लावीला कांदा | स्थूल नाना परी वाडी दुर्गंधा ||
सत्य-असत्य हे ऐशिया परी | तुका म्हणे याचा विचार करी ||

म्हणूनच ज्या साखर कामगारांनी वरीलप्रमाणे आचरण केले, त्यांचे मी भलेच केले आहे. तुम्ही पाहत आहात की साखर कामगार किती लहान असो किंवा मोठा असो, त्याचा संबंध समाजातील प्रत्येक घटकाशी येतो. जसा श्रीमंतांशी येतो, तसा गरिबांशी येतो. लहान-मोठ्यांशी येतो आणि त्याचमुळे साखर कामगार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. तो ऊस उत्पादक, शेतकरी ऊस तोडणी मजूर, माझे पदाधिकारी यांचा दुवा बनलेला आहे.
आर्थिक परिस्थितीने थोडाफार कमी असलं तरी देखील सामाजिक परिस्थितीत त्याची उंची मोठी आहे. लहानांपासून थोरांपर्यंत संबंधित असतो. त्याला गरीब शेतमजूर व ऊस तोडणी कामगार भेटले तरी तो ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी किंवा उच्च पदस्थ लोकांशी वागतो तसा नम्रतेने खालच्या स्तरातील लोकांशी देखील वागतो. त्यांनी लहानपण देखील पाहिले आहे आणि मोठेपण देखील अनुभवले आहे. त्याच्यावर कितीही संकटे आली तरी त्याने माझ्यावरची श्रद्धा ढळू दिली नाही. तो मेहनतीने व कौशल्याने प्रामाणिकपणे माझे काम करत राहिला आणि मला देवाप्रमाणे सांभाळत राहिला, ही माझी साखर किमया आहे. म्हणून मी व माझा साखर कामगार संत तुकाराम महाराजांच्या खालील अभंगाच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो.


मुंगी आणि राव | आम्हा सारखाची जीव ||
गेला मोह आणि आशा | कळी काळाचा हा फासा ||
सोने आणि माती | आम्हा समान हे चित्ती ||
तुका म्हणे आले | घरा वैकुंठ सावळे ||


अशाप्रकारे अनंत अडचणी येऊन देखील माझ्या साखर कामगारांनी त्याचे वर्तन कर्म आणि आचार विचार चांगले ठेवले आणि मनोभावे माझी सेवा करत राहिला म्हणून मी त्याच्या सेवेला उतराई होत असताना त्याला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला.

पण जरी माझा प्रयत्न कमी पडला, तरी माझी त्यांनी सेवा केल्यामुळे आणि तीही प्रामाणिकपणे व निष्ठेने केल्यामुळे विठ्ठलाने माझे गाऱ्हाणे ऐकले आणि साखर कामगारांच्या पुढच्या पिढीला आशीर्वाद दिले म्हणूनच माझ्या साखर कामगारांची मुले आज मोठमोठ्या पदावर काम करत असून देखील त्यांनी आपल्या आई-वडिलांशी कधीही प्रतारणा केली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे आई-वडिलांची दुःख मेहनत, संकटकालीन प्रपंच चालवण्याची धडपड, अत्यल्प पगारात कुटुंब चालवून आपल्या मुलांना दिलेले शिक्षण हे त्यांची मुले कधीही विसरत नाहीत…. ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »