एलपीजीला उत्तम पर्याय ठरेल एलबीजी : ठोंबरे


पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस क्षेत्रातील तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सीबीजी तयार होत आहे, त्यापासून एलबीजी तयार करता येईल, असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले. आयएफजीईचे दिलीप पाटील यांनीही यास दुजोरा दिला.
अमेरिका – इराण युद्धामुळे एलपीजी अर्थात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने लोकजीवन आणि उद्योगांवर परिणाम होऊ लागला आहे. हॉटेल व्यवसायावरील संकट गडद होत आहे. उद्योग क्षेत्रालाही एलएनजी आणि एलपीजीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. या क्षेत्राच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. हे युद्ध किती दिवस चालणार, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नसल्याने सर्वांच्याच मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होत आहेत.
युद्धाची झळ घरांनाही बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘विस्मा’चे अध्यक्ष आणि नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की, एलपीजी सारख्या फॉसिल आधारित इंधनाला व्यापक पातळीवर पर्याय शोधण्याची गरज फार पूर्वीच निर्माण झाली आहे. त्यासाठी अशा युद्धाची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती. पण या युद्धामुळे हा विषय अधिक गांभीर्याने समोर आल्याने एलपीजीला पर्याय शोधण्याची चर्चा सुरू झाली ही चांगलीच बाब आहे.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन करतो आहोत. त्याच्या वितरणासाठी आम्ही पंपदेखील सुरू करून वाहनांना इंधन पुरवठा सुरू केला. हा प्रकल्प कमालीचा यशस्वी झाला आहे. याच सीबीजीचे द्रवरूप बायोइंधन (एलबीजी) तयार करून ते एलपीजीला पर्याय म्हणून वापरता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे सध्या असलेले गॅसस्टोव्ह त्यासाठी चालू शकतात, असे श्री. ठोंबर म्हणाले. नॅचरल शुगरच्या गेस्ट हाऊसमधील एलपीजी संपल्यानंतर सीबीजीचाच नियमितपणे वापर केला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एलपीजी वाहतुकीवर मोठा खर्च होतो; मात्र सीबीजीपासून बनलेला एलबीजी स्थानिक असल्याने, त्या त्या भागात वाहतूक करणे सोपे होईल आणि त्यावरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा दूरगामी निर्णय जसा सरकारने घेतला, तसा याबाबतही घेण्याची गरज आहे, असेही श्री. ठोंबरे यांनी सुचवले.
मारुती सुझूकी कंपनीचे शिष्टमंडळ आजच आमच्या भेटीला आले असून, त्यांनी कंपनीसाठी सीबीजीची मागणी नोंदवली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर एलएनजी देखील लागतो.
इथेनॉलदेखील एलपीजीला पर्याय ठरू शकतो का, असे विचारले असता, ‘याविषयी माझ्याकडे तपशील नाही; तोदेखील चालू शकेल, मात्र त्यासाठी वेगळा स्टोव्ह लागू शकतो’, असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.
सीबीजी चांगला पर्याय : दिलीप पाटील

सीबीजीचे द्रवीकरण करून त्याचा वापर घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी उपयोग करणे शक्य आहे आणि तो एलपीजीला उत्तम पर्याय ठरतो, असे प्रतिपादन IFGE बायोएनर्जी फोरमचे सहअध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.
मात्र सीबीजी उद्योग संपूर्ण देशाची एलपीजीची गरज भागवू शकेल काय, याबाबत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली. देशाची एलपीजीची मागणी प्रचंड आहे, म्हणून यासाठी खूप व्यापक प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.




