ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात
संगमनेर : ऊस उत्पादक शेतकर्यांनी अधिकाधिक उत्पादन घेत दर हेक्टरी उसाची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी कांचन थोरात यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ होते.
योवळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधीर जोशी, बाजीराव खेमनर, लहानुभाऊ गुंजाळ, रामनाथ राहणे, साखर कारखान्याचे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक इंद्रजित थोरात, गणपत सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने मागील वर्षी 15 लाख मेट्रिक टन उसाचे गळीत केले होते. मात्र यावर्षी 10 लाख मेट्रिक टन उसाचे गळीत होईल की नाही, याबाबत साशंकता होती. तरीदेखील सर्वांच्या सहकार्याने 10 लाख मेट्रिक टनाच्या पुढे या साखर कारखान्याने गळीत केले आहे. हे खरे असले तरी यावर्षी कारखान्याची रिकव्हरी 12.03 पर्यंत गेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला भाव वाढवून द्यावा लागेल.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, साखर कारखान्याने साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मितीबरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये मोठी संधी असून कारखान्यांच्या प्रशासनाने इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. चेअरमन ओहोळ म्हणाले यांनी सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांचे चांगल्या उताऱ्याबद्दल आभार मानले. प्रास्ताविक साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.