भीमाशंकर कारखान्याकडून ३२९० रुपये ऊसदर जाहीर

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिमेट्रिक टनसह अंतिम ऊसदर ३ हजार २९० रुपये प्रतिमेट्रिक टन जाहीर केला आहे, त्यामुळे कारखाना परिसरातील सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार हा दर जाहीर केल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५३ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ३८ हजार ४९६ मेट्रिक टन उसासाठी कारखान्याने यापूर्वी एफआरपीनुसार ३ हजार ८० रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिमेट्रिक टन निश्चित केला. हा हप्ता दिवाळी सणापूर्वी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
दरवाढीची परंपरा यापुढेही कायम राहील
भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊसउत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून, यापुढेदेखील ही परंपरा कायम राहील. गाळप हंगाम २०२५-२६ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.