कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर -के. पी. पाटील

‘दूधगंगा-वेदगंगा’च्या साठ सेवानिवृत्त कामगारांचा हृद्य सत्कार
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० सेवानिवृत्त कामगारांचा मौनीनगर साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर आहे, असे उद्गार चेअरमन के. पी. पाटील यांनी यावेळी काढले.

सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, कारखाना व कामगार संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवानिवृत्त कामगारांचे योगदान मोलाचे आहे. शेतकरी, सभासद, कामगार, संचालक आणि अधिकारी यांच्या आस्थेमुळे कारखाना राज्यात प्रगतिपथावर आहे. कामगारांनी गरजेनुसार कर्ज घेऊन ती वेळेत परत फेड केल्यामुळे पतसंस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. कामगारांच्या जीवनात समृद्धी आणणारा कारखाना आणि पतसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
के. पी. पाटील, उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळाच्या हस्ते निवृत कामगारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कामगार नेते आर. वाय. पाटील, तसेच संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे, पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष विजय गुजर, उपाध्यक्ष मधुकर लोहार, कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले, संस्थेचे सर्व संचालक, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र मोरे, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष विजय गुजर यांनी प्रास्ताविक केले. संचालक किशोर पाटील यांनी स्वागत केले. सदाशिव पाटील यांनी आभार मानले.