निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला.

कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग व त्यांचे योगदान याबद्दल महिलांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता) या होत्या.

मोलाचा संदेश

या प्रसंगी बोलताना पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मानवी जीवन अमूल्य असून, हा अमूल्य ठेवा चिरकाल टिकवण्यासाठी आपली माती जपली पाहिजे, असे प्रतिपादन केले. चांगल्या आरोग्यासाठी निसर्गाने जे काही दिले आहे, त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. यामुळे कोणतेही आजार होणार नाहीत व आपण दीर्घायुषी होऊ शकतो. त्यांनी “शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीनुसार चांगले बियाणे, चांगली माती व निसर्गाच्या साथीने शेती करण्याचे आवाहन केले.

दुर्मीळ बियाण्यांचे जतन

राहीबाई पोपेरे यांनी आतापर्यंत ५२ वेगवेगळ्या पिकांचे ११४ वाण जपलेले आहेत. यामध्ये अनेक जुन्या गावरान पालेभाज्या, रानभाज्या व वेलेवर्गीय भाज्यांच्या बियाण्यांचे त्यांनी जतन केले आहे. हे वाण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यांच्याकडे आपले पूर्वज शेकडो वर्षे खात असलेल्या मूळ स्वरूपातील पालेभाज्या व धान्यांचे दुर्मीळ बियाणे उपलब्ध आहे.

MCDC Titkare, Popere

त्यांनी महिलांना आवाहन केले की, बियाण्यांच्या वस्तू तयार करून (उदा. राखी, गणपती, आकाश कंदील) सण साजरे करताना प्रामुख्याने त्यांचा वापर करावा. तसेच, एकमेकींना वाण देण्यासाठी बियाण्यांच्या वस्तूंचा वापर करावा व त्या बियाण्याची लागवड करावी. या माध्यमातून समाजाने निरोगी व सुदृढ आयुष्य कसे जगावे, असा मोलाचा संदेश त्यांनी सर्व महिला वर्गाला दिला.

इतर मान्यवरांची मते

या प्रसंगी उषा लड्डा उंटवाल (भा.प्र.से.), महासंचालक, कृषी परिषद, पुणे यांनी महिला शक्तीच्या विकासासाठी सर्व संस्थांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

डॉ. महानंद माने (अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे ) यांनी कृषी क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान फार मोलाचे आहे, असे उद्गार काढले. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ) यांनी पद्मश्री राहीबाई पापेरे यांचा परिचय करून दिला आणि कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान महिलांना भावी काळात प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमासाठी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांच्या शेकडो महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम शीतल पाटील (महाव्यवस्थापक),  दिगंबर साबळे (विभाग प्रमुख, प्रशिक्षण), हेमंत जगताप, भास्कर पाटील (महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अधिकारी), तसेच मंगेश कदम (उपसंचालक, मॅग्नेट प्रकल्प), संस्कृती पाटील (प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट) व अशोक चव्हाण (जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ) इत्यादी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »