‘भीमाशंकर’ देणार रु. ३२०० चा अंतिम ऊस दर
पुणे : अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामासाठी उसाला रू. ३२०० प्रति टन एवढा अंतिम दर देण्याची घोषणा केली आहे.
संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना वेगाने प्रगती करत आहे. मागील सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम ऊस दर रु.३२००/- प्रति मे. टन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ९ हजार ४६८ मे. टन ऊसासाठी कारखान्याने एफ.आर.पी. नुसार रु. २७९०.१० प्रति मे. टन दर येत असतानाही यापूर्वी रु. २९५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३२७ कोटी २९ लाख ३० हजार एकरक्कमी ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केलेली आहे.
याशिवाय १.८३ लाख मे. टन खोडवा उसासाठी रु. १००/- प्र. मे. टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात रु. १३७/- प्रति मे. टन वाढ होवूनही रु. ३२००/- प्रति मे. टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अंतिम हप्ताची रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे, असे बेंडे यांनी सांगितले.
भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही ही परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२४-२५ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.