खासदार राऊतविरोधी निषेध मोर्चामुळे दौंड दणाणले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केल्याच्या निषेधार्थ दौंड शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी काढलेल्या या मोर्चामध्ये राऊत यांचा जोरदार समाचार घेण्यात आला. मात्र त्यासाठी वापरलेली भाषा राऊतांपेक्षा वाईट होती.

दौंड शहरातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढून जिल्हा बॅंक शाखेसमोरील रस्त्यावर निषेध सभा घेण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्यासह शिवाजी सोनवणे, नंदकुमार पवार, अॅड. बापूराव भागवत, तानाजी दिवेकर आदी उपस्थित होते.

यावेळी भीमा पाटस कारखान्याचे सभासद व दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया म्हणाले, पत्राचाळ प्रकरणात तुरूंगात जाऊन आलेले खासदार संजय राऊत हे कारखान्यावर पाचशे कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत.

कारखान्याच्या विरोधातील काही मंडळी लोकशाही व्यवस्थेत दिलेल्या संधींचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेत येऊन बोलत नाहीत आणि निवडणूक पण लढवत नाही, मात्र कारखान्यावर मोर्चा काढतात. राहुल कुल यांचे विरोधक कृतघ्न असून ते कोणत्याही थराला जातील, त्यामुळे स्वाभिमान जागृत ठेवत कुल यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे.

आ. कुल यांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत वायफळ बडबड करत असून, जेल भोगलेल्यानी काय भ्रष्टाचारावर बोलावे ? राऊत यांना दौंड तालुका माहिती तरी आहे का? दौंड तालुक्यातील काही जणांना आपल्याला स्वतःला काहीच करता येत नसल्यामुळेच राऊत यांचे पाय धरायला जात आहेत. त्यांनी कधी भीमा पाटस साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली का? ते हजर का राहत नाहीत.

आ.राहुल कुल अध्यक्ष होण्यापूर्वी या भीमा पाटस कारखान्यावर ११२ कोटींचे कर्ज कोणाच्या काळात होते, त्यांनी हा कारखाना बंद पाडण्याचा विडा उचलला आहे. परंतु राहुल कुल यांनी तो उधळून लावला, असा विरोधकांचा समाचार घेत प्रेमसुख कटारिया यांनी विरोधकांवर तोफ डागली.

कमी वयात आमदार राहुल कुल यांच्या खांद्यावर भीमा पाटस कारखान्याची जबाबदारी पडली. त्यांनी कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. त्यावेळेस देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले होते की, कारखान्यावरील ११२ कोटी रुपयाच्या कर्जाला कुल जबाबदार नाही, तर त्या काळात कारभार पाहणारे जबाबदार आहेत. त्यामुळे कारखान्यावर ११२ कोटींचे कर्ज कोणी केले, असा सवालही कटारिया यांनी केला.

महाविकास आघाडीमधील बहुतांश नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र, सध्या आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असताना दौंड तालुक्यातील अनेक नेते कुल यांची चौकशी करावी, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था भुताच्या तोंडून भगवद्गीता ऐकल्यासारखी झाली आहे, असे मत ज्येष्ठ नेते नंदू पवार यांनी व्यक्त केले

प्रास्ताविक भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बापू भागवत, सूत्रसंचालन दिनेश गडधे यांनी केले, तर हरीश खोमणे यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »