राज्याच्या गाळप क्षमतेत दीड लाख टनांची वाढ
दौंड शुगर ठरला सर्वात मोठा कारखाना
पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता (क्रशिंग कपॅसिटी) सुमारे दीड लाख टनांनी वाढली असून, दौंड शुगर हा राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना ठरला आहे.
गतवर्षीचा साखर हंगाम (२१-२२) खूप चांगला गेल्याने आणि यंदासाठी उसाचे क्षेत्र वाढल्याने आपली गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सहकारी, तसेच खासगी साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केले होते. वाढीव ऊस क्षेत्राला सामावून घेण्यासोबतच, गाळप हंगामाचा कालावधी कमी करून अतिरिक्त खर्च वाचवण्याचा साखर कारखान्यांचा उद्देशही या क्षमता वाढीमागे आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी ‘शुगरटुडे’ मॅगेझीनला सांगितले की, चांगल्या पद्धतीने साखर कारखाने चालवणाऱ्या सुमारे शंभरावर व्यवस्थापनांचे अर्ज क्षमता वाढीसाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे आले होते. त्यावर सांगोपांग चर्चा होऊन, बहुतांश कारखान्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता १.४५ लाख टनांनी (सुमारे दीड लाख) वाढणार आहे. पुढील वर्षीपर्यंत गाळप क्षमतावाढीची शंभर टक्के कामे पूर्ण झालेली असतील. यात खासगी आणि सहकारी अशा दोन्ही कारखान्यांचा समावेश आहे.
आगामी वर्षांत गाळपाविना ऊस शिल्लक राहिल्याची एकही तक्रार येणार नाही, हे उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही काम करत आहोत, असे साखर आयुक्त म्हणाले.
गाळप क्षमता वाढीच्या परवान्यांनंतर पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर हा खासगी साखर कारखाना १७ हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेसह, राज्यातील सर्वात मोठा कारखाना ठरला आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.
या हंगामात राज्यात १८८ साखर कारखाने ऊस गाळप करत असून, सर्वांची मिळून गाळप क्षमता प्रति दिन ८ लाख २६ हजार १५० टन आहे. गत हंगामापेक्षा दोन कारखाने कमी आहेत, मात्र कालअखेर ४१४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. गतवर्षी याच तारखेला ते ३९१ लाख टन होते.
दौंड शुगरचे चेअरमन जगदीश कदम असून, गेल्या वर्षी या कारखान्याला वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार मिळाला होता.
गाळप क्षमता वाढवण्यापेक्षा साखर कारखाने जास्तीत जास्त दिवस चालणे गरजेचं आहे.तसेच या उद्योगात ऊस पळवापळवी थांबली पाहिजे मुकादम कमिशन बंद झाले तर त्याचा फायदा ऊस उत्पादक व कारखानदार या दोघांनाही होईल.वाहतूक खर्च कमी केल्यास ऊस उत्पादनात सकारात्मक वाढ होईल.
[…] […]
पाडळी मुक्काम पोस्ट
कोल्हापूर