बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्या : शरद पवार यांची आग्रही मागणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोजन इंडिया पुरस्कारांचे शानदार कार्यक्रमात वितरण

पुणे : राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानात साखर कारखान्यांच्या बगॅससवर आधारित सहवीजनिर्मितीस स्थान मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत व्यक्त करून, बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

‘राष्ट्रीय कोजनरेशन पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील, सकाळ उद्योग समूहाचे चेअरमन श्री. प्रतापराव पवार, केंद्रीय सल्लागार डॉ. संगीता कस्तूरे, कोजनरेशन असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगांवकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर, पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, माजी मंत्री जयंत पाटील, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील आदींची उपस्थिती होती.

Sharad Pawar at Cogen India Awards

ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांचे सविस्तर भाषण ऐकण्यासाठी वरील फोटोला क्लिक करा

अलीकडच्या काळामध्ये साखर उद्योगात असलेल्या नेतृत्वांनी नवनवीन संकल्पना राबविल्या. एक काळ असा होता साखर निर्मिती नंतर मोलॅसेसपासून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्यात सुधारणा करून इथेनॉलपर्यंत जाऊन आपण पोहचलो. तसंच टाकाऊ कचऱ्यापासून वीजनिर्मिती, खतनिर्मितीचा प्रयत्न आपल्यातल्या अनेक सहकाऱ्यांनी केला. आता हायड्रोजनकडे जाण्याची चर्चा सुरु आहे, आणि त्याचा आज ना उद्या निकाल आपल्याला घ्यावा लागेल. ज्यावेळेला आपण अशी चर्चा करतो जे काही असे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये एक प्रश्न हल्ली दिवसेंदिवस वाढायला लागला आहे आणि तो म्हणजे कमी होणारा गळीत हंगामाचा कालावधी. त्यामुळे साखर उद्योगाचं अर्थशास्त्र अडचणीत येत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर उत्पादनांच्या बाबतीत आपण नवीन काही करू शकलो आणि झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढू शकलो तर साखर उद्योगाचं अर्थशास्त्र मजबूत होईल, असे पवार म्हणाले.

सुदैवाने यंदाचं वर्ष साखरेच्या मार्केटिंच्या, निर्यातीच्या संदर्भामध्ये, दराच्या संदर्भामध्ये ठीक आहे, त्यात फारशी तक्रार नाही कारण अधिकचे दोन पैसे संस्थांना मिळालेले आहेत.

आज संपन्न होणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय सहवीजनिर्मिती पुरस्कार समारंभास भरघोस प्रतिसाद लाभला आहे. मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण साखर उद्योगातील जाणकार मंडळी आहात. साखर उद्योग हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या उद्योगाने ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला आहे, जनतेच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी हा उद्योग नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

साखर उद्योगाने काळाची चाहूल ओळखून, विज्ञानाची कास धरून राष्ट्रहितासाठी सरकारच्या हाकेला प्रतिसाद देत ‘सहवीजनिर्मिती’ या क्षेत्रात प्रवेश केला आणि देशातील कधी काळी तीव्र असलेल्या वीजटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मोठे योगदान दिले. आता हाच उद्योग इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात सक्रिय सहभागी असून २०२५ पर्यंतच्या ई-२० मिशनमध्ये महत्त्वाचा सहभाग घेत आहे. यामुळे सरकारला परकीय चलनात जवळपास ५०,००० कोटी रुपयांची बचत झाली असून हा निधी देशाच्या इतर गरजांसाठी वापरणे शक्य झालं आहे, असे खा. पवार म्हणाले.

सहवीजनिर्मितीच्या मदतीने साखर कारखाने आता हायड्रोजन निर्मितीकडेही वाटचाल करत आहेत. प्रेसमडचा उपयोग करून बायो-CBG निर्मितीचा मार्ग साखर उद्योगांनी यशस्वी केला आहे. याचबरोबर नेपिअर गवत व इतर कृषिजन्य कच्च्या मालाचा वापर करून शेतकऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे साखर कारखाने आता ‘बायो एनर्जी हब’ म्हणजेच ‘कृषी-ऊर्जा प्रक्रिया केंद्रां’मध्ये रूपांतरित होत आहेत, ही जमेची बाब आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बगॅस आधारित सहवीजनिर्मितीला स्थान का नाही?

दुर्दैवाची बाब म्हणजे राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानात साखर कारखान्यांच्या बगॅससवर आधारित सहवीजनिर्मितीस स्थान मिळत नाही. तसेच, राज्य वीज नियामक आयोग व केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC) यांच्यातील समन्वयाचा अभाव पाहता केंद्र सरकारने ग्रामीण भारताच्या हितासाठी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. MNRE चे सल्लागार व माजी सहसचिव (बायोमास) आज आपल्यासमवेत उपस्थित आहेत, त्यामुळे मी त्यांना सुचवतो की त्यांनी हे धोरणकर्त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे की भारतातील साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीजनिर्मितीकडे पुन्हा लक्ष देणे आवश्यक आहे, असे आवाहनही पवार यांनी केले.

मला विश्वास आहे कि, ‘आर्थिक’ व ‘आर्थिकेतर’ अशा दोन्ही प्रकारच्या धोरणांद्वारे ठोस हस्तक्षेप केल्यास राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानाची दिशा अधिक बळकट होईल. भारताच्या ग्रामीण भागातील वाढती वीज मागणी, विकेंद्रित ऊर्जेचे महत्त्व आणि दर्जेदार ग्रीड वीज निर्मितीची गरज — हे सर्व पुन्हा एकदा बगॅस आधारित सहवीजनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित करत आहेत. भारत सरकारने पुढाकार घेऊन बगॅस आधारित सहवीजनिर्मितीला बायोमास आधारित सहवीजनिर्मितीपासून वेगळे ठेऊ नये हा माझा आग्रह आहे. आता वेळ आली आहे की दोन्ही गोष्टी एकसारख्याच समजून बगॅसलाही कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली.

मला आनंद होत आहे की, कोजनरेशन असोसिएशनने ‘साखर ऊस शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे’ महत्त्व ओळखले आहे व बारामतीच्या ‘अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ने या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. या ट्रस्टने AI च्या वापराने उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. मला खात्री आहे की, ऊस उत्पादनामध्ये झालेली वाढ साखर कारखान्यांना साखर, इथेनॉल, बायो-CBG आणि सहवीजनिर्मितीच्या उत्पादनात मदत करेल, असे प्रतिपादन खा. पवार यांनी केले

कोजन संस्था बळकट करा

आजच्या समारंभात महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांचा मोठा सहभाग आहे, म्हणून मी त्यांना एक विनंती करतो की, “कोजेन इंडियाने गेले दोन दशकांहून अधिक काळ सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व भरीव काम केले आहे. वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीसाठी पाठपुरावा करणे, अनुदानासाठी प्रयत्न करणे, सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी निश्चित धोरण मान्य करून घेणे, अशी अनेक कामे केली आहेत. प्रकल्प उभारणी यशस्वी करण्यासाठी कोजेन इंडिया विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत आहे. कोजेन इंडियाच्या उपक्रमांचा आपण सर्वांनी लाभ घेऊन ही संस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सहकार्याबाबत मला तीळमात्र शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मी पुन्हा एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो व अपेक्षा करतो की ते सहवीजनिर्मितीच्या कार्यक्षमतेत वाढ करून आपली कामगिरी अशीच उत्तम ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘मी कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे कार्यमक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांचे सविस्तर भाषण खालील विडियो मध्ये

https://youtu.be/OHlzFQSBxGQ

यावेळी कोजन इंडियाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »