इथेनॉल उत्पादन निर्बंधांबाबत लवकरच निर्णय : मोहोळ
पुणे : इथेनॉल उत्पादनावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते साखर आयुक्तालयाला दिलेल्या भेटीवेळी बोलत होते.
देशातील साखर उद्योगांच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठविण्याची मागणीही साखर उद्योगातून करण्यात आली असून, त्यावरही लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
साखर संकुल येथे बुधवारी (दि. १०) मोहोळ यांनी सदिच्छा भेट दिली. साखर आयुक्त डॉ. कृणाल खेमनार आणि कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी साखर संचालक यशवंत गिरी, राजेश सुरवसे, सहसंचालक मंगेश तिटकारे, अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.
राज्यातील कारखाने इथेनॉलनिर्मितीस तयार असून, ऑईल कंपन्यांनी कारखान्यांना दिलेल्या कोट्यानुसार इथेनॉलपुरवठा करण्यासही तयार आहेत. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठविण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे. त्यावर साखर उद्योगाचे शिष्टमंडळ मला भेटले असून, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केल्याचे खेमनार यांनी सांगितले.
सहसंचालक तिटकारे यांनी यावेळी मोहोळ यांना ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ हा महाग्रंथ भेट दिला. या महाग्रंथात साखरेच्या इतिहासापासून आतापर्यंतचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. साखर उद्योग आणि साखरेबद्दल मराठीतील असा एकमेव ग्रंथ आहे. श्री. तिटकारे हे महाग्रंथाचे सहलेखक आहेत.