सहकारमंत्र्यांचा कारखाना देणार रू. २९५० पहिली उचल
पुणे : सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये उसाला पहिली उचल २९५० रुपये प्रतिटनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आला.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी याबाबत माहिती दिली. पारगाव (ता. आंबेगाव) येथे चालू गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपासाठी बैठक पार पडली. यावेळी बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे.
गाळप हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने सहा जुलै २०२३ चे परिपत्रकान्वये द्यावयाचा एफ.आर.पी दर निश्चित केलेला आहे. त्याप्रमाणे कारखान्याचा सन २०२२-२३ गाळप हंगामातील सरासरी साखर उताऱ्यानुसार एफआरपी दर प्रतिटन २८५३.५७ रुपये येत आहे. त्यानुसार सन २०२३-२४ हंगामात गाळप होणाऱ्या उसासाठी पहिली उचल २९५० रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण उसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
कारखान्याचे आज अखेर एक लाख ५५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झालेले आहे. हंगामात कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार नऊ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.