‘भीमा पाटस’च्या कामगारांना पगारवाढ
पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर झाली आहे. कारखाना चालू केल्याबद्दल व पगारवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल कामगारांनी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा सत्कार केला.
गेल्या गळीत हंगामापासून हा कारखाना कर्नाटकमधील निराणी ग्रुपने भाडेतत्वावर चालवायला घेतला आहे. निराणी ग्रुपने सर्व जुन्या कामगारांना कामावर घेतले आहे. भीमा कामगार संघाने प्रशासनाकडे पगारवाढीची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने ही पगारवाढ दिली आहे. ठेकेदारीवरील २५० कामगार वगळता कारखान्यात ७०० कामगार काम करीत आहेत.
कामगार संघाचे अध्यक्ष अर्जून दिवेकर म्हणाले, “या निर्णयाने कामगारांना सरासरी तीन हजार रूपये पगारवाढ झाली असून मागील चार महिन्यांचा फरकही लवकर मिळणार आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमित भरली जात आहे. जादा तास कामाचा पगार व १२ टक्के पगारवाढ एप्रिल महिन्याच्या पगारात मिळाल्याने कामगारांमध्ये समाधान आहे.”
भीमा पाटस कामगारांच्या पगाराचा विषय हा गेली अनेक वर्ष चर्चेचा विषय होता.