उसाच्या वाड्यावरून राडा; तरुणाचा संशयास्पद मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कडेगाव : उसाच्या वाड्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीनंतर विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

गुरुवारी (दि. २९) सकाळी ९:३० च्या सुमारास विनायक ढाणे हे त्यांच्या चुलत्यांच्या शेतात गेले होते. तिथे उसाचे वाडे देण्यावरून काही तरुणांशी त्यांचा शाब्दिक वाद झाला होता.

दरम्‍यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. संबंधित तरुणांनी विनायक यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर विनायक यांची प्रकृती वेगाने खालावली. त्यांना तातडीने कडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्‍यान, कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यू मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरेल. सध्या पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अधिक तपास सुरू आहे.

सद्यस्थिती आणि जनक्षोभ
या घटनेनंतर ढाणेवाडी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी कडेगाव पोलीस ठाण्यासमोर ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »