बिग ब्रेकिंग : रेणुका शुगर विनाकपात रू. ३३०० एकरकमी देणार
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना चालवणाऱ्या रेणुका शुगर्सने शनिवारी तातडीने परिपत्रक जारी करून, रू. ३३०० प्रति टन विनाकपात आणि तेही एकरकमी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे – सर्व ऊस पुरवठादार शेतकरी बंधू व भगिनिंना कळविणेत येते की, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि, लिज युनिट ऑफ श्री रेणूका शुगर्स लि, या कराखान्याने सन २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये येणा-या ऊसासाठी उच्चांकी दर रूपये तेहतिसशे प्रति टन (३३००/- प्रति टन) एक रक्कमी विनाकपात देणेचा निर्णय श्री रेणूका शुगर्स लि, च्या प्रशासनाने घेतला आहे.
चालू गळीत हंगामाचा कालावधी फारच कमी असलेने सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवावा असे आव्हान देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि, गंगानगर इचलकरंजी व श्री रेणूका शुगर्स लि, च्या प्रशासनाने केले आहे.
शेतकरी संघटनेने शुक्रवारी कारखाना परिसरात धडक देऊन, ऊसतोडी बंद पाडल्या होत्या. जेथे जेथे तोडणीचे काम सुरू होते, तेथे जाऊन आंदोलन करण्यात आले. प्रति टन रू. ३३०० दर जाहीर करावा, तसे पत्र द्यावे, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. त्यास रेणुका शुगर्स व्यवस्थापनाने त्वरित प्रतिसाद दिला.