कारची ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एक ठार, एक गंभीर

गंगापूर : ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील धुळे जिल्ह्यालील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गंगापूर- वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ गुरुवारी ( दि. ६) रात्री ८ च्या सुमारास घडली. नितीन रामा मारनर (वय ३३, रा. कळंभीर, ता. साक्री, जि. धुळे), असे मृताचे नाव आहे. तर पंकज बोरसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गंगापूरकडून वैजापूरकडे ऊस घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉलींच्या ट्रॅक्टरला (एमएच १९ पी ४४१२) पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच २० बीएन ४५४५) जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील नितीन रामा मारनर (३३) आणि पंकज आत्माराम बोरसे (४०, दोघेही रा. कळंभीर, ता. साक्री, जि. धुळे) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी नितीन मारनर यांना तपासून मृत घोषित केले.






