इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहन इंजिनावर दुष्परिणाम नाहीच

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे पुन्हा स्पष्टीकरण
नवी दिल्ली : इथेनॉलबाबत अनेक जण फारसे संशोधन न करता अफवा पसरवीत असल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ऊस किंवा अन्नधान्यापासून तयार केलेले इथेनॉल पेट्रोलमध्ये २०% मिसळल्यानंतर त्याचा कसलाही वाहनावर नकारात्मक परिणाम होत नाही. इंजिनावर परिणाम होत असता तर मुळात वाहन कंपन्यांनीच अशा प्रकारचा प्रस्ताव स्वीकारला नसता असे त्यांनी पुन्हा सूचित केले. इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहनांच्या इंजिनावर परिणाम होत असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र या आरोपात कसलेही तथ्य नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.
पेट्रोलियम मंत्रालयाने सुरुवातीपासूनच इथेनॉलचा वाहनाच्या इंजिनावर परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर काही जुन्या वाहनांमध्ये किरकोळ बदल करण्याची गरज असते असेही यापूर्वी सांगण्यात आले होते. सर्व प्रकारचा विचार करूनच भारताने २०१४ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्याचे धोरण ठरविले आहे. २०१४ मध्ये इथेनॉल निर्मितीची क्षमता कमी होती. त्यामुळे पेट्रोलमध्ये केवळ १.४ टक्के इथेनॉल वापरले जात होते. आता हे प्रमाण वाढून २० टक्क्यावर गेले आहे. इथेनॉलबाबत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून या विषयावर देशभरात उलटसुलट चर्चा चालू झाल्या आहेत. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.