गतिशील परिवर्तनवादी नेते : देवेंद्र फडणवीस

आवडल्यास ही बातमी शेअर करा
महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी आणि सकारात्मक दिशा देणारे तरुण नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारित आणि फाउंडेशन फेलो एएएई डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा… !

महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्केटिंग खेळाडू राहुल राणे यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. खर्च प्रचंड येणार होता. आम्ही याबाबत देवेंद्रजींना एक एसएमएस पाठवला. त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि राणे यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेतली. तब्बल २२ लाख रुपये झाले होते. असे अनेक हेलावणारे अनुभव देवेंद्रजी यांच्याबाबत आमच्या गाठीशी आहेत.

महाराष्ट्राचे लोकप्रिय तरुण नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आपण लिहावे, अशी अनेक दिवसांपासून वाटत होते. त्यासाठी वाढदिवसासारखे दुसरे औचित्य काय असू शकते? देवेंद्रजींचा नागपूरचे नगरसवेक, महापौर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री हा प्रवास अभ्यासला आहे व काही पाहिलेला आहे. तसेच ‘भूमाते’ने अनुभवलाही आहे. त्यांच्या राजकारणाची दिशा आम्हाला नेहमीच आश्वासक वाटत राहिलीय. २०१४ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. अर्थात त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही नवी दिशा दिली. मराठा आरक्षणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न गांभीर्याने घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते त्यांच्या उक्ती आणि कृतीतून दिसले.

फडणवीस कुटुंबीय हे मूळचे चंद्रपूर तालुक्यातील मुल गावचे. तिथे त्यांचे आजोबा काशीनाथराव हे १५ गावांचे मालगुजार होते. मालगुजार म्हणजे त्या भागातील शेतसारा वसुल करून देणारे सरकारचे प्रतिनिधी. तेथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी सोडल्या, तर उर्वरित सर्व जमिनींचे आणि जंगलाचे मालक म्हणजे मालगुजार प्रतिनिधी. त्याकाळी एक नियम होता. या भागातून किती शेतसारा गोळा होऊ शकतो, याचे गणित आधीच मांडले जाई. तेवढा शेतसारा जमा करणे मालगुजारांना सक्तीचे होते. मग तो गोळा झाला की नाही, याच्याशी सरकारचे देणेघेणे नसायचे. हजारो एकर जंगल आणि सातशे एकर शेतीचे मालक हे कुटुंब होते. आज त्यांच्याकडील प्रत्येकाकडे काही एकरच शेतजमीन असेल.

देवेंद्रजींचे आजोबा काशीनाथराव (रावबहादूर हा किताबही त्यांना मिळाला होता) यांच्यापासूनच फडणवीस कुटुंबाने सामाजिक कार्याचा वसा पुढे नेला आहे. आपल्याकडे जे जास्तीचे आहे, ते अन्य गरजूंना दिले पाहिजे, असे या कुटुंबाचे सामाजिक तत्त्व आहे आणि त्यातून त्यांनी अनेकांना मदत केली आहे. आपल्या घरातील कामगारांना ट्रस्ट स्थापन करून, गेली ३६ वर्षे पेन्शन देणारे फडणवीस कुटुंब हे अपवादात्मक उदारहण असेल. आजही पाच जणांना दरमहा पेन्शन दिले जाते, हे देवेंद्रजींचे काका श्रीकृष्ण ऊर्फ बाळासाहेब यांनीच आम्हाला सांगितले. त्याला ‘गंगाधर पेन्शन योजना’, असे नाव आहे. गंगाधरराव म्हणजे देवेंद्रजींचे वडील. एका कामगाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला २० वर्षांपासून पेन्शनच्या पोटी दरमहा दोन हजार रूपये दिले जातात. अशी उदाहरणे विरळाच असतील.

देवेंद्रजींनी कुटुंबाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा वसा पुढे केवळ कायमच राखला नाही, तर सामाजिक कार्याच्या कक्षा अधिक विस्तारत नेल्या. त्यांचे वडील गंगाधरराव यांचे कर्करोगामुळे (कॅन्सर) १९८८ साली निधन झाले. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आपण काही तरी केले पाहिजे, असा संकल्प त्यांनी सोडला आणि नितीनजी गडकरींसह नागपुरात सर्व सोयींनी युक्त, अत्याधुनिक विशाल कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली. त्याचे लोकार्पण अलीकडेच झाले आहे. आज हजारो कॅन्सर रुग्णांचे जीवन त्यामुळे सुसह्य झाले आहे.

गेल्या जानेवारीतील प्रसंग, पुण्यातील नामवंत स्केटिंग खेळाडू राहुल राणे यांना अकस्मात हार्ट ॲटॅक आला. त्यांना पुण्यातून मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावरील उपचार प्रचंड खर्चिक होता. आम्ही केलेल्या एका एसएमएस वर देवेंद्रजी मदतीला धाऊन आले आणि उपचाराची जबाबदारी घेतली. दुर्दैवाने राणे गेले, त्यांच्या २२ लाखांच्या बिलाची जबाबदारी देवेंद्रजींनी घेतली आणि मृतदेह पुण्याला पोहोचेपर्यंत स्वत: लक्ष घातले.

आमच्या भूमाताच्या कार्यकर्त्या वंदना चौगुले दोन वर्षांपूर्वी आदी कैलासला ट्रेकिंगला गेल्या होत्या. दरडी कोसळल्याने त्या सहकाऱ्यांसमवेत तिकडेच अडकून पडल्या. आम्ही देवेंद्रजींना एसएमएस केला. त्यांनी तातडीने उत्तराखंड सरकारशी संपर्क साधला आणि अडकलेल्या मुलींची सुखरूप सुटका केली.

तीन वर्षांपूर्वी कृषी मृदा शास्त्रज्ञ प्रा. हर्षद सापटणेकर यांना सायबर चोरट्यांनी लुटले. त्यांनी पोलिसांत रीतसर तक्रार केली. आम्ही ही बाब देवेंद्रजींच्या कानावर एस. एम. एस. च्या माध्यमातून घातली. त्यांनी स्वत: फॉलोअप घेत ७० टक्के रक्कम परत मिळवून दिली. आम्ही एसएमएस केला की ते नेहमीच मदतीला धाऊन आले आहेत आणि कोणाच्याही एस. एम. एस. ला उत्तर देणे / कृती करणे हा त्यांचा इतर नेत्यांनीही आत्मसात करण्यासारखा गुण आहे.

महाराष्ट्राची गती वाढवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाले. या महामार्गाचा दर्जा तपासण्यासाठी देवेंद्रजींनी नागपूर ते शिर्डी गाडी चालवली. शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले. सव्वाचार तासांत त्यांनी ५२० किलोमीटरचे अंतर पार केले.

देवेंद्रजींना लहानपणापासून गतीची आवड आहे. त्यांची हीच गती प्रशासनातही दिसून येते. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी व्हायला हवा आणि परिवर्तनही गतीने व्हायला हवे, अशी त्यांची ठाम धारणा आहे. त्यांच्याशी आमची पहिली भेट ते मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे २१ जुलै २०१५ रोजी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई माध्यमातून, त्यांच्या निमंत्रणावरून झाली.

आमच्या शिरोळ तालुक्यात (जि. कोल्हापूर) दत्त महाराजांचे नृसिंहवाडी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दर बारा वर्षांनी तेथे कन्यागत पर्वाचा सोहळा असतो. त्याला सातशे वर्षांची परंपरा आहे. तेथील अपेक्षित कामांचे पत्र, तेव्हाचे शिरोळचे आमदार उल्हासराव पाटील यांच्यासमवेत भेटीत त्यांना दिले.. त्यांनी कन्यागत पर्वासाठी १२१.६७ कोटींचा निधी दिला. त्याची मंजुरी त्यांनी त्वरित दिली होती. आमच्यासाठी हा सुखद धक्का होता. कारण २०-२५ कोटी मिळाले तरी उत्तमच, अशी आमदारांची धारणा होती. या निधीतूनच नृसिंहवाडीत बसस्टँड, दोन मजली पार्किंग, अंतर्गत रस्ते, घाट, स्ट्रीट लाइट, पाणीपुरवठा, भक्तनिवास, शिरोळ तालुक्यातील सुमारे दोनशे कि.मीं.चे प्रमुख रस्ते, बायोवेस्ट प्रकल्प अशी कामे झाली. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथील अंदाजे १५ लाख भाविकांच्या उपस्थितीत कन्यागत पर्व ‘न भूतो न भविष्यती’ असे पार पडले.

पुणे, मुंबई, नागपुरातील मेट्रो असो की पुणे महापालिकेच्या विकास आराखड्याचा मुद्दा किंवा पीएमआरडीची स्थापना, त्यांच्या गतिमान नेतृत्वाची आणि सक्षम प्रशासकाची झलक अनेकदा अनुभवायला मिळाली आहे. रोज १७-१८ तास काम करूनही ते नेहमी फ्रेश असतात. रोज एक तास जिमही करतात. आमच्या माहितीप्रमाणे, मुंबईत स्वत:चे घर नसलेले हे पहिलेच मुख्यमंत्री असतील.

फडणवीस कुटुंब कधीच जातीयवादी नव्हते, हे आम्हाला फॉरवर्ड ब्लॉकच्या मुशीत तयार झालेले माजी कृषिमंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना जातीयवादी संबोधणाऱ्यांची कीव येते. असे आरोप करणाऱ्यांनी, देवेंद्रजींच्या पुण्यातील काकांच्या घरी पोळ्या कोण लाटते, याचा तरी अभ्यास करायला हवा होता.
वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला या आश्वासक नेतृत्वाकडून शेती व पूरक व्यवसायांसंबंधी काही अपेक्षा आहेत. करोना काळात शेती सोडून सर्व उद्योग-व्यवसाय बंद होते.

याचा अर्थ शेती कधीच बंद करता येत नाही. शेती थांबली, तर जीवनगाडा थांबेल… म्हणून वर्षानुवर्षे तोट्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा असेल, तर त्यांना सर्वांगाने कायद्याने संरक्षित करणे गरजेचे आहे. शेती आणि पूरक उत्पादनांना ‘अस्मानी आणि सुलतानी’ संकटांपासून कायद्याने संरक्षण द्यावे लागेल, त्यास कायद्याने प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित, जमिनीच्या किमतीसह गुंतवणूक धरून, सर्व पिकांसाठी मंडळ पातळीवर उत्पादन खर्च मिळण्याचा कायदा करायला हवा. त्यासाठी ‘इर्मा’सारखी योजना राबवावी. ‘इर्मा’ म्हणजे इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर’. अमेरिका, ब्राझील, जपान इ. अनेक देशांमध्ये ती यशस्वीपणे राबवली जाते. जपानमध्ये १०४ वर्षांपासून ती अमलात आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर भूकंपाचा देश असतानासुद्धा आंदोलन करण्याची वेळच येत नाही.

असे धडाडीचे निर्णय घेण्याची देवेंद्रजी यांच्यात क्षमता आहे व त्यांचे भारत सरकारकडे वजन आहे, याची आम्हाला खात्री आहे. हे घडले तर शेती अनुदानमुक्त होईल, तसेच प्रदूषणमुक्त, रोजगारयुक्त होऊन, शहरांकडे वाहणारे स्थलांतराचे लोंढेही थांबतील. तरुण नेते देवेंद्रजींना आमच्या खूप खूप शुभेच्छा! ईश्वर त्यांना दीर्घायुरोग्याचा आशीर्वाद देवो आणि त्यांच्या हातून समाजहिताची अनेक कामे घडोत, हीच प्रार्थना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »