अधिकाऱ्यानेच केली कारखान्यात चोरी? तत्काळ निलंबनाची कारवाई
चौकशीसाठी ‘अंकुश’चे चेअरमन यांना निवेदन
कोल्हापूर : स्वत: उच्च पदावर काम करत असलेल्या साखर कारखान्यात चोरी करताना एक अधिकारी रंगेहाथ सापडल्याची चर्चा सुरू झाल्याने, आंदोलन अंकुश संघटनेने यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हे प्रकरण आहे, शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील. याबाबत संघटनेने कार्यकारी संचालक आणि चेअरमन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की काल रात्री दत्त साखर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखान्यातीलल कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यांस त्याच रात्री तडकाफडकी आपण कामावरून निलंबित केल्याचीची चर्चा आम्हा सभासदांना समजली आहे. दत्त साखर कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिला आहे आणि हे सर्व वैभव हे सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे.
काल रात्री घडलेली चोरीची घटना कामगार सांगतात त्याप्रमाणे जर खरोखर घडली असेल व उपस्थित सर्व कामगारांनी पाहिली असेल तर ही फार गंभीर बाब आहे. एखादा अधिकारी कारखान्यातील किमती साहित्य चोरी करतो आणि त्याच्यावर साधी निलंबनाची कारवाई करून सोडून दिले जात असेल तर हे त्यापेक्षाही गंभीर आहे, असा आक्षेप घेऊन, ‘आपण विश्वस्त म्हणून रात्रीच पोलीस स्टेशन ला फिर्याद देणे आवश्यक होते; कारण यापूर्वीही त्याच अधिकाऱ्याकडून आणखी साहित्य नेले असण्याचा संभव आहे. तसेच यात आणखी अधिकारी कर्मचारी त्यांना सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगार म्हणतात त्यानुसार जर खरोखर चोरीची घटना घडली असेल तर याची पोलिसाकडून कसून चौकशी होण्यासाठी आपण तात्काळ फिर्याद देणे आपली जबाबदारी आहे,’ असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
फक्त निलंबन करून हे प्रकरण दाबणे हे कारखाना व शेतकरी या दोन्हीच्या हिताचे नाही. कामगार व सभासदांमध्ये चर्चा होत असलेल्या या प्रकरणी सत्यता असल्यास आपणाकडून फिर्याद न दिल्यास आम्हाला व्यापक कारखाना हितासाठी व सभासद या नात्याने आंदोलन करावे लागेल. त्याचबरोबर हे घडले नसल्यास सबंधित अधिकाऱ्यांना कामावरून तातडीने का काढून टाकले, याचा खुलासा करावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.