भीमा मल्टिस्टेट कारखान्याच्या सभेत पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत जाहीर !

मोहोळ : तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा मल्टिस्टेट सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून स्वःनिधीतून ५० लाखांपर्यंत मदत करण्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले. कारखान्याची ही सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेदरम्यान खा. धनंजय महाडिक यांनी ही घोषणा केली.
आठवड्याभरात कर्मचाऱ्यांचा मिळणार पगार
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शेतकरी व कामगारांना गळीत हंगाम सन २०२५ – २६ मध्ये अडचण येऊ देणार नाही. कारखान्यास सुरुवातीस आलेल्या उसास वाढीव रु. ५० रु. प्रति मे. टन व ज्यांचे रु. २८०० प्रमाणे बिल देण्याचे राहिले होते. अशा शेतकऱ्यांना रु. १०० प्रति मे. टन याप्रमाणे बिल देण्याचे जाहीर केले. कामगारांचा पगार थकीत आहे. जरी कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एकही रुपाया देणे थांबवणार नाही. सन २०२४-२५ मध्ये कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार येत्या आठवड्याभरात देण्यात येईल.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पुढील हंगाम ही पूर्ण क्षमतेने चालू करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून, मशिनरीचे काम प्रगतीपथावर आहे. कारखान्यास इथेनॉल व २०० के. एल.पी.डी. डिस्टलरी प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली असून, तो लवकरात लवकर उभा करणार असल्याचे सांगितले.