कुष्ठरोग्यांनाही ‘भूमाता’चा आधार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वर्धापनदिनी भावना, मान्यवरांकडून शुभेच्छा

पुणे : महिला सबलीकरण, पुनर्वसन, पर्यावरण, कृषी इ. क्षेत्रांमध्ये तीन दशके काम करणाऱ्या भूमाता संघटनेने कुष्ठरुग्णांनाही आधार देण्याचे काम केले आहे, अशा भावना पुण्यातील कुष्ठरोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन केलेल्या भूमाता परिवाराचा ३१ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. यावेळी राज्यातील विविध भागातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी डॉ. मुळीक यांना शुभेच्छा दिल्या.

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शेवगावचे ‘जलपुरुष’ शिवाजीराव काकडे, सौ. हर्षदा काकडे, मुंबईहून आलेले भास्कर मुळीक, साताऱ्याचे मोहनआबा भोसले, पुण्यातील डॉ. मिनू मेहता कुष्ठरुग्ण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव राजू चौधरी आदींनी यावेळी शुभेच्छापर मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. मिनू मेहता संस्थेच्या वतीने डॉ. मुळीक आणि सौ. शालिनीदेवी मुळीक यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

माजी आमदार मोहन जोशी, निवृत्त आयएएस अधिकारी शेखर गायकवाड, कलशेट्टी, यांच्यासह माजी मनपा अतिरिक्त आयुक्त यशवंतराव खैरे, उद्योजक सुरेशराव कोते, सीए राज देशमुख, एम. एस. जाधव, अनिल कारंजकर, बदलापूरचे राज जाधव, पेणचे अविनाश पाटील आदींसह शेकडो लोकांनी वर्धापन दिनी गर्दी केली होती.

‘भूमाता’च्या अतुलनीय योगदानाचा मी सुरुवातीपासून साक्षीदार आहे. डॉ. मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ‘भूमाता’ने हजारो लोकांवरील अन्यायाला वाचा फोडून, त्यांच्या समस्यांच्या निवारण केले आहे, असे उद्‌गार डॉ. कदम यांनी काढले.

आमच्या संस्थेच्या २५ लाखांचा वीज बिलांचा प्रश्न असो, की कोरोना काळामध्ये संस्थेसमोर उभ्या राहिलेल्या समस्या असो, ‘भूमाता’चे संस्थापक डॉ. मुळीक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले; वीज बिलाचा प्रश्न तर सोडवलाच, शिवाय संस्थेला कोट्यवधी रुपये मूल्याचे काम देऊन कुष्ठरुग्णांना जगवले, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »