‘विठ्ठल’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा : कोर्ट

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक राजाराम शहाजी म्हेत्रे यांनी २०२२ सालच्या निवडणुकीदरम्यान खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद डॉ. बी. पी. रोंगे हे आहेत. सन २०२२ मध्ये झालेल्या कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान पी. रोंगे यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत अर्ज सादर करते वेळी म्हेत्रे यांच्या सहीचे मागील सात वर्षापैकी चार वर्षे कारखान्यात ऊस घातल्यासंदर्भात प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे दाखल करून सर्व अटींची पूर्तता केली होती.
तथापि, कारखान्याच्या २०२२ साली झालेल्या निवडणुकीत डॉ. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा या उद्देशाने म्हेत्रे यांनी दि. १० जून, २०२२ रोजी अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर डॉ. रोंगे यांनी मागील सात वर्षांपैकी फक्त दोनच वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऊस घातला आहे, असे खोटे प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे डॉ. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला.
यानंतर रोंगे यांनी दि. १३ जून २०२२ रोजी परत म्हेत्रेकडे कारखान्यास ऊस गळितास दिल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चार वर्षे ऊस दिलेल्या प्रमाणपत्रा सारखेच खरे प्रमाणपत्र दिले. एकूण प्रकरणात म्हेत्रे यांनी कारखाना प्रशासनातील एक जबाबदार व्यक्ती असतानाही डॉ. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर व्हावा या दृष्टीने हेतुपुरस्सर बनावट दाखला बनविला. तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा तयार केलेला पुरावा ग्राह्य मानत डॉ. बी. पी. रोंगे यांचा निवडणूक अर्ज नामंजूर केला. न्यायालयाने यासंदर्भातील कागदपत्रे पाहत फिर्यादींच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले आणि न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या आरोपीने खोटे प्रमाणपत्र दिल्याचे मत नोंदवले.