एआय तंत्रज्ञानाबाबत पवार काका-पुतण्यात एकी दिसली : राजू शेट्टी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राज्यातील सर्व कारखान्यांत ऑनलाईन वजनकाटे करा

सातारा : ‘एआय’ तंत्रज्ञान चांगले आहे; पण ते चोहोबाजूंनी असावे. केवळ कारखाना केंद्रित नसावे, राज्यात २०० कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांत ऑनलाईन वजनकाटे करावेत, जेणेकरून वजनाशी छेडछाड होणार नाही, अशी मागणी आम्ही गेली ८ वर्षांपासून करत आहोत. पण, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

एरवी राजकीय भांडणे करणाऱ्या काका-पुतण्यामध्ये, एआयच्या मुद्यावर मात्र एकी दिसून आली, असा कोपरखळीही त्यांनी मारली.

ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, दत्तूकाका घार्गे, मनोहर येवले, महादेव डोंगरे, शरद इंगळे, नितीन काळंगे याच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक फसवलं जातय….

सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करत आहे. सिंचनासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येत आहेत. या पंपाने आवश्यक तेवढा दाब मिळत नाही. नवीन वीज कनेक्शन बंद केलीत. पश्चिम महाराष्ट्र हा डोंगरात आहे. त्यामुळे नदी, विहिरीतून दूर पाणी नेता येत नाही. यासाठी शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना फसवलं जात आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

‘नुसते कारखानदारांच्या बाजूचे एआय तंत्रज्ञान असेल तर मान्य नाही’

अलीकडील काळात ‘एआय’ तंत्रज्ञान आलं पाहिजे अशी वक्तव्ये होत आहेत. आमची भूमिका ही जगातील अत्युच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशीच आहे.   ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान आलं पाहिजे अशी भाषा मंत्री, कारखानदार करत आहेत. याला ‘स्वाभिमानी’ चाही विरोध नाही. पण, साखर कारखान्यातील काटामारी थांबवण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचाही वापर करावा. नुसते कारखानदारांच्या बाजूचे तंत्रज्ञान असेल तर मान्य होणार नसल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. तसेच ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत पवार काका-पुतण्यात एकी दिसली, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »